-->
एक दशकानंतर...

एक दशकानंतर...

18 एप्रिलच्या मोहोरसाठी चिंतन
एक दशकानंतर... भ्रष्टाचारमुक्तीचे अण्णांनी जे आंदोलन दिल्लीच्या रामलीला मैदानावर छेडले होते त्याला नुकतेच म्हणजे एप्रिल महिन्यात एक दशक पूर्ण झाले. अण्णांचे इंडिया अग्नेस्ट करप्शन हे आंदोलन अगदी अलिकडचे झाल्यासारखे वाटते, पण त्याला आता तब्बल एक दशक पूर्ण झाले आहे. गेल्या दशकातील काळ किती झपाट्याने गेला हे कुणालाच समजले नाही. दशकापूर्वी हे आंदोलन म्हणजे न्यूज चॅनल्ससाठी एक मोठी पर्वणीच ठरली होती. दिल्लीच्या रामलीला मैदानात गच्च भरलेल्या गर्दीत किरण बेदी झेंडा फडकवित आहेत, त्यांच्या सोबतीला अरविंद केजरीवाल उपोषणास बसले आहेत व त्या सर्वांचे केंद्रबिंदू हे अण्णा लोढाला टेकून उपोषणास बसले आहेत. हे सर्व चित्र म्हणजे देशात जणू काही तिसरी क्रांतीच होऊ घातल्याचे अनेक पत्रपंडितांनी रंगविले होते. अर्थात पहिली क्रांती म्हणजे स्वातंत्र्ययुध्द, दुसरी क्रांती म्हणजे आणीबाणी नंतर जनता पार्टीचे सरकार सत्तेत येणे आणि तिसरी क्रांती म्हणजे हे अण्णांचे आंदोलन. बस अण्णा रातोरात राष्ट्रीय नेता झाल्यासारखे दिसत होते. अण्णांचे ते उपोषण, त्यांची मध्येच खालावत जाणारी प्रकृती, त्याला मिळणारी देशभर प्रसिध्दी हे सर्व काही अण्णांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आमि त्यांच्या समर्थकांना क्रांतीसारखेच वाटत होते. त्याला पार्श्वभूमी होती कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यु.पी.ए. सरकारवर सलग दहा वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोपांची. अर्थात या आंदोलनाला दहा वर्षे पूर्ण होत असाताना त्या आरोपातील एकही आरोप सिध्द झाला नाही अगदी विरोधी पक्षांचे सरकार केंद्रात येऊनही. ज्या कोसळा घोटाळा व दूरसंचार स्प्रेक्ट्रम घोटाळा म्हणून अब्जावधी रुपयांचे आकडे त्याकाळी प्रसिध्द झाले होते त्यातील एकही पैशाचा भ्रष्टाचार सिध्द होऊन कोणालाही शिक्षाही झाली नाही. त्यामुळे हे केवळ आरोपच, यात काहीच तथ्य नव्हते, होते हे स्पष्ट होते. महत्वाची गोष्ट म्हणजे या आरोपासंबंधी किंवा लोकपाल विधेयकासंबंधी त्या आंदोलनानंतर अण्णांनी कधी त्याचा आग्रह धरला किंवा केजरीवाल व किरण बेदी यांनी त्याचा फॉलॉअप केला. सर्वात महत्वाचे म्हणजे अण्णांच्या या आंदोलनाचा बार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भरला होता. रामलीला मैदानावरही संघाचे स्वयंसेवक मागच्या दाराने सक्रीय होते. संघाला काही अण्णांना किंवा केजरीवाल, किरण बेदी यांना मोठे करावयाचे नव्हते तर त्यांना कॉंग्रेसच्या भ्रष्ट राजवटीविरुध्द आवाज उठवायचा होता व भविष्यात आपले सरकार आणण्यासाठी पेरणी करावयाची होती. त्यांचा हा डाव निश्चितच य़शस्वी झाला. कारण त्याचा पुढील सार्वत्रिक निवडणुकीत मोदी सरकार सत्तते यण्यास या आंदोलनाचा मोठा फायदा झाला. खरे तर त्याची पेरणी अण्णांच्या रुपाने संघाने त्यावेळी करुन गेतली असे म्हटल्सा धाडसाचे ठरणार नाही. अण्णा हे कोणत्याच विचाराचे नाहीत, एखादा नदीत गुळगुळीत गोटा सापडावा तशी अण्णांची वैचारिक बांधिलकी. त्यांचे आंदोलन कोणतेही हे केवळ व्यक्तिकेंद्रीत होते. अण्णांना आंदोलनापेक्षा आणि त्यातील मांडलेल्या विषयांपेक्षा आपण किती मोठे होतोय यात समाधान वाटते. दिल्लीसारख्या राजधानीत आपले प्रस्थ वाढतेय यात अण्णा आत्ममग्न होते. लष्करात चालकाची नोकरी करुन निवृत्त झालेल्या एका मराठी माणसाला याहून जास्त ते सुख काय मिळणार हो? अण्णांना आपल्या आंदोलनात संघ हवा भरतोय याचे काही वाईटही वाटत नव्हते, कारण त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात कोणतीच ठोस राजकीय भूमिका घेतलेली नाही. अराजकीय असण्यात त्यांनी नेहमी धन्यता मानलेली. राळेगंजसिध्दीचा विचार करता तेथील ग्रामीण विकास बिगर राजकीय करणे यात काही मोठे नाही. परंतु ज्यावेळी देशातील भ्रष्टाचाराची लढाई लढताना ती राजकीयच लढाई असली पाहिजे, ती जर बिगर राजकीय असेल तर त्याचे बाराच वाजणारच हे अण्णांच्या डोक्यात बसणारे नव्हते. महाराष्ट्रात त्यांनी आंदोलने करताना कधी कॉँग्रेसशी तर कधी भाजपाशी चुंबाचुंबी केली होती किंवा ते पक्ष त्यांच्या सोयीनुसार अण्णांना वापरुन घेत होते. अर्थात हे अण्णांना समजतही असणार परंतु त्यात त्यांना फारसे स्वरस्य नव्हते. त्यांना आपली प्रतिमा कशी मोठी होतेय त्यात रस होता. त्यांचे साथीदार हे प्रत्येक आंदोलनात बदलत गेले आहेत. गेल्या दोन दशकात विचार केल्यास अण्णांचे साथीदार कधीच त्यांच्यासमवेत कायम टिकले नाहीत. प्रत्येक आंदोलनात अण्णांचे नवनवीन साथीदार होते. यावेळी भ्रष्टाचारविरोधी लढ्यात किरण बेदी व अरविंद केजरीवाल हे त्यांचे साथीदार होते. या दोघात एक समान दुवा होता व तो म्हणजे, हे दोघेही भाजपाचे समर्थक आणि नोकरशाहीच्या चौकटीतून आलेले होते. ज्या भ्रष्ट नोकरशाहीत ते कामाला होते, भ्रष्टाचार कसा होतो हे त्यांनी पाहिले आहे, त्याचा ते भाग होते तेच लोक अण्णांची साथ करीत होते. हे दोघेही भ्रष्ट होते असे ठामपणाने म्हणता येणार नाही परंतु भ्रष्ट व्यवस्थेचे ते भाग होते, हे मान्य करावेच लागेल. त्या दोघांना देखील या आंदोलनाच्या निमित्ताने चमकोगिरी करता येत होती. आयते एक देशव्यापी व्यासपीठ तयार झाले होते, त्यावर नेतेपदी मिरवता येत होते. यातील किरण बेदी यांनी चक्क पुढे अधिकृतपणे भाजपामध्येच प्रवेश केला. त्यांच्या प्रतिमेचा उपयोग होईल असे भाजपाला वाटले होते. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले गेले. परंतु भाजपाचा हा अंदाज सफशेल फसला आणि केजरीवाल यांच्या आपने बाजी मारली. शेवटी भाजपाकडे त्यांनी बराच आग्रह धरल्यावर बेदीबाईंना पॉँडिचेरीचे उपराज्यपाल करण्यात आले आणि तेथून मुदती अगोदरच भाजपाला साजेसे काम न केल्याने त्यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यातल्या त्यात केजरीवाल यांनी मोठी बाजी मारली. त्यांनी आप पक्षाची स्थापना केली आणि भाजपाच्या विरोधात जाऊन दिल्लीतील सत्ता खेचून आणली. त्यानंतर त्यांनी दिल्लीत खरोखरीच चांगले काम केल्याने त्यांना जनतेने दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसविले. अण्णांचे तर आता सर्वत्रच हसे होते आहे. गेल्या सात वर्षात भाजपाच्या विरोधात किंवा मोदी सरकारच्या विरोधात त्यांनी साधे आंदोलन किंवा उपोषण केल्याचेही ऐकीवात नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, राफेलमधील भ्रष्टाचार, निवडणूक कर्जरोखे, पी.एम.फंड, महाराष्ट्रात जलशिवारच्या योजनात झालेला करोडोंचा भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न होते की अण्णांनी हाती घेऊ भ्रष्टाचाराविरोधात मोहोळ उठविता आले असते. परंतु अण्णांनी तसे काही करण्याचे धाडस केले नाही. कॉँग्रेसच्या सरकारविरोधात त्यावेळी लढणे सोपे होते परंतु सध्याच्या भाजपाच्या राजवटीत आंदोलन करणे सोपे नाही किंवा आपली ती क्षमता नाही हे अण्णांनी मान्यच केले आहे. असो, गेल्या दशकात झालेल्या अण्णांच्या आंदोलनाची नोंद इतिहासात जरुर होईल परंतु त्यातून अण्णांनी जनतेची केलेली फसवणूक व दिशाभूल प्रकर्षाने नोंदविली जाईल.

0 Response to "एक दशकानंतर..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel