-->
संपादकीय पान शनिवार दि. १८ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
कॉंग्रेसचा सावध पवित्रा
-----------------------
कॉँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत कॉँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहूल गांधी यांचे नाव जाहीर होणार अशी अनेकांची अटकळ होती. अनेक वृत्तपत्रे व चॅनेल्सनी तशा बातम्या प्रसूत करण्यास प्रारंभ केला होता. त्यामुळे आजवरची परंपरा मोडीत काढून कॉँग्रेस पंतप्रधानाचा उमेदवार जाहीर करणार असे अनेकांना वाटू लागले होते. परंतु या सर्वांचे अंदाज अखेर पक्षाध्यक्षा सोनियां गांधींनी खोटे ठरविले. भाजपाने आपले पंतप्रधानांचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केल्यावर नरेंद्र मोदी ज्या गतीने प्रचाराच्या फैरी झाडत आहेत ते पाहता कॉँग्रेसनेही आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून राहूल गांधींच्या नावाची घोषणा करावी असे पक्षात वातावरण तयार होते. राहूल गांधींनी देखील आपण पक्ष जी कामगिरी सोपवेल ती स्वीकारण्यास तयार आहोत असे विधान करुन त्यादृष्टीने वातावरणात आणखी भर घातली होती. त्यातच आधारचे सर्वेसर्वा व टेक उद्योगपती नंदन निलकीणी यांचे नाव कॉँग्रसेचे पंतप्रधान म्हणून जाहीर करतील असे वृत्त प्रसिध्द झाले होते. त्यामुळे यावेळी कॉँग्रेस पक्ष भाजपाच्या पावलावर पाऊल टाकून आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करणार मग ते राहूल असोत वा निलकीणी असा अनेकांचा होरा होता. मात्र हे सर्व अंदाज खोटे ठरवून १२८ वर्षीय जुन्या असलेल्या या पक्षाने आपली परंपरा कायम ठेवण्याचे जाहीर केले. अर्थात आपल्याकडे काही अध्यक्षीय लोकशाही नाही. त्यामुळे एका व्यक्तीच्या नावे कुणी मते मागीत नाही. जे सदस्य लोकशाही मार्गाने संसदेत निवडून येतात त्यातून पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडला जावा अशी अपेक्षा असते. केवळ कॉँग्रेस पक्षच नव्हे तर अन्य पक्ष देखील अशीच प्रथा पाळतात. मागच्या वेळी भाजपाची ज्यावेळी सत्ता आली होती त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले नव्हते. असो. सध्याच्या स्थितीत तर कॉँग्रेस पक्ष पंतप्रधानपदाचा उमेदवार अगोदर जाहीर करुन आपल्या पायावर धोंडा पाडून घेणार नाही. कारण यावेळी कॉँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांची आघाडी काही सत्तेवर येणार नाही. अशा स्थितीत त्यांनी पंतप्रधानपदी राहून गांधीचे नाव अगोदरच जाहीर करणे अवसानघातकी ठरले असते. कॉँग्रेसची सत्ता येणार नाही हे नक्की असताना राहूल गांधींची घोषणा केल्यास ते काही सत्ता खेचून आणू शकत नाहीत. म्हणजे राहूल गांधी हे काही मते मिळविण्याचे मशिन नाही हे निकालांनतर सिध्द झाले असते. अशा स्थितीत सावध भूमिका घेत आपल्या परंपरेशी निष्ठा दाखवित राहूल गांधींच्या नावाची घोषणा न करण्याची शिताफी सोनिया गांधींनी केली आहे. अर्थात यावेळी कॉँग्रेस पक्षाची गेले दहा वर्षे असलेली सत्ता यावेळी पुन्हा येणार नाही हे स्पष्टच आहे. गेल्या महिन्यात चार राज्यातल्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाचे पूर्णपणे पानीपत झाले आहे. त्यामुळे आता त्यांच्या सहकारी पक्षांमध्येही चलबिचल वाढली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचा तर कधीच भरवसा देता येणार नाही. या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनाच मुळात पंतप्रधानपदावर डोळा आहे. आणि त्यांच्यादृष्टीने ही संधी गेली तर पुन्हा मिऴणे अश्यक्यच आहे. सध्या केंद्रातले सरकार समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाच्या टेकूवर उभे आहे. या पक्षातूनही मुलायमसिंग यादव व बहेन मायावती यांना पंतप्रधान व्हायचे आहे. तामीळनाडूतील द्रमुक पक्षाने येत्या निवडणुकीत कॉँग्रेससोबत न जाण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे कॉँग्रेसचे सर्व साथीदार बिथरले आहेत. कुणालाच जर बहुमत मिळाले नाही तर पैशाच्या जोरावर पंतप्रधान होण्याची तयारी अनेक पक्षातील नेत्यांनी ठेवली आहे. या पार्श्‍वभूमीवर राहूल यांना पंतप्रधान म्हणून जाहीर करणे कॉँग्रेसला परवडणारे नाही. गांधी घराण्यातील जाहीर केलेला नेता जर फिका पडला तर कॉंग्रेसची नाचक्की होणार आहे. ही नाचक्की टाळण्यासाठीच राहूल यांचे नाव मतदानाअगोदर जाहीर करण्यास सोनिया गांधी तयार होण़ार नाहीत हे वास्तव होते. भाजपाने सध्या मोठा गाजावाजा करुन नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे केले आहे आणि त्याची एवढी हवा निर्माण केली आहे की, कधी कधी असे वाटावे की आता फक्त नरेंद्र मोदी यांचा शपथविधीच शिल्लक आहे. परंतु भाजपाची देशातील ताकदीचा विचार करता व नरेंद्र मोदी यांच्या नावाला असलेला विरोध पाहता मोदी पंतप्रधानपदापर्यंत पोहोचणार नाहीत हे खरेच आहे. त्यामुळे जे भाजपावाले सध्या मोदींची स्तुतीसुमने उधळत आहेत त्यांची प्रतिक्रिया पारभवानंतर काय असेल, याचा विचार न केलेला बरा. म्हणूूनच सोनिया गांधी यांनी आपली सत्ता येणार नाही हे ओळखूनच आपल्या पुत्राच्या नावाची घोषणा केलेली नाही. यातून कॉँग्रेस आता पराभवाच्या मूडमध्ये गेली आहे हे देखील सिध्द होते. गेल्या दहा वर्षात कॉँग्रेस पक्षाने जनतेच्या लाभाच्या कोणत्याही योजना राबविल्या नाहीत किंवा ठोस कामेही केलेली नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये कॉँग्रेस विरोधाची जबरदस्त लाट आहे. या लाटेवर भाजपा देखील स्वार होऊ शकत नाही कारण त्यांच्या विरोधातही तेवढेच वातावरण आहे. अशा वेळी दिल्लीत लोकांच्या मनातील रोष ओळखून मते काबीज करण्याचे काम आम आदमी पक्षाने केले. देशपातळीवर विचार करता ही पोकळी तिसरी आघाडी भरुन काढू शकते.
------------------------------
   

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel