-->
संपादकीय पान मंगळवार दि. ०६ जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
पाकिस्तानची कुरापत
नववर्षाच्या प्रारंभापासून पाकिस्तान व भारतादरम्यान वाढलेला तणाव सध्यातरी निवळण्याची शक्यता दिसत नाही. ३१  डिसेंबर २०१४ रोजी रात्री दोन पाकिस्तानी मच्छीमार बोटींनी भारतीय हद्दीत संशयास्पदरीत्या घुसखोरी केल्याची माहिती अमेरिकी तपास यंत्रणांनी तटरक्षक दलाला दिली. या बोटींमध्ये स्फोटके असण्याची शक्यता असून त्या पोरबंदरच्या दिशेने चालल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या दोन बोटींपैकी एक बोट माघारी फिरली. पण तटरक्षक दलाने दुसर्‍या बोटीला घेरताच तिच्यातील चार व्यक्तींनी ही बोट उडवून दिली. या बोटींवरच्या लोकांचे वायरलेसवरून जे संभाषण सुरू होते ते तटरक्षक दलाने मिळविले असून त्यातून हे लोक पाकिस्तानी लष्कराच्या तसेच थायलंडमधील एका व्यक्तीच्या सातत्याने संपर्कात होते हे उघड झाले आहे. या सबळ पुराव्यांमुळे आता पाकिस्तानची विलक्षण कोंडी झालेली आहे. समुद्रमार्गे घुसखोरी करून २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईवर भीषण हल्ला चढविला होता. तशाच पद्धतीने १ जानेवारी रोजी पाक दहशतवादी पुन्हा भारतात हल्ले घडविण्याच्या मोहिमेवर निघाले होते अशी शक्यता भारतीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. सुदैवाने पाकिस्तानचा हा कट तटरक्षक दलाने हाणून पाडला. गेले काही दिवस दुसर्‍या बाजूस शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करून सीमेवर पाकचे सैनिक भारतीय लष्करावर तुफानी हल्ले चढवत होते. गेल्या तीन-चार दिवसांत हल्ल्याच्या घटना वाढल्या होत्या. जम्मू-काश्मिरातील कठुआ व सांबा भागामध्ये शनिवारी भारतीय हद्दीतील १३ गावांवर व लष्करी ठाण्यांवर केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद तर एक महिला मृत्युमुखी पडली होती. आंतरराष्ट्रीय सीमा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सुरू असलेले हल्ले व दुस-या बाजूने पाकिस्तानी बोटींची समुद्रमार्गे भारतीय हद्दीत होणारी घुसखोरी हा एका व्यापक कटाचा भाग असल्याचे गुप्तचर संस्थांना वाटते. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणे हाच त्या देशाची घातक वृत्ती चेचण्यासाठी उत्तम उपाय होऊ शकतो. अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रजासत्ताकदिनी होणार्‍या भारत भेटीच्या पार्श्‍वभूमीवर काही तरी मोठा घातपात करुन आणून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे काम पाकिस्तानकडून केला जाईल, असा गुप्तचर यंत्रणांचा अंदाज होताच. त्याबरहुकुम सीमेवर अशांतता पसरविण्याचे काम पाकी सैनिक करीत असतानाच गेल्या आठवड्यात भयानक विस्फोटके घेऊन एक मच्छिमार बोट भारताच्या दिशेने निघाल्याची गुप्तवार्ता तटरक्षक दलास मिळाली. कराचीनजीक केटी बंदर येथून चार अतिरेक्यांना घेऊन निघालेल्या या बोटीत मच्छिमारीची नव्हे, तर भयानक स्फोट घडवून आणणारी सामग्री असल्याचेही गुप्तवार्तेद्वारा समजले होते. साहजिकच तटरक्षक दलाने सागरी तसेच हवाई मार्गाचा वापर करुन या बोटीला आहे तिथेच रोखण्याचे प्रयत्न सुरु केले. बोटीतील लोक आणि त्यांच्याकडील सामान जप्त करण्यासाठी तटरक्षक दलाने त्यांचा पाठलाग सुरु केला. आता आपण पक्के घेरले गेलो आहोत, याचा अंदाज येता क्षणी बोटीत भयानक विस्फोट घडून आला व ती पाहता पाहता जळून भस्मसात झाली. नवीन वर्षाचा प्रारंभ होत असतानाच हा भयानक प्रकार घडला. याचा सरळ अर्थ नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतात मोठा घातपात घडवून आणण्याचा बोटीतील चौघांचा इरादा होता. ते चौघे फिदाईन म्हणजे आत्मघातकी अतिरेकी होते आणि म्हणूनच त्यांनी स्वत:सकट बोटदेखील स्फोटात उडवून दिली. परिणामी, त्यांना २६ नोव्हेंबरची पुनरावृत्ती घडवून आणायची होती, हा गुप्तचर विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरतो. अरबी समुद्रातील ज्या ठिकाणी हा स्फोट घडवून आणला गेला, त्या परिसराची तटरक्षक दल अजूनही छाननी करीत असून काही हाती लागते का, याचा शोध घेत आहे. मुंबईवरील अतिभयानक अतिरेकी हल्ला ज्यांनी केला, ते कसाबासकट सारे कसाई समुद्रमार्गेच भारतात आणि तेही मुंबईच्या किनार्‍यावर आले होते, हे येथे लक्षात घ्यायचे. अर्थात नेहमीप्रमाणे पाकिस्तानने या सार्‍या घटनेचा साफ शब्दात इन्कार केला आहे. तेथील परराष्ट्र विभागाच्या प्रवक्याानुसार त्या दिवशी केटी बंदरातून एकही बोट निघाली नव्हती! त्यामुळे जो काही प्रकार घडल्याचे भारतातर्फे सांगितले जात आहे, तो केवळ एक प्रचार असून पाकिस्तानची प्रतिमा डागाळण्याचाच तो एक प्रयत्न आहे. अर्थात पाकचा हा कांगावखोरपणा नवा नाही. या बोटींच्या संदर्भात असलेले पुरावे भारतीय यंत्रणेने जगात सादर करुन पाकिस्तानचा हा उद्दामपणा सर्वांना दाखवून दिला पाहिजे. कारण या बोटीचा आपला काही संबंध नाही असे पाकिस्तान सांगत असले तरी यावर कुणाचाही विश्‍वास बसणार नाही. आता असे म्हटले जात आहे की, ही बोट तस्करी करणारी होती आणि हा तस्करीचाच भाग असावा. तसेच पाकिस्तानने या घटनेनंतर चिडून जाऊन आपल्या मच्छिमारांच्या दोन बोटी हस्तगत केल्या आहेत. अशा प्रकारे मच्छिमरांना पकडून पाकिस्तान रडीचा डाव खेळत आहे. पाकिस्तानचे हे खरे रुप उघड करण्यासाठी सरकारने या बोटीचा सर्व तपशील जाहीर करणे आवश्यक आहे. पाकिस्तान सध्या त्यांच्या अंतर्गत प्रश्‍नात पूर्णपणे गुरफटलेला आहे, मात्र असे असले तरी भारताला अस्थिर करणे हा त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. पाकिस्तानचा हा डाव उधळून लावण्याची गरज आहे. पाकिस्तानच्या कुरापती अन्यथा अशा च चालू राहातील.
-------------------------------------------      

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel