-->
कोरोनाचा कहर

कोरोनाचा कहर

17 एप्रिलच्या अंकासाठी अग्रलेख
कोरोनाचा कहर देशात कोरोनाने अक्षर: कहर माजविला आहे. गेल्या दोन दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखीनच वाढला आहे व तो कमी होण्याचीही चिन्हे दिसत नाहीत. गुरुवारी दिवसभरात दोन लाख लोकांना कोरोना झाल्याचे आढळले. देशातील हा आकडा सर्वोच्च म्हणावा लागेल. पहिल्या लाटेतही दिवसा एवढे रुग्ण आढळत नव्हते, परंतु आता दुसऱ्या लाटेची क्षमता जबरदस्त तीव्र आहे. अर्थात याविषयीचा अंदाज यापूर्वीच व्यक्त झाला होता. दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा आणखी जोरात येणार असे अनेक तज्ज्ञांनी व डॉक्टरांनी नमूद केले होते. परंतु पहिली लाट आटोक्यात आल्यावर सरकार आणि जनता या दोघांच्यातही ढिलाई आली आणि त्याचेच परिणाम आता भोगावे लागत आहेत. पहिली लाट ओसरल्यावर सरकारकडे दुसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता लक्षात घेऊन जी तयारी केली पाहिजे होती ती केली गेली नाही. यात राज्य व केंद्र सरकार हे दोघेही जबाबदार आहेत. त्यातच केंद्र सरकारने पाच राज्यात निवडणूकीचा घाट घातला आहे. तेथे सत्ताधारीच भाजपाच्या लाखोंच्या सभा आयोजित केल्या जात आहेत. यात कोण जिंकणार कोण हरणार हा मुद्दा महत्वाचा नसून सत्ताधाऱ्यांच्या बेफिकीरीमुळे कोरोना पसरण्यास मदत झाली आहे. एवढेच कशाला उत्तराखंडात कुंभमेळ्याचा कार्यक्रम आयोजित केला गेला आणि त्याला तब्बल १५ लाखाहून जास्त लोकांनी उपस्थिती दर्शविली. खरे तर कोणतेही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यास सध्या प्रतिबंध केला पाहिजे आणि केलाच तर त्याचे स्वरुप मर्यादीत ठेऊन परंपरा खंडीत होऊ नये यासाठी नाममात्र करणे गरजेचे होते. परंतु उत्तराखंडाचे मुख्य़मंत्रीच आम्हाला गंगेचा आशिर्वाद आहे, आम्ही कोणत्याही संकाटतून सहिसलामत बाहेर पडू, असे विधान करतात. आता कुंभमेळ्यातून बाहेर पडणारे लोक हे कोरोनाचे प्रसारक ठरणार आहेत. एकीकडे कुंभमेळ्याला परवानगी देणारे हे सरकार मरकजच्या कार्यकक्रमावर बंदी आणते. शेवटी न्यायालयाने त्यांना ५० लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्यास मान्यता दिली आहे. सर्व धर्मियांना एकच न्याय का दिला जात नाही? सध्याच्या कोरोनाच्या काळात कोणत्याच धार्मियांच्या कार्यक्रमांना परवानगी देता कामा नये. मग तो मुस्लिमांचा मरकज असो किंवा हिंदुंचा कुंभमेळा. गेल्या वर्षी पहिल्या लाटेच्या सुरुवातीला मरकजचा दिल्लीत कार्यक्रम झाला होता व त्याला दोन हजार लोक उपस्थित होते आणि यानंतरच देशात कोरोना फैलावला अशी टीका झाली होती. आता यावेळी कुंभमेळा सर्वत्र कोरोना पसरविणार आहे. आजपर्यंत उत्तरप्रदेशात कोरोना नाही असा टेंभा मिरवला जात होता. परंतु आता दररोज तेथेही २० हजार रुग्ण सापडत आहेत. अहमदाबादसह गुजरातमध्ये व भोपाळसह मध्यप्रदेशात कोरोनाचा प्रचंड मोठा कहर आहे. परंतु तेथील रुग्णांच्या आकडेवारीसह मृतांची आकडेवारी लपविली जात आहे असा आरोप केला जात आहे. भाजपाची सत्ता असणाऱ्या या दोन्ही राज्यात अघोषित लॉकडाऊन आहे. परंतु त्याविषयी आपल्याकडील भाजपाचे नेते काही बोलत नाहीत. परंतु महाराष्ट्रात त्यांना लॉकडाऊन नको आहे. भाजपाच्या नेत्यांच्या या प्रचारकी भाषणांमुळेच राज्य सरकारला लॉकडाऊन जाहीर करायला विलंब लागला आहे. त्याचा परिणाम म्हणून आपल्याकडे आता कोरोना जबरदस्त वाढला आहे. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरात कोरोनाचा फैलाव जास्त होऊन लोकांमध्ये जबरदस्त दहशत निर्माण झाली आहे. मुंबईत रुग्णांना बेड मिळत नाहीत, ऑक्सीजनचा साठाही कमी पडत आहे. गेल्या वर्षी राज्यात सध्या जेवढे रुग्ण होते त्याच्या दुप्पट रुग्णसंख्या सध्या झाली आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर किती ताण पडत असेल त्याच अंदाज येतो. राज्याला हवाईमार्गाने ऑक्सीजन पुरवठा करावा अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्राव्दारे पंतप्रधानांना केली आहे. राज्यात लॉकडाऊन सुरु होऊन जेमतेम दोन दिवस पण झालेले नाहीत, त्यामुळे त्याचे परिणाम दिसायला अजून काही दिवसंचा अवधी द्यावा लागेल. यंदाच्या मे महिन्यात देशातील कोरोनाचा उच्चांक गाठला जाईल व त्यानंतर कोरोना घसरणीला लागेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. तसे झाल्यास सध्याचा लॉकडाऊनचा कालावधी राज्य सरकारला वाढविणे भाग पडणार आहे. त्यामुळे पुढील दोन महिने फार महत्वाचे ठरणार आहेत. जनतेनेही त्यासंबंधी काळजी घेणे गरजेचे ठरते. जनतेतील बेफिकीरी सध्याच्या घटना पाहता कमी झाली असेल असे दिसते. एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असाताना दुसरीकडे लसीकरणाची मोहीम वाढवून जास्तीत जास्त लोकांना लसीकरण कसे करता येईल त्याची आखणी करणे गरजेचे आहे. येत्या डिसेंबर अखेरपर्यंत सर्वंना लसीकरण करण्याचे महत्वाकांक्षी उदिष्ट निश्चित करुन त्यादृष्टीने लसीकरणाचे नियोजन केले जाणे गरजेचे आहे. त्यातून तिसरी लाट आपण थोपवू शकतो.

0 Response to "कोरोनाचा कहर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel