-->
ट्रम्प यांची अराजकनिती

ट्रम्प यांची अराजकनिती

संपादकीय पान मंगळवार दि. 31 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
ट्रम्प यांची अराजकनिती
अमेरिकेचे नव्याने सुत्रे हाती घेतलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिम देशातील नागरिकांना सध्यातरी 90 दिवसांसाठी अमेरिका बंदी जारी केली असून त्यामुळे जगात एकच खळबळ माजली आहे. इराक, सिरीया, इराण, सुदान, लिबिया, सोमालिया व येमेन हे ते सात मुस्लिम देश आहेत. सिरीयातील निर्वासितांना कायम स्वरुपाची बंदी घालण्यात आली आहे. तर जगातून अमेरिकेत येणार्‍या निर्वासितांना 120 दिवसांसाठी मनाई करण्यात आली आहे. आजवर अमेरिकेत निर्वासितांना स्वीकारले जाण्याचा जो कार्यक्रम होता तोच आता स्थगित करण्यात आला आहे. तर यंदा 2017 साली केवळ 50 हजार निर्वासित स्वीकारले जाणार आहेत. गेल्या वर्षी अमेरिकेने 1.1 लाख निर्वासित स्वीकारले होते. अर्थात आता जे निर्वासित स्वीकारले जाणार आहेत, त्यापैकी ख्रिश्‍चन निर्वासितांना प्राधान्य दिले जाणार आहे. पाकिस्तान, सौदी अरेबिया व अफगाणिस्तान या देशातील नागरिकांना अमेरिकेत जाताना आता कडक तपासणीला सामोरे जावे लागेल. इराकने याव उत्तर देताना अमेरिकन नागरिकांना आपल्या देशात येण्यासाठी बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या या नव्या आदेशाला खुद्द अमेरिकेतून जोरदार विरोध सुरु झाला असून 12 नोबल पदक विजेत्यांनी व हजारो शिक्षण क्षेत्रातील नामवंतांनी सह्यांचे निवेदन या विरोधात देण्यास सुरुवात केली आहे. तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी सरकारच्या या निर्णसाबद्दल खेद व्यक्त केला असून अमेरिकेत चांगले तंत्रज्ञ येण्यावर यातून मर्यादा येतील असे म्हटले आहे. तर फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी देखील अमेरिकी सरकारच्या या निर्णावर टीका केली आहे. मी देखील काही काही दशकांपूर्वी एक निर्वासितच होतो व आता तर माझ्या पत्नीचे कुटुंब आता अमेरिकेत येऊ शकणार नाही, असे झुकेरबर्ग यांनी सांगून खंत व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी घेतलेल्या या निर्णायाचा केवळ सात मुस्लिम देशांवर परिणाम होईल असे नाही तर संपूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. मुळातच अमेरिका ही निर्वासितांची भूमी आहे असे मोठ्या अभिमानाने सांगितले जाते. जगातील विविध लोकांनी इथे येऊन आपले संसार थाटले व या देशाची भरभराट केली. याच निर्वासितांच्या कष्टावर अमेरिकेची आजची संपत्ती दिसत आहे. आज ट्रम्प यांच्या या कृतीमुळे अमेरिकेच्या मूळ गाभ्यावरच हल्ला केल्यासारखे आहे. सर्वात वाईट बाब म्हणजे धर्माच्या नावावर विभागणी जगाची होण्याचा सर्वात मोठा धोका आहे. कारण एकीकडे निर्वासित घ्यायचे असतील तर केवळ ख्रिश्‍चनच स्वीकारु असे म्हणणे म्हणजे ख्रिश्‍चन व मुस्लिम किंवा अन्य धर्मियांमध्ये आत्तापासूनच भांडणे लावून देण्याचा हा प्रकार होणार आहे. पूर्वी जगाभोवती शीतयुद्दाचा धोका होता. आता हा धोका संपून तब्बल चार दशके ओलांडली आहेत. मात्र आता जग धर्माच्या आधारावर विभागले जाण्याचा धोका आहे. सध्या ट्रम्प ज्या मुस्लिम दहशतवादाचा धोका दाखवून निवडून आले व त्यांनी ज्या सात देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्याची बंदी घातली आहे त्या देशातून अमेरिकेतला व्टीन टॉवर पाडायला अतिरेकी आलेच नव्हते. भले ते मुस्लिम होते, मात्र त्या देशाचे रहिवासी नव्हते, हे ट्रम्प आज विसरत आहेत. अतिरेक्यांना कोणताही धर्म नसतो. अतिरेकी ही विध्वंसक प्रवृती आहे.आपल्याकडेही हिंदु अतिरेकी जन्माला आलेच होते व त्यांनी काही ठिकाणी बॉम्ब स्फोट केलेच होते. यातून काही देशातील अतिरेकी कारवाया थांबल्या नाहीत. अतिरेकी प्रवृत्ती संपविण्यासाठी अशा प्रकारची टोकाची भूमिका स्वीकारणे म्हणजे अतिरेक्यांना आणखीनच चेवातणी दिल्यासारखे आहे. यातून भविष्यात मुस्लिमांचा अमेरिका विरोध हा टोकाचा जाणार आहे. यातून जगात मुस्लिम विरुध्द अन्य धर्मीय अशी विभागणी होणार आहे. आपल्याकडे ट्रम्प यांचे स्वागत करणारे महाभाग निघतील. प्रामुख्याने टोकाचा हिंदुत्ववादी विचार मांडणार्‍यांना मुस्लिमांना धडा शिकविण्यास प्रारंभ केल्यामुळे ट्रम्प यांचे कौतुक वाटेल. ट्रम्प यांच्या धाडसाचे कौतुकही केले जाईल. मात्र यातून दीर्घकालीन वाईट परिणाम दिसतील. यातून जगातील अतिरिकी प्रवृत्ती संपणार नाहीत वा अमेरिकेने आपल्याला मुस्लिम देशांपासून विभक्त केले तरी अमेरिका अतिरेक्यांपासून मुक्त राहू शकणार नाही. कारण आता जग हे जवळ येत आहे व जगापासून कोणताही देश अलिप्त राहू शकत नाही. मग तो व्यापार असो किंवा अतिरेकी कारवाया. अर्थात हे समजायला ट्रम्प यांना काही काळ लागेल.  अमेरिकेत व्टीन टॉवर पाडल्यावर अतिरेकी कारवायांमुळे जेवढ्या लोकांचे जीव गेले त्याहून जास्त जीव हे अमेरिकेत बंदुकींचे मुक्त परवाने असल्यामुळे गेले आहेत. अतिरेक्यांच्या कारवाया या केवळ बिगर मुस्लिम राष्ट्रात आहेत ही चुकीची समजुत आहे. आपण पाकिस्तानमध्ये दररोज होणारे बॉम्ब स्फोट पाहिल्यावर आपल्याला हे वास्तव स्पष्टपणे दिसू शकते. ट्रम्प यांच्या धोरणाचा आपल्याला अप्रत्यक्षरित्या परिणाम भोगावा लागणार आहे. आपल्या देशातील आय.टी. उद्योगाला त्याचा सर्वाधिक फटका बसेल. नजिकच्या काळात जर अमेरिकेने नोकरीसाठी व्हिजा देण्यावर  निर्बंध आणले तर सर्वात जास्त भारताचे नुकसान होणार आहे. अर्थात ट्रम्प यांच्या अजेंडावर हा विषय आहेच. ट्रम्प यांच्या मुस्लिम विरोधामुळे आपल्याकडील सत्ताधारी व हिंदुत्ववादी त्यांच्यावर खूष होतील, मात्र ट्रम्प यांची निती अराजकाकडे नेणारी आहे, हे आपल्या लवकरच लक्षात येईल.
-----------------------------------------------------------------------

0 Response to "ट्रम्प यांची अराजकनिती"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel