-->
संपादकीय पान गुरुवार दि. १७ जुलै २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------------
संघ (मोदी) बोले वैदीक चाले...
-----------------------------------------
आपल्याला स्वत: पत्रकार म्हणून घेणारे असे अनेक जण आपल्याला या देशात भेटतील. ते कधी मुक्त पत्रकार म्हणून वावरतात तर कधी स्तंभलेखक. राजकीय वर्तुळात वावरुन आपण राजकारण्यांना कसे सल्ले देतो हे दाखविणार्‍या पत्रकारांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. असेच एक तथातकथीत पत्रकार वेदप्रकाश वैदीक सध्या राजकीय धुमाकूळ घालीत आहेत. या वैदीक महाशयांनी देशाचा शत्रू व कट्टर अतिरेकी, मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याची लाहोरमध्ये भेट घेऊन चर्चा केली. वैदीक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असल्याने तसेच रामदेव बाबांचे सल्लागार व प्रसिध्दी प्रमुख असल्याने त्यांनी घेतलेल्या या भेटीमुळे वादळ उठणे स्वाभाविकच होते. अर्थात संघाने आपला संबंध वैदीक यांच्याशी नसल्याचे सांगून अंगावरुन पाल झटकल्यासारखे केले आहे. तर दुसरीकडे विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनीही याचा सरकारशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. हे जरी खरे असले तरीही वैदीक हे पाकिस्तानात जाऊन हफिस सईदशी निव्वळ गप्पा करायला गेले होते असे म्हणणे मुर्खपणाचे ठरेल. त्यांच्यामागे सरकारमधील काही शक्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे पंतप्रदान नरेंद्र मोदी हे विदेशात गेले असताना ही बातमी फुटली आहे. या घटनेच्या निमित्ताने मोदी व त्यांचे सल्लागार एकाच वेळी आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांना तसेच संघ परिवाराला अंधारात ठेवून पाकिस्तानसोबत शिष्टाई करत असल्याचे गृहीतक  मांडले जात आहे. अर्थात ही शक्यता काही नाकारली जाऊ शकत नाही. वैदिक, भारत आणि अमेरिकेला हवा असलेल्या मोस्ट वॉंटेड दहशतवाद्याची लाहोरमध्ये सहजपणे भेट घेऊ शकतात व त्याचबरोबर ते पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचीही सदिच्छा भेट घेतात, त्यामागची व्यूहरचना काय असू शकते? जून महिन्यात भारतातील काही पत्रकार व कॉंग्रेसचे मणिशंकर अय्यर व सलमान खुर्शीद हे माजी मंत्री पाकिस्तानच्या दौर्‍यावर गेले होते. ही मंडळी मायदेशी परतली, पण वैदिक मात्र पाकिस्तानात हाफिज सईदची भेट घेण्यास थांबले होते. पण हाफिज सईद याला आपली भूमिका मांडायची असेल, तर त्याने अधिकृतपणे शिष्टमंडळाशी चर्चा केली असती. त्याने फक्त वैदिकांशीच चर्चा का केली, अन्य भारतीय पत्रकारांना भेट का दिली नाही, हा एक प्रश्न आहे. हाफिज सईद याचा पाकिस्तानातील राजकारणात दबाव वाढत चालला आहे. त्याने अमेरिकेचा लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेमागील ससेमिरा कमी व्हावा म्हणून जमात-उद-दवा या संघटनेला जन्म दिला होता. ही संघटना सामाजिक कार्य करणारी संस्था असा त्याचा दावा आजही आहे.  हाफिज सईदचा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतावर मोठ्या प्रमाणात प्रभाव असल्याने नवाझ शरीफ सरकारला विजय मिळवणे शक्य झाले होते. सईद भेटीसंदर्भात खुद्द वैदिक यांनी प्रसारमाध्यमांना समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. मोदींची ख्यालीखुशाली पोहोचवण्यापलीकडे त्यांनी सईदला कोणते प्रश्न विचारले आणि सईदने काय उत्तरे दिली, याचाही तपशील त्यांनी जाहीर केलेला नाही. वस्तुत: पत्रकार म्हणून वैदीक एखाद्या देशाच्या अध्यक्षापासून गुंड-माफिया अशी कुणाचीही भेट घेऊ शकतात. त्याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही. त्यांनी याअगोदर पत्रकार म्हणून एलटीटीई या दहशतवादी संघटनेचा नेता प्रभाकरन याचीही मुलाखत घेतली होती. पण सध्या ते मुक्त पत्रकार आहेत व मोदी यांचे सरकार सत्तेवर येऊन केवळ ४५ दिवस झाले असताना हाफिज सईदसारख्या दहशतवाद्याची सहजगत्या भेट घेऊन ते भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये कोणता क्रांतिकारक बदल आणू इच्छितात हे  मात्र स्पष्ट होत नाही. वैदीक यांच्या या मुलाखतीच्या वृत्तानंतर त्यांनी पाकिस्तानाबाबत जी वादग्रस्त विधाने केली आहेत त्याबद्दल तर खरे तर त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला जाऊ शकतो. परंतु भाजपाचे हे सरकार करणार नाही. कारण वैदीक हे शेवटी त्यांच्याच कळपातले आहेत. खरे तर आपण मोठी काही राजनैतिक डिप्लोमसी करीत आहोत असे भासविणार्‍या वथैदिकांनी आपल्या कृत्याने भाजपाला व त्यांच्या सरकारला अडचणीत आणले आहे.
---------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel