-->
संपादकीय पान शनिवार दि. १८ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
पोलियो हद्दपार झाला, आता पुढे...
------------------------------
आपल्या देशात गेल्या तीन वर्षात पोलियोचा एकही रोगी न आढळल्याने आपण या रोगाला हद्दपार केले आहे. आपल्यापुढे पोलियोचे एक मोठे आव्हान होते हे खरेच. कारम वीस वर्षापूर्वी आपल्याकडे दरवर्षी सुमारे दोन लाखाहून जास्त लोकांना पोलियो होत असे. यात बहुतांशी बालके असायची. पोलियो हा रोग शंभर टक्के बरा होणार्‍यातला नाही. एकदा जर तो झाला तर आयुष्यभर आपली काही साथ सोडत नाही. त्यामुळे या रोगाचे समूळ उच्चाटन करण्याची गरज होती. गेल्या दहा वर्षापूर्वी जागतिक आरोग्य संघटना व विविध सामाजिक संस्थांनी भारत सरकारच्या सहाय्याने पोलियो निर्मुलनाचा महात्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. आपल्या सारख्या अवाढव्य पसरलेल्या देशाच्या कानाकोपर्‍यात वर्षातून एकदा पाच वर्षाखालील मुलाला पोलियोचे औषध तोंडावाटे देणे हे सोपे नव्हते. परंतु हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झाला. स्वातंत्र्यानंतर आपण प्लेग या रोगावरही मात केली होती. परंतु पोलियोचे आव्हान हे त्याहून मोठे होते. आपल्या साडेसात लाख खेड्यात प्रत्येक घरी सरकारी यंत्रणेने पोहोचून पोलियोची ही लस देणे हे फारच अवघड काम होते. हे ज्यावेळी सुरु झाले त्यावेळी अन्य सरकारी योजनांप्रमाणे याचाही बोजवारा उडेल असे अनेकांनी भाकित केले होते. मात्र सरकारी अधिकार्‍यांनी ही योजना यशस्वीरित्या राबवून यशस्वी करुन दाखविली. त्याचे श्रेय या यंत्रणेला दिले गेले पाहिजे. पोलियोच्या लसेचा प्रचार करण्यासाठी अमिताभ बच्चन यांना सोबत घेण्यात आले होते. ऐवढ्या मोठ्या अभिनेत्याला सोबत घेतल्यानेही याचा प्रचार जोमाने झाला हे विसरता येणार नाही. जवळपास २४ लाख स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी झटत होते. रविवारी ज्यांनी लस घेतली नसेल त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन ती लस देण्याचे काम या स्वयंसेवक महिलांनी केले. देवी, कुष्ठरोग या रोगांवर आपण मात केली असली तरीही पोलियो चे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी जी यंत्रणा उभारण्यात आली त्याची जगात स्तुती झाली. त्यामुळे आपल्याकडे शासकीय यंत्रणा ही प्रत्येक कामात कुचकामी ठरते असे नव्हे . या यंत्रणेने ठरविले तर ते नियोजनबद्ध काम करुन दाखवू शकतात हे पोलियो मोहिमेने दाखवून दिले आहे. परंतु या यशाने भूरळून जाता कामा नये. कारण आपण पोलियोत मोठे यश मिळविले असले तरीही एकूणच आरोग्याचा विचार करता आपल्याला मोठा पल्ला गाठावयाचा आहे. आपल्याकडे आरोग्याकडे सरकार अपेक्षेऐवढे लक्ष देत नाही हे वास्तव नाकारता येणार नाही. आपण देशाच्या एकूण अर्थसंकल्पात दोन टक्के रक्कमच आरोग्यावर खर्च करतो. त्यातच आपल्याकडे ग्रामीण भागात तर आरोग्याच्या सोयीसुविधा देखील तेवढ्या नाहीत. स्वातंत्र्यानंतर ६६ वर्षानंतरही आपण आरोग्याच्या बाबतीत शंभर टक्के चोख काम केलेले नाही. शहरात आता मध्यमवर्गीय आरोग्य विम्याचा पर्याय स्वीकारतात. परंतु हा विमा काढणे प्रत्येक कुटुंबाला काही परवडत नाही. त्यातच औषधे ही देखील परवडणारी नाहीत. अशा स्थितीत गरीबांना सरकारी रुग्णालयांशिवाय कोणताच आधार नसतो. आणि ही रुग्णालये पुरेशा नाहीत. अशा वेळी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याची नितांत आवश्यकता आहे. एकीकडे पोलियोचा कार्यक्रम आपण यशस्वी केला असताना देशातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर आता लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आली आहे.
--------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel