
नाईलाजास्तव पण आवश्यक
14 एप्रिलच्या अंकासाठी अग्रलेख
नाईलाजास्तव पण आवश्यक
कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना दहावी व बारावीच्या परीक्षा घेणे सरकारला काही शक्यच नव्हते. अशा प्रकारे परीक्षा घेणेही विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही धोकादायक ठरणार होते. त्यामुळे सध्या तरी या परीक्षा पुढे ढकलत असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. आता या परीक्षा मे व जून महिन्यात घेण्याचा वादा करण्यात आला आहे. सध्याच्या अंदाजानुसार, मे महिन्यात कोरोनाचा उच्चांक गाठला जाऊन त्यानंतर घसरणीला सुरुवात होईल असा अंदाज डॉक्टरानी व्यक्त केला आहे. त्यामुळे सरकारने या परीक्षा पुढे ढकलून मे नंतर घेण्याचा संकल्प जाहीर केला आहे. त्यामुळे सुमारे ३० लाख विद्यार्थी व त्यांच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. यावेळी दुसऱ्या लाटेत मुलांमध्ये म्हणजे २० वयोगटापर्यंतच्या तरुणांमध्ये कोरोना जास्त प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे अशा स्थितीत परीक्षा घेणे काही शहाणपणाचे ठरणारे नव्हते. परंतु काही झाले तरी दहावी व बारावीच्या परीक्षा घ्याव्याच लागणार आहेत. या दोन्ही इयत्तेतील परीक्षा या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असतात. त्यामुळे आज ना उद्या त्या घ्याव्याच लागणार आहेत. गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात ही परीक्षा संपत असताना झाल्याने हा प्रश्न उदभवला नाही. तरी दोन पेपर घेता आले नाहीत. शेवटी सरासरी काढून मार्क देण्याचा निर्णय झाला. त्याशिवाय काही पर्यायही नव्हता. आता यंदा तर परीक्षाच घेता येत नाही अशी स्थिती आहे. या परीक्षा पुढे ढकलत असताना सरकारने नववी पर्यंतच्या व अकरावीच्या मुलांना पुढच्या वर्गात ढकलण्याचे ठरविले आहे. नाईलाजास्तव परंतु आवश्यक असाच तो निर्णय होता. यात मुलांच्या करिअरचे नुकसान होत आहे हे कितीही मान्य केले तरीही सध्याची अभूतपूर्व परिस्थिती पाहता परीक्षा घेणे अशक्यच आहे. गेली वर्षभर मुले घरीच आहेत. त्यामुळे त्यांच्या करिअरचे जसे नुकसान होत आहे तसेच त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष देखील होत आहे. सुरुवातीला तर पहिले सहा महिने मुलांना घरातून बाहेर पडणेही शक्य नव्हते. त्याचे अनेक दुष्परिणाम मुलांवर झाले आहेत. अनेक मुलांची वजने मोठ्या प्रमाणात वाढली. त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी जाता येत नसल्याने शेवटी मोबाईलवरील गेम्स खेळणे, टी.व्ही. समोर तासनतास बसून कार्टुन पाहणे या बाबी वाढल्याने मुलांच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. प्रामुख्याने बाल वयोगटातील मुलांसाठी हे सर्वात धोकादायक ठरले आहे. त्यातच गेले वर्षभर शाळेत जाता आलेले नाही. सर्व शिक्षण ऑनलाईनच सुरु आहे. ऑनलाईन शिक्षण घेणे सर्वांनाच शक्य आहे असे नव्हे. प्रामुख्याने शहरातील गरीब मुले व ग्रामीण भागातील मुलांसाठी हे शिक्षण काही फायदेशीर ठरलेले नाही. कारण अनेक पालकांकडे मुलांना स्वतंत्रपणे देण्यासाठी मोबाईल नाही, तो घेण्याची त्यांची आर्थिक कुवतही नाही. अशा स्थितीत या आर्थिक गटातील मुलांचे शिक्षण थांबले आहे. ऑनलाईन शिक्षणाचा सध्या कितीही गवगवा झाला तरीही त्याच्या अनेक मर्यादा आहेत. तसेच आपल्या देशातील आर्थिक परिस्थिती, ग्रामीण भागात वीजेचा असणारा खेळखंडोबा, नेटचा अभाव या सर्व बाबींचा विचार कोणीच करताना दिसत नाही. त्यामुळे आपल्याकडे ऑनलाईन शिक्षण अजूनही सर्वांपर्यत पोहोचायला बराच कालावधी जाईल. सध्याच्या काळात नाईलाज म्हणून आपण ते स्वीकारले असले तरी देशातील एका गटातील मुले ही वंचितच राहिली आहेत, हे विसरुन चालणार नाही. कोरोनामुळे जे मोठे नुकसान झाले आहे ते या वयोगटातील मुलांचे. त्यांचे शिक्षणही थांबले व त्यांना घरात कोंडल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. कोरोना संपल्यावर पुन्हा शाळा कधी सुरु होतील हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. परंतु गेल्या शतकात ज्यावेळी महामारी आली त्यावेळी किमान तीन वर्षे टिकली होती. आता लस उपलब्ध झाल्याने ही महामारी किमान दोन वर्षात आटोक्यात येईल असे दिसते. यासंदर्भात ब्रिटनचे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांनी देशात झपाट्याने लसीकरण केले व लॉकडाऊनही दीर्घ काळ म्हणजे तीन महिने ठेवला. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण ६० टक्क्यांनी कमी झाले आहेत. आता तेथे लॉकडाऊन उठविण्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे. त्यानंतरच्या टप्प्यात शाळा, महाविद्यालये सुरु होतील. ब्रिटनकडून आपण धडा घेण्याची आवश्यकता आहे. ज्यांना लॉकडाऊन नको आहे ते आपल्याकडे पर्याय काही सुचवित नाहीत, मात्र लॉकडाऊनला विरोध करतात. त्याचबरोबर जगातील बहुतांशी देशात लॉकडाऊन सुरु आहे हे पध्दतशीरपणे विसरतात. आपल्याकडे कुंभमेळ्याला झालेली पंधरा लाख लोकांची कोरोनात झालेली गर्दी पाहता आपल्याकडील लोक व सरकारही कधी सुधारणार अशी शंका येते. लोकांच्या भावनांचा आपण आदर करु परंतु सध्याची परिस्थीती पाहून लोकांमध्ये सरकारने जागृती करुन या कुंभमेळ्याचे आयोजन रद्द करावयास पाहिजे होते. परंतु तसे झाले नाही. उलट सरकारी आशिर्वादाने हा मेळा भरला. त्याउलट आपल्याकडे लस मोहोत्सव जाहीर होतो, मात्र केंद्रावर लस नाही अशी स्थिती आहे. ब्रिटनने आपल्या देशात कोरोनावर विजय मिळविण्यासाठी अशा प्रकारचा कोणताही इव्हेन्ट केला नाही तर वैज्ञानिक दृष्टीकोन डोळ्यापुढे ठेऊन काम केले. सध्या परिक्षा पुढे ढकलल्या आहेत ही बाब चांगली असली तरीही त्या पुढे घ्याव्याच लागणार आहेत. त्यापेक्षा एक वर्षे मुले घरी बसल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर व मानसिकतेवर जे परिणाम झाले आहेत त्याचा विचार प्राधान्यतेने झाला पाहिजे.
0 Response to "नाईलाजास्तव पण आवश्यक"
टिप्पणी पोस्ट करा