-->
राष्ट्रपित्याचे स्मरण

राष्ट्रपित्याचे स्मरण

संपादकीय पान सोमवार दि. 30 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
राष्ट्रपित्याचे स्मरण
देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येला आज 69 वर्षे पूर्ण होत आहेत. महात्माजींचा विचार आपण कितपत रुजविला हा संशोधनाचा विषय ठरला तरीही आज प्रत्येकाला या राष्ट्रपित्याची गरज वाटत आहे. केवळ आपल्याच देशात नाही तर जगात गांधींजींचा विचार स्वीकारला गेला आहे. अहिंसेंचा विचार जगविणे व आत्मसात करणे ही सोपी बाब नाही, परंतु आजही त्यांच्या हत्येनंतर सात दशके उलटली असली तरीही त्यांचा विचार संपलेला नाही. उलट ज्यांनी महात्मा गांधींचा विचार संपविण्यासाठी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली त्यांना आज त्या हत्येत आपण नाही असे सांगावे लागत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सक्रिय सदस्य असलेल्या नथुराम गोडसे यांनी गांधींजींची हत्या केली. अर्थात हा निव्वळ खून नव्हता तर तो राजकीय विचार संपविण्यासाठी केलेला खून होता. आज त्यांच्या विचारांची पितृसंघटना असलेल्या संघाची राजकीय शाखा असेलला भाजपा केंद्रात सत्तेवर आला आहे. असे असले तरी गांधींचा विचार त्यांनाही सोडणे जड जात आहे. हा गांधींच्या विचारांचा विजय असला तरीही दुसर्‍या बाजूने नथुराम गोडसेची जयंती साजरी करणे यासारखे उपद्व्याप केले जात आहेत. गांधींची हत्या झाली त्यावेळी नथुराम हा आमच्या संघटनेचा नव्हता, असे संघाने जाहीर करुन आपली यातील जबाबदारी झटकली आहे. मात्र ही जबाबदारी झटकणे हा दांभीकपणा झाला. संघामध्ये कोणाचाही प्रवेश हा अर्ज करुन केला जात नाही, तसेच त्याने सोडताना राजीनामा देण्याची पध्दत नाही. अशा वेळी नथुराम हा मरेपर्यंत संघाचाच होता. कारण फाशीची सजा भोगतानाही तो संघाचे गोडवे गात होता. त्यामुळे कितीही काही झाले तरीही गांधींच्या हत्येची जबाबदारी संघ नाकारु शकत नाही, उलट त्यांनी आपला विचार स्पष्ट करुन ही जबाबदारी स्वीकारावयास हवी. कोणत्याही खुनामागे उद्देश असतो आणि तो गांधी हत्येप्रकरणी संघाकडे तयाच उद्देश होता. गांधींजींचा अहिंसेचा, शांततेचा विचार त्यांना संपवायचा होता. परंतु एकादी व्यक्ती संपविली ही त्यांचा विचार संपतो हे खोटे ठरले. डॉ. नरेंद्र दाभोळकर असोत किंवा कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खूनाच्या संदर्भात असेच झाले आहे. गांधी हत्या करमारेच आता त्यांच्या विचारांचा जयघोष करीत आहे हे सर्वात धोकादायक म्हटले पाहिजे. गांधींची हत्या ही राजकीय हत्या होती. ते गांधी आणि गोडसे या दोन व्यक्तींमधील भांडण नव्हते. संघाच्या संकुचित हिंदुराष्ट्रवाद आणि गांधीजींच्या सर्वसमावेशक भारतीय राष्ट्रवाद यांमधील ते वैचारिक भांडण होते. गांधींचा खून करणारा नथुराम गोडसे संघाचा स्वयंसेवक होता व तो संकुचित राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता होता. अन्य वेळी संघाचे स्वयंसेवक जेव्हा कधी नैसर्गिक आपत्ती, राष्ट्रीय संकट यांमध्ये काही चांगले कार्य करतात, तेव्हा त्याचे श्रेय संघ घेतो. स्वयंसेवकांच्या चांगल्या कामाच्या श्रेयाबद्दल संघ स्वतःची पाठ थोपटून घेतो. तसाच वाईट कामांचा कलंक आणि जबाबदारीही संघाने स्वीकारली पाहिजे. गांधीहत्येच्या खटल्यात जन्मठेप झालेले नथूरामचे बंधू, गोपाळ गोडसे यांच्या सांगण्यानुसार, आम्ही सारी भावंडे, नथुराम, दत्तात्रेय, मी स्वतः आणि गोविंद संघात होतो. आम्ही घरापेक्षा संघातच वाढलो असे तुम्ही म्हणू शकता. संघ आमच्यासाठी कुटुंबासारखा होता. नथुराम आर.एस.एस.मध्येच होता. त्याने तो सोडला नाही. नथुराम संघाचा बौद्धिक प्रचारक बनला. मात्र त्याने त्याच्या जबाबात आर.एस.एस. सोडल्याचे सांगितले. गोळवळकर आणि आर.एस.एस. गांधींच्या खुनानंतर मोठ्या संकटात होते. म्हणून तो तसे म्हणाला. पण त्याने संघ सोडला नव्हता. आडवाणींनी, नथुरामचा संघाशी काहीच संबंध नव्हता, असे म्हटल्याचे सांगितल्यावर गोपाळ गोडसे म्हणाले होते, हा भ्याडपणा आहे. संघाने गांधीजींच्या मृत्यनंतर तेरा दिवसांचा दुखवटा पाळला होता असे म्हणतात. पण संघाला खरोखरच गांधींच्या खुनाचे दुःख असेल आणि तसा आरोप कुणी केला तर संघाची अब्रू जात असेल, तर संघाने ज्या विचारसरणीने गांधींचा खून केला, त्या विचारसरणीचा जाहीर निषेध करायला हवा. आवर संगाने या गटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला नाही, ही बाब विसरली जाऊ शकत नाही. खुनी नथुराम आणि त्यांच्या साथीदारांची राष्ट्रपित्याची हत्या करणारे देशद्रोही म्हणून संभावना करायला हवी व नथूरामचे खाजगीत केले जाणारे उदात्तीकरण थांबवायला हवे. महात्मा गांदींनी आपल्या शांततेच्या मार्गाने जगाला एक नवा रस्ता दाखविला. गांधींच्या भोवती जनता केंद्रीत होईपर्यंत कॉग्रेसचे नेतृत्व जहाल होते व त्याचे पुढारीपण लोकमान्य टिळकांकडे होते. मात्र त्यानंतर महात्मा गांधींकडे नेतृत्व आपोआप आल्यावर त्यांनी शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपला मार्ग दाखवून दिला. अर्थात त्यावेळीही गांधींच्या विचारांना विरोध करणारे होतेच. मात्र त्यांनी गांधींना संपविण्याची भाषा कधी केली नाही. पाकिस्तानची फाळमी जाली त्यावेळी गांधींनी आपल्या देशापेक्षा पाकिस्तानचे हित पाहिले, असा त्यांच्यावर आरोप झाला. मात्र गांधी आपल्या विचारांवर ठाम होते व सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या मागे एकदीलाने बहुतांशी जनता होती. यातून त्यांचा खून झाला. मात्र गांधींचा विचार अमर झाला. आज सात दशकांनंतर गांधींचा विचार व विचारसारणी अंमलात आणण्यासाटी चढाओढ होत आहे. ज्यांनी गांदींना संपविले तेच आता गांधींच्या ऐवजी आपले छायाचित्र झळकावित आहेत. नियतीचा खेळ आणखी काय म्हणायचे?
---------------------------------------------------------------------------

0 Response to "राष्ट्रपित्याचे स्मरण"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel