
तामीळनाडूत स्टॅलिनपर्व
05 मेच्या अंकासाठी अग्रलेख
तामीळनाडूत स्टॅलिनपर्व
तामीळनाडूच्या राजकारणातील दोन महत्वाचे मोहोरे एम. करुणानिधी व जयललिता काळाच्या पडद्याआड गेल्यावर त्यांचा वारसदार कोण होणार, असा प्रश्न नेहमीच तामीळनाडूत पडलेला होता. आताच्या निवडणुकीने या प्रश्नाचे उत्तर सर्वांना मिळाले असून डी.एम.के.चे प्रमुख आणि करुणानिधी यांचे पुत्र एम.के.स्टॅलिन हे दक्षिणेतील या महत्वाच्या राज्याचे आता नेतृत्व करणार आहेत. तामीळनाडूच्या यावेळच्या निवडणुकीत जनतेने स्टॅलिन यांच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. यावेळची निवडणूक ही करुणानिधी व जयललिता यांच्या अनुपस्थितीत झाल्याने द्रमुक व अण्णाद्रमुक या पक्षातील लढत महत्वाची होती. आजवर कधी द्रमुक तर कधी अण्णाद्रमुक असे हे दोन पक्ष सत्तेत राहिले आहेत. त्यातच या राज्याच्या राजकारणावर सिनेकलाकारांचा पगडा असल्याने एम.जी.आर. ते जयललीता अशी कलाकारांची मुख्यमंत्री होण्याची परंपरा राहिली आहे. यावेळी या परंपरेला तामीळी जनतेने पूर्णपणे छेद दिला आहे. अभिनेता कमल हसन याने यावेळी पक्ष स्थापन करुन आपली छाप राज्याच्या राजकारणात पडते का त्याची आजमावणी केली होती. मात्र त्यात ते सफशेल अयशस्वी ठरले. त्याचबरोबर प्रसिध्द अभिनेते रजनिकांत यांच्याही राजकीय महत्वाकांक्षा निवडणुकीअगोदर जागृत झाल्या होत्या. परंतु भाजपा आपला वापर करुन घेते आहे हे त्यांच्या वेळीच लक्षात आले व अशा प्रकारे एका पक्षाला जुंपून घेणे त्यांना परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी यातून निवडणुकीअगोदरच माघार घेतली. त्यामुळे आता तामीळनाडूच्या राजकारणात सिनेअभिनेत्यांचा प्रभाव पडण्याचे दिवस आता संपले आहेत, हे देखील या निवडणुकीने स्पष्ट झाले आहे. राज्याच्या स्थापनेपासून द्रमुक हा एक महत्वाचा पक्ष होता. त्याखालोखाल कॉँग्रेसचे संख्याबळ असायचे. द्रमुकमध्ये १९७२ साली फूट पडल्यावर सिनेअभिनेते एम.जी.आर. यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुक व करुणानिधी य़ांच्या द्रमुक या मध्ये नेहमीच सत्तेचा सारिपाट राहिला आहे. त्यात कोणत्याच राष्ट्रीय पक्षांना तामीळनाडूत स्वत:च्या बळावर सत्ता मिळविता आली नाही. त्यामुळे कॉँग्रेस असो किंवा भाजपा यांना या दोन स्थानिक पक्षांसोबत फरफटत जावे लागले आहे, ही स्थिती आजही कायम आहे. आजही निकाल पाहता द्रमुकसोबत युती केल्याने कॉँग्रेसची स्थिती समाधानकारक आहे, अन्यथा स्वबळावर कॉँग्रेसने विचार केला असता तर मोठी नाराशा पडली असती. परंतु तामीळनाडून कॉँग्रेस तसे धारिष्ट्य कधीच करीत नाही. कारण त्यांनी आजवर नेहमीच द्रमुक किंवा क्वचितच अण्णाद्रमुक यांची साथ घेऊन राजकारण केले आहे. कॉँग्रेसची राज्यातील ताकद पाहता ते योग्यच आहे. ९०पासून द्रमुक किंवा अण्णाद्रमुक हे कॉँग्रेस किंवा भाजपाच्या आघाडीत सामील होऊन आपले राज्यातील राजकारण करतात व गरजेनुसार केंद्रातील सरकारमध्ये सामिल होतात. एम.जी.आर., करुणानिधी व जयललिता यांच्या भोवती राज्यातील राजकारण हे गेली पाच दशकांहून जास्त काळ घुटमळते आहे. त्यातून नवीन नेतृत्व फारसे तयार झालेच नाही. आता मात्र स्टॅलिनच्या रुपाने राज्यात नवीन नेतृत्व मिळाले आहे. द्रमुकने भाजपाशी सलगी ही नेहमीच टाळली आहे. त्यातच मोदी-शहा यांच्या जोडीशी त्यांचे कधी पटणार नव्हते. त्यामुळे केंद्रात कॉँग्रेसच्या सरकारसोबत राहणे त्यांनी पसंत केले. अण्णाद्रमुक मात्र वाजपेयींच्या काळापासून भाजपासोबत राहिला आहे. करुणानिधींचे चिरंजीव म्हणून स्टॅलिन यांच्या भोवती एक नेहमीच वलय राहिले आहे. १९७३ साली डी.एम.के.च्या जनरल कौन्सिलचे ते सर्वात प्रथम सदस्य झाले आणि त्यांच्या राजकीय करिअरला सुरुवात झाली. आणीबाणीत त्यांना जेलही झाली होती. ८२ साली ते द्रमुकच्या तरुणांच्या फळीचे नेतृत्व करीत होते. १९९६ ते २००२ या काळात ते चेन्नईचे महापौर झाले आणि त्यांनी तेथे आपली छाप पाडल्याने शहरी तामीळींच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. २००३ साली ते द्रमुकचे उपमहासचिव झाले, तेव्हापासून ते पक्षात सक्रिय झाले. कारण त्यावेळी करुणानिधी प्रकृती स्वास्थामुळे पक्ष कार्य करु शकत नव्हते. त्याचवेळपासून त्यंच्याकडे पक्षाची सुत्रे आली. २००६ साली ते सर्वात प्रथम मंत्री झाले, सुरुवातीला स्थानिक संस्था मंत्री व त्यानंतर तीन वर्षातच उपमुख्यमंत्री झाले. २०१६ सालच्या निवडणुकीत त्यांना सर्वात प्रथम मुख्यमंत्री म्हणून द्रमुकने प्रोजक्ट केले होते, मात्र त्यावेळी ते काही या पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यावेळी करुणानिधी ९२ वर्षांचे होते आणि हळूहळू त्यांनी आपला वारस म्हणून स्टॅलिनच्या हाती सर्व सुत्रे देण्यास सुरुवात केली होती. ऑगस्ट २०१८ मध्ये करुणानिधी यांच्या निधनानंतर त्यांनी पक्षाची सुत्रे हाती घेतली आणि पक्षसंघटना वाढवाय़ला सुरुवात केली. ६८ वर्षीय स्टॅलिन यांनी आजवर झपाट्याने काम करणारा नेता, पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेऊन असलेला नेता अशी प्रतिमा निर्माण केली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने तामीळनाडूतील आता सिनेकलाकारांचे राजकारण सध्या तरी संपुष्टात आले आहे व स्टॅलिन युगाचे नवे पर्व सुरु झाले आहे.
0 Response to "तामीळनाडूत स्टॅलिनपर्व"
टिप्पणी पोस्ट करा