-->
भाजपाचा रामनाम जप

भाजपाचा रामनाम जप

संपादकीय पान बुधवार दि. 1 फेब्रुवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
भाजपाचा रामनाम जप
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने भाजपने पुन्हा रामजप सुरू केला आहे. आता हा जप सुरु करुन त्यांना दोन दशके लोटली आहेत. मध्यंतरीच्या काळात भाजपाचे सरकारही सत्तेवर येऊन गेले. मात्र वाजपेयी यांच्या सरकारला राम मंदिर काही उभारता आले नाही. आत्ताच्या सरकारनेही राम मंदिर उभारणीच्या दिशेने काहीच पावले टाकलेली नाहीत. असे असले तरीही त्यांना निवडणुकीच्या राजकारणात आता राम तारेल अशी अपेक्षा वाटते. राम मंदिर उबारणे शक्य नसेल तर भाजपाने तसे स्पष्ट करावे. कारण आता मुंबईतील पश्‍चिम रेल्वेवरील उपनगराच्या एका नव्या स्टेशनला त्यांनी राम मंदिर हे नाव देखील देऊन टाकले आहे. अयोध्येतील राम मंदिराची निदान अशा प्रकारे तरी त्यांनी भरपाई केली असे म्हणता येईल. असो. आता पुन्हा एकदा उत्तरप्रदेश सत्तेत आल्यास राम मंदिराची उभारणी करण्याचे वचन भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी लोककल्याण संकल्पपत्र या नावाने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. राममंदिराच्या मुद्दयावर भाजप ठाम आहे. घटनात्मक तरतुदीनुसार राममंदिर बांधण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे शहा यांनी यावेळी स्पष्ट केले. या जाहीरनाम्यात तोंडी तलाकचा मुद्दाही समाविष्ट करण्यात आला आहे. सत्तेवर आल्यानंतर महिलांची मते जाणून घेऊन सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडण्यात येईल, असे शहा यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात दोन-तृतीयांश बहुमताने सत्ता मिळवण्याचा दावाही शहा यांनी केला आहे. राज्यातील सत्ताधारी समाजवादी पक्षाबरोबरच बहुजन समाज पक्षावरही शहा यांनी टीकास्त्र सोडले. बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांपैकी उत्तर प्रदेशवगळता सर्व राज्ये विकसित झाली आहेत. गेली 15 वर्षे सप आणि बसप या दोन पक्षांनी राज्यात सत्ता उपभोगली. मात्र, या मागास राज्याच्या विकासासाठी काहीच केले नाही, असा आरोप त्यांनी केला. उत्तर प्रदेशात विकासासाठी केंद्र सरकारने एक लाख कोटींचा निधी मंजूर केला. पण, प्रत्यक्षात राज्यात काहीच विकास झालेला नाही. शिवाय राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. सत्ताधारी पक्षांच्या गुंडांनी भूखंड लाटले आहेत. यामुळे सपने काँग्रेसशी आघाडी केली असली तरी मतदार त्यास भूलणार नाहीत, असे शहा म्हणाले. भाजपाच्या जाहिरनाम्यात विद्यापीठांत मोफत वायफाय सुविधा, वर्षभर एक जीबी डेटा मोफत, सर्व विद्यार्थ्यांना लॅपटॉप,  जातीय तणावामुळे होणारे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर विशेष पथक, 15 मिनिटांत पोलीस मदत मिळण्यासाठी हेल्पलाईन, छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी महाविद्यालयांजवळ विशेष पथके, राज्यातील बेकायदा खाणकाम रोखण्यासाठी विशेष कृती पथक, गैरप्रकार टाळण्यासाठी तिसर्‍या आणि चौथ्या श्रेणीतील नोकर्‍यांच्या भरतीसाठी मुलाखत घेण्यात येणार नाहीत अशी वचने दिली आहेत. अर्थात ही वचने देखील यापूर्वी देण्यात आली होती. त्यांचीही तर्‍हा राम नामाच्या जपाप्रमाणेच झाली आहे.

0 Response to "भाजपाचा रामनाम जप"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel