
अलविदा... टाटा (अग्रलेख)
गेली 21 वर्षे टाटा समूहाच्या प्रमुखपदी असलेल्या रतन टाटा यांनी वयाची पंचाहत्तरी पार केल्याने सायरस मिस्त्री यांच्या ताब्यात सर्व सूत्रे देऊन ते आज निवृत्त होत आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात सायरस मिस्त्री यांची रतन टाटा यांचे वारसदार म्हणून घोषणा होण्याअगोदर भविष्यात टाटा समूहाचे नेतृत्व कुणाकडे येणार, याची चर्चा कॉर्पोरेट जगतात रंगत होती. टाटा आडनाव असलेलीच व्यक्ती या पदी असेल किंवा नाही; याबाबत सर्व चर्चेचा रोख असतानाच टाटा आडनाव नसलेल्या सायरस मिस्त्री यांच्या नावाची घोषणा झाली आणि याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. यापूर्वी 1932 ते 38 या काळात जमशेटजी टाटांच्या बहिणीचा मुलगा सर नवरोजी सकतवाला यांच्याकडे समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे होती. सकतवाला यांचे आडनाव टाटा नसले तरीही ते टाटा घराण्यातीलच होते. आता मात्र टाटा घराण्यात नसलेली व्यक्ती; मात्र पारशी समाजातील तसेच टाटा घराण्याशी जुने संबंध असलेल्या मिस्त्री घराण्यातील थोरली पाती आता देशातील सर्वात जुन्या व प्रतिष्ठित उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदी विराजमान झाली आहे. असे करण्यावाचून टाटा समूहाकडे कोणताच पर्याय नव्हता, असे नव्हे. कारण वारस म्हणून टाटा घराण्यातीलच व्यक्ती निवडायची, असा निकष असता तर नोएल टाटा यांची निवड या जागी होऊ शकली असती; परंतु टाटा सन्स या टाटा समूहाच्या होल्डिंग कंपनीतील मिस्त्री घराण्याचा असलेला मोठा भांडवली वाटा लक्षात घेता एकप्रकारे सायरस यांची निवड होताना ‘कॉर्पोरेट कू’ झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही. याविषयी असलेले गॉसिप एक वेळ बाजूला ठेवले तरी या निमित्ताने टाटा समूहाने टाटा आडनाव नसलेली व्यक्ती नेतृत्वपदी नेमून आपली व्यावसायिकता सिद्ध करून दाखवली आहे. 1991मध्ये रतन टाटा यांनी जे.आर.डी. टाटा यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, त्या वेळी आपल्याकडे आर्थिक उदारीकरणाचा पाया रचला जात होता. या नव्या आर्थिक वातावरणात आपला कसा काय टिकाव लागेल, अशी भीती देशातील अनेक उद्योजकांना होती. त्यात रतन टाटाही अग्रभागी होते. म्हणूनच रतन टाटा हे बिर्ला, बजाज, गोदरेज यांनी देशी उद्योजकांना संरक्षण मिळावे यासाठी स्थापन केलेल्या ‘बॉम्बे क्लब’मध्ये सहभागी झाले होते. मात्र, लवकरच भारतीय उद्योगपतींची ही भीती ओसरली आणि हा क्लब अल्पजीवीच ठरला. या पार्श्वभूमीवर रतन टाटांनी जागतिकीकरणाचा वेध घेत आपल्या समूहाची संपूर्ण फेररचना करण्याचे ठरवले. समूहात तरुण रक्ताला वाव मिळावा यासाठी रुसी मोदी, अजित केरकर, नानी पालखीवाला, जे. इराणी यांसारख्या ढुढ्ढाचार्यांना निवृत्तीचे बंधन घालून सन्मानाने घरी पाठवले. समूहातील प्रत्येक कंपनीला टाटा हे नाव लावणे बंधनकारक केले आणि त्यांना त्याची दरवर्षी काही ठरावीक रॉयल्टी देणे भाग पाडले. अशा प्रकारे समूहातील कंपन्यांची तटबंदी एकीकडे मजबूत करत असताना समूहातील प्रत्येक कंपनी जागतिक दर्जाची कशी होईल, याची योजना आखली. काही उद्योगांतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या धोरणाचा एक भाग म्हणून टॉम्को व लॅक्मे हिंदुस्तान लिव्हरला विकल्या, त्या वेळी रतन टाटांच्या धोरणावर जोरदार टीका झाली. उदारीकरणाच्या रेट्यात भारतीय कंपन्या आता बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भक्ष्यस्थानी पडण्याची भीती व्यक्त झाली; परंतु टाटा यांचे या कंपन्या विकण्याचे धोरण योग्यच होते, हे काळाने सिद्ध केले. टाटा यांनी आपल्या समूहाचे कार्यक्षेत्र सात उद्योगांपुरते निश्चित करून त्या उद्योगांतील कंपनी देशात पहिल्या तीन क्रमांकांत आणण्याचे उद्दिष्ट बाळगले. त्यांचे हे धोरण यशस्वी ठरले आणि हळूहळू देशात आक्रमकरीत्या वाटचाल करताना टाटा समूहाने जागतिक बाजारपेठेत भरारी घेतली. पुढे रतन टाटांनी ब्रिटनची कोरस, जग्वार-लँड रोव्हर, टेटली टी, दक्षिण कोरियाची देऊ मोटार्स या कंपन्या ताब्यात घेऊन समूहाला जागतिक स्तरावर नेले. जगातली स्वस्त कार म्हणून ओळखली गेलेली नॅनो रतन टाटांच्या संकल्पनेतून साकारली. रतन टाटा निवृत्त होत असताना समूहातील 100 कंपन्यांपैकी 31 कंपन्यांची नोंद शेअर बाजारात असून त्यांचे बाजारातील भांडवली मूल्य सुमारे 90 अब्ज डॉलर्सवर गेले आहे. समूहाच्या एकूण उलाढालीतील 58 टक्के वाटा हा विदेशातून येतो, त्यामुळे टाटा समूह हा खºया अर्थाने बहुराष्ट्रीय झाला आहे. त्याहून सर्वात महत्त्वाचे म्हणजे, टाटा हा ब्रँड आता जगात प्रतिष्ठित म्हणून मान्यता पावला आहे. अशा एका उंचीला टाटा समूहाला नेऊन ठेवले असताना रतन टाटा निवृत्त होत आहेत. सायरस मिस्त्री ‘बॉम्बे हाऊस’मध्ये नेतृत्वाची सूत्रे स्वीकारत असताना आता त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. टाटा समूहाचा व्याप 80 देशांत असला तरीही प्रमुख्याने ब्रिटन व युरोपातील उलाढाल जास्त आहे. सध्या हा भाग मंदीच्या छायेत असल्याने टाटा समूहापुढे अनेक आव्हाने उभी आहेत. कोरसचे टेकओव्हर हे तेजीच्या काळातले असल्याने आता जागतिक मंदीत टाटा स्टीलपुढील संकटे वाढण्याची शक्यता आहे. मात्र, जग्वार व लँड रोव्हरचे फायदे टाटा मोटर्सला मिळू लागले आहेत. त्याच वेळी देशातील स्पर्धेत टाटा मोटर्स मागे पडत आहे. नॅनोलाही अपेक्षित यश मिळालेले नाही. रतन टाटा यांनी ज्या वेळी समूहाची सूत्रे घेतली, त्या वेळी असलेल्या प्रश्नांच्या तुलनेत आता मिस्त्री यांच्यापुढील प्रश्न फार वेगळे आहेत. टाटा समूहाची परंपरा, त्यांनी स्वीकारलेले सामाजिक दायित्व या बाबी जपताना मिस्त्री यांना टाटा समूहाचा विस्तार झपाट्याने करून रतन टाटा यांच्यापेक्षा चार पावले पुढे जावे लागणार आहे.
0 Response to " अलविदा... टाटा (अग्रलेख) "
टिप्पणी पोस्ट करा