-->
पडघम चार राज्यातील निवडणुकांचे

पडघम चार राज्यातील निवडणुकांचे

रविवार दि. ०७ फेब्रुवारी २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
पडघम चार राज्यातील निवडणुकांचे
--------------------------------------------
एन्ट्रो- आता येत्या वर्षात चार राज्यात व एका केंद्रशासित राज्यात निवडणूक येऊ घातली आहे. यात सत्ताधार्‍यांची मोठी कसोटी लागेल. रायगडच्या दृष्टीने महत्वाची बाब म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे कित्येक वर्षे अधिराज्य असलेली अलिबाग नगरपरिषदेची निवडणूकही याच वर्ष अखेर होणार आहे. आसाम, बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यांतील ८२४ जागांसाठी होणार्‍या विधानसभा निवडणुका व केंद्रशासित राज्य पॉँडेचरीत निवडणुका होणार आहेत. या चार राज्यात केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाला फार काही यश मिळ्ेल व चमत्कार होईल अशी स्थिती नाही. भाजपा आपले हिंदु कार्ड यावेळी वापरणार हे नक्की आहे. मात्र त्यामुळे त्यांना एकगठ्ठा मते पडतील व त्यांचा मोठा विजय होईल असे नाही. चार राज्यातील या निवडणुकांचे निकाल काय लागतात त्यावर पुढील काळातील राजकारणाची दिशा राहिल. कारण लगेचच त्यापाठोपाठ देशातील सर्वात मोठे असलेले राज्य उत्तरप्रदेशात निवडणूक होत आहे. एकूणच काय निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे...
--------------------------------------------
गेल्या वर्षी म्हणजे २०१५ साली गाजली ती बिहारमधील विधानसभेची निवडणूक. या निवडणुकीने देशातील सत्ताधार्‍यांचा चांगलाच धडा दिला. सत्तेची सर्व गुरुमी या निवडणुकीत मतदारांनी उतरविली. आता येत्या वर्षात चार राज्यात व एका केंद्रशासित राज्यात निवडणूक येऊ घातली आहे. यात सत्ताधार्‍यांची मोठी कसोटी लागेल. रायगडच्या दृष्टीने महत्वाची बाब म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे कित्येक वर्षे अधिराज्य असलेली अलिबाग नगरपरिषदेची निवडणूकही याच वर्ष अखेर होणार आहे. आसाम, बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या चार राज्यांतील ८२४ जागांसाठी होणार्‍या विधानसभा निवडणुका व केंद्रशासित राज्य पॉँडेचरीत निवडणुका होणार आहेत. यातील आसाममध्ये कॉँग्रेसने जवळपास १५ वर्ष सत्ता राखली आहे. येथील कॉँग्रेसचे नेतृत्व तरुण गोगोई यांच्याकडे असून यावेळी त्यांना आपली सत्ता राखण्यात यश मिळणार का, असाही प्रश्‍न आहे. आसाममध्ये भाजपा हा अतिशय अल्प आहे. भाजपाने आपली ताकद वाढविण्यासाठी नेत्यांची फोडाफोडी करण्याचा प्रयत्न गेल्या वर्षात केला, त्यात त्यांना खरोखरीच यश येईल का, असा सवाल आहे. सध्यातरी भाजपाला पोषक वातावरण तेथे नाही. कॉँग्रेसला सत्ताधारी असल्यामुळे नकारात्मक मते पडू शकतात, मात्र त्यात त्यांची सत्ता जाईल असे तरी वातावरण सध्या नाही. आसाम हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी तेथे पक्षात फूट पडली आहे. लोकसभा निवडणुकीत तेथे भाजपाला १४ तर कॉँग्रेसला फक्त तीन जागा मिळाल्या आहेत. मात्र लोकसभा निवडणुकांनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने तो निकष लावणे चुकीचे ठरेल. हिमंता बिस्वास सरमा हे मुख्यमंत्री गोगोइंचे जवळचे सहकारी होते, त्यांना पक्ष नेतृत्वात बदल आणि पक्षात वरचे पद हवे होते. हायकमांडने मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. परिणामी हिमंता बिस्वास यांनी भाजपा प्रवेश केला आणि सोबत नऊ आमदारांसह स्थानिक पातळीवरील बरेच पदाधिकारी कार्यकर्ते नेले. आसाममध्ये मुस्लिमांची संख्या ३४.२ टक्के आहे आणि तिथल्या राजकारणावर धार्मिक अविश्वासाचा प्रभाव आहे. मौलाना बद्रुद्दिन अजमल यांच्या एआयएयूडीएफ पक्षाने लोकसभा निवडणुकीत १४.८ टक्के मते घेऊन तीन जागा मिळवल्या आहेत. डाव्या पक्षांचे प्रामुख्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्वात मोठे बळ असलेल्या केरळात आणि पश्चिम बंगालमध्ये हा पक्ष आपली गेलेली सत्ता पुन्हा कमविल का, असा सवाल आहे. शंभर टक्के माकपला तेथे वातावरण पोषक नाही हे वास्तव असले तरीही पश्‍चिम बंगालचा विचार करता ममता बँनर्जी यांची लाट होती ती आता ओसरली आहे. त्यांना यावेळची मते ही केवळ त्यांनी केलेल्या कामांवर मिळतील. या राज्यातही केंद्रात सत्तास्थानी असलेला भाजपा नगण्य आहे. मध्यंतरी त्यांनी पश्‍चिम बंगालमधील बांगला देशाला लागून असलेल्या काही भागात जातीय दंगे पेटवून देऊन हिंदुंची मते एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात भाजपाला फारसे काही यश मिळेल अशी स्थिती नाही.  कॉँग्रेसचे ओमान चंडी आणि तृणमूल कॉँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना पाच वर्ष सत्ता असूनही फारशी लोकप्रियता मिळवता आली नाही. मात्र याचा फायदा येथील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाकपला मिळेल का? तामिळनाडूत सत्ताधारी एआयएडीएमकेच्या जयललिता आणि डीएमकेचे करुणानिधी यांच्यातील राजकारणाचा वैर कायम आहे. खरे तर तेथील राजकारणाचा बाज हा दोन्ही पक्षांनी परस्पर विरोधात राहाण्याचा आहे. येथे कॉंग्रेस कमकुवत गेली तीन दशके आहे. तर भाजपा हे जेवणात लोणचे चवीला लावतात त्या स्थितीत आहे. कॉँग्रेसला येथे सत्तेची शिडी चढण्यासाठी नेहमीच जयललिता किंवा करुणानिधी यांच्याशी जुळवून घ्यावे लागले आहे. यावेळी येथे जयललितांना सत्ता कायम राखता येणार का, हा मोठा सवाल आहे.
गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या तृणमूल कॉँग्रेसने मोदी लाट रोखली होती, ममतांच्या पक्षाला राज्यातील एकूण ४२ पैकी ३४ जागांवर विजय मिळाला होता. भाजपाला मात्र १६ टक्के मते आणि दोन जागा मिळाल्या होत्या. भाकप आणि कॉँग्रेस या दोन्ही पक्षाची मते लोकसभेत घटली आहेत. हे दोन्ही पक्ष केरळात एकमेकांचे विरोधक असल्याने ते इथे एकत्र येणेसुद्धा अवघड आहे. त्यामुळे त्याचा देशात भाजपाविरोधी सर्वधर्मसमभाव मानणार्‍या पक्षांची एकत्र मोट बांधता येणार नाही. तृणमूल कॉँग्रेसला त्यांची मुस्लिम मते हातून जाऊ नये म्हणून काळजी आहे. त्यामुळे कॉँग्रेसशी युती करण्याचा पर्याय त्यांच्या समोर आहे. मात्र ममता-कॉँग्रेस एकत्र येतील का, त्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये रा.स्व. संघाच्या शाखात दुप्पटीने वाढ झालेली आहे. त्यामुळे तेथील भाजपाची ताकद वाढेल. विद्यमान मुख्यमंत्री चंडी हुशार राजकारणी आहे, त्यांनी नुकतीच मद्य व्यवहारांवर बंदी घातली आहे. कॉँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफ नेहमीच २७ टक्के मुस्लिम आणि १६ टक्के ख्रिश्चन मते मिळवत आली आहे. राज्यात सत्तेची धुरा युडीएफ आणि एलडीएफ यांच्या हाती आळीपाळीने देतील किंवा युडीएफला अनपेक्षितपणे परत एकदा संधी देतील. या चार राज्यात केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाला फार काही यश मिळ्ेल व चमत्कार होईल अशी स्थिती नाही. त्यामुळे जर अपेक्षित निकाल लागलेच नाहीत तरच देशातील राजकारणाची दिशा बदलणार आहे. भाजपा आपले हिंदु कार्ड यावेळी वापरणार हे नक्की आहे. मात्र त्यामुळे त्यांना एकगठ्ठा मते पडतील व त्यांचा मोठा विजय होईल असे नाही. रायगड जिल्ह्यातील एक महत्वाची निवडणूक म्हणजे अलिबाग या राज्याच्या मुख्यालय असलेल्या नगरपरिषदेची निवडणूक याच वर्षी होत आहे. दीडशे वर्षाची परंपरा असलेल्या या नगरपरिषदेत शेकाप आपले वर्चस्व सिद्द करील यात काहीच शंका नाही. चार राज्यातील या निवडणुकांचे निकाल काय लागतात त्यावर पुढील काळातील राजकारणाची दिशा राहिल. कारण लगेचच त्यापाठोपाठ देशातील सर्वात मोठे असलेले राज्य उत्तरप्रदेशात निवडणूक होत आहे. एकूणच काय निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे.
------------------------------------------------------------------------

0 Response to "पडघम चार राज्यातील निवडणुकांचे"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel