-->
संपादकीय पान बुधवार दि. १६ जुलै २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
खटारा भर वैभव
---------------------------------
शेतकरी कामगार पक्षाचे असलेले निवडणूक चिन्ह खटारा आता निवडणूक आयोगाने पुन्हा बहाल केले आहे. १९९४ साली हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठविले होते. मात्र तेव्हापासून हे चिन्ह परत मिळविण्यासाठी विविध पातळ्यांवर लढाई सुरु होती. अखेर त्या लढ्याला यश आले. पक्षाच्या सरचिटणीसपदी आमदार भाई जयंत पाटील यांची नियुक्ती झाल्यावर त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांपुढे बोलताना खटारा परत मिळवून देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते. आता या आश्‍वासनाची पूर्तता झाल्याने पक्षाचे वैभव परतले आहे अशी कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे. शेकापच्या बाबतीत खटारा निवडणूक चिन्ह हा अतिशय संवेदनाक्षम असा प्रश्‍न होता. कारण पक्षाच्या स्थापनेपासून हेच निवडणूक चिन्ह होते. त्यामुळे हे चिन्ह आपण गमावल्याची सल कार्यकर्त्यांमध्ये होती. शेेकाप हा डाव्या विचारसारणीचा केडरबेस पक्ष असल्याने पिढ्यानपिढ्या शेकापची बांधीलकी जपणारी अनेक घराणी आपल्याला दिसतात. या कार्यकर्त्यांसाठी खटार्‍याची बांधिलकी जशी वैचारिकरित्या होती तशीच भावनात्मकही होती. कामगार, कष्कर्‍यांच्या संघर्षाचे प्रतिक असलेला लाल बावटा शेकापचे कार्यकर्ते जसे मोठ्या दिमाखात खांद्यावर घेतात तसेच खटारा हा त्यांच्यासाठी एक प्रतिकात्मक होता. खटारा म्हणजे शेतकर्‍याच्या जीवनातील एक महत्वाचा घटक. अगदी आता आपण आधुनिकतेच्या जेट युगात वावरत असलो तरीही खटारा काही कालबाह्य झालेला नाही आणि होणारही नाही. खटारा या चिन्हाचे अनेकांना आकर्षण होते. १९९९ साली भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती, त्यावेळी त्यांनी खटारा हे चिन्ह घेतले होते. प्रत्येक पक्षासाठी त्यांचे निवडणूक चिन्ह हे महत्वाचे ठरते. त्या पक्षाची विचारधारा त्यांच्या निवडणूक चिन्हातून प्रतिबिंबित होत असते. केवळ शेकापच नव्हे तर अन्य पक्षांच्या चिन्हांचा इतिहास पाहिल्यास आपल्याला ते जाणवते. स्वातंत्र्यानंतर सत्ताधारी झालेल्या कॉँग्रेस पक्षाने त्यावेळी आपले निवडणूक चिन्ह म्हणून बैलजोडी घेतली होती. त्याचवेळी शेकापने खटारा स्वीकारला. त्याकाळी आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून असल्याने या दोन्ही पक्षांनी शेतकर्‍याशी निगडीत असे चिन्ह स्वीकारले होते. शेकापचा खटारा कायम टिकला. कॉँग्रेसने मात्र नंतर बैलजोडी वगळून आपले चिन्ह गाय-वासरु स्वीकारले. हे चिन्ह प्रदीर्घ काळ होते. १९८० साली इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि इंदिरा कॉँग्रेस  पक्षाने हाताची निशाणी स्वीकारली. यातून शेवटी गाय-वासरु चिन्ह गोठविले ते कायमचेच. १९७७ साली आणीबीणीनंतर सत्तेत आलेल्या जनता पार्टीचे चिन्ह होते. नांगरणारा शेतकरी. कालांतराने या पक्षाच्या ठिकर्‍या उडाल्या, मात्र या पक्षाचे अस्तित्व व चिन्ह सुब्रम्हण्यम स्वामी यांनी टिकवून धरले होते. अलिकडेच ते भाजपामध्ये विलिन झाल्यावर हे चिन्ह व हा पक्ष देखील संपुष्टात आला. डाव्या पक्षातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह स्थापनेपासून विळा व कणीस हे होते. ज्यावेळी १९६४ साली कम्युनिस्ट पक्षात फूट पडली व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली त्यावेळी त्यांनी विळा-हातोडा व एक तारा हे चिन्ह घेतले. दोन्ही कम्युनिस्ट पक्षांच्या विचारधारेशी सुंसंगत अशीच ही चिन्हे आहेत. स्वातंत्र्यानंतर उजव्या विचारसारणीच्या जनसंघाचे पणती हे निवडणूक चिन्ह होते. जनता पक्षात जनसंघ विलिन झाल्यावर त्यांची ही निशाणी संपुष्टात आली. मात्र जनता पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या पूर्वाश्रमीच्या जनसंघीयांनी भारतीय जनता पक्ष स्थापन केला आणि त्यांनी कमळ हे चिन्ह स्वीकारले. या पक्षाच्या हिंदुत्ववादी विचारधारेला अनुसरुन हे चिन्ह योग्यच आहे, असे म्हटले पाहिजे. अलीकडेच हरयाणात स्थापन झालेल्या गरीब आदमी पक्षाची निशाणी आहे भरलेले ताट. गरीबांसाठी स्थापन झालेल्या या पक्षाची निशाणी त्यांच्या धोरणाशी सुसंगतच ठरावी. शेकापचा खटारा हा देखील अशाच गरीब शेतकरी, कष्टकर्‍याचे प्रतिक आहे. शेकापचा गाभा हाच आहे. स्वातंत्र्यानंतर कॉँग्रेसच्या हाती सत्ता आल्यावर कॉँग्रेसमधील डाव्या विचारसारणीचे नेते नेहरुंच्या एकहाती कारभारास कंटाळले होते. १९४७ पासून शंकरराव मोरे यांनी समाजसत्तावादाच्या वैचारिक बैठकीच्या पायावर तरुणांना लाल झेंड्याखाली एकत्रित करायला सुरुवात केली होती. यातूनच पुण्यात भाऊसाहेब शिरोळे, केशवराव जेधे, आनंदराव चव्हाण, तुळशीदास जाधव, दत्ता देशमुख यांच्यासह काही नेत्यांनी शेतकरी कामगार पक्षाची ३ ऑगस्ट १९४७ साली स्थापना केली. समाजवादी तत्वानुसार कामगार शेतकर्‍यांची वर्ग संघटना उभारणे व त्यांचे दैनंदिन वर्गलढे लढविणे हाच एक मार्ग असल्याचे पक्षाने धोरण मांडले. या विचाराने एक होऊन उभ्या महाराष्ट्रात रण पेटविण्यात शेकाप यशस्वी झाला. भांडवलदारांचे हस्तक असलेल्या कॉँग्रेसच्या सरकारला घाम फोडला. शेतकरी, कामगारांच्या वर्गसंघटना केवळ आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अस्तित्वात न आणता त्या सामाजिक व आर्थिक क्रांतीच्या आधारस्तंभ बनल्या पाहिजेत. शेतकरी कामगार पक्षाचे हे प्रमुख धोरण पक्षाचे संस्थापक शंकरराव मोरे यांनी आखले होते. आजही शेकाप याच धोरणावर कार्यरत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शेकाप अग्रेसर होता. ५२ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे २८ आमदार निवडून आले होते. राज्याच्या राजकारणात एकहाती सत्ता शेकाप मिळवू शकला नाही हे वास्तव असले तरीही २१ वेळा राज्यातले विरोध पक्षनेतेपद शेकापकडे राहिले आहे. आज देशात डावी चळवळ क्षीण जाल्याचे चित्र दिसत असले तरीही शेकापने आपला रायगडचा बालेकिल्ला शाबूत राखला आहे. पक्षाची निशाणी खटारा आता पुन्हा एकदा आल्याने पक्षाचे वैभव परतले आहे.
-----------------------------------------------------  

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel