-->
संपादकीय पान मंगळवार दि. ११ मार्च २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------
कॉँग्रेसचा पत्ता कापला
----------------------------------
लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून म्हणजे १९५२ सालापासून रायगड लोकसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे नेहमीच वर्चस्व राहिले असले तरी नेहमी कॉँग्रेसने तुल्यबळ लढत दिली आहे. या दोन्ही पक्षांच्या पदरात कधी अलटून पालटून यश आले होते. परंतु यंदा मात्र कॉँग्रेस पक्षाने त्यांचा सत्तेतील वाटेकरी असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसला रायगड लोकसभा मतदारसंघ बहाल केल्याने कॉँग्रेसचा येथून पत्ता कापला गेला आहे. याबद्दल समस्थ कॉँग्रेसजनांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटणे स्वाभाविकच आहे. माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेसचे नेते बॅ. ए.आर. अंतुले यांनी कॉँग्रेससाठी हा मतदारसंघ चांगल्यारितेने बांधला होता. इथे असलेल्या अल्पसंख्यांचे प्रतिनिधीत्व करीत असताना बॅ अंतुलेंनी पक्ष सर्व स्थरात कसा वाढेल यासाठी वेळोवेळी कामे करुन प्रयत्न केला. आता मात्र बॅ. अंतुले यांना वार्ध्याक्यामुळे या मतदारसंघात फारसे लक्ष घालता येत नसले तरी खरे तर कॉँग्रेस पक्षाने अल्पसंख्यांना प्रतिनिधीत्व देण्यासाठी अंतुले यांच्याच घरातून उमेदवारी दिली असती तर वेगळे चित्र निर्माण झाले असते. परंतु कॉँग्रेसने हा पर्याय न स्वीकारता या मतदारसंघातून पळ काढण्याचे धोरण स्वीकारले आहे. अर्थातच याचा राष्ट्रवादी पक्षाला काही फायदा होणार नसला तरीही कॉँग्रेसचा या मतदारसंघातून सफाया होण्यास प्रारंभ झाला आहे असे म्हणावयास काही हरकत नाही. अगोदरच्या कुलाबा व आताच्या रायगड मतदारसंघात सात विधानसभा मतदारसंघ येतात. तीन विधानसभा मतदारसंघात शेकापचे आमदार आहेत शिवाय अन्य मतदारसंघात चांगल्यापैकी प्रभूत्व आहे. कॉँग्रेसमधून राष्ट्रवादी फुटल्यावरही जिल्ह्यात कॉँग्रेसची ताकद बर्‍यापैकी होती. त्यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे बॅ. अंतुलेंचा जिल्हयात चांगला लोकसंग्रह होता. शेकापतून फुटून गेलेल्या राम ठाकूर यांच्यामुळे कॉँग्रेसची फारशी ताकद वाढली नाही किंवा त्यामुळे आपल्या आमदारांची संख्या वाढविण्यात कॉँग्रेसला काही विशेष फायदा झाला नाही. रायगड लोकसभा मतदारसंघातून ए.आर.अंतुले यांनी एकूण चारवेळा प्रतिनिधीत्व केले. १९८९, १९९१, १९९६ व २००४ साली अंतुले या मतदारसंघातून विजयी झाले. असा प्रकारे या मतदारसंघातून चारवेळा विजयी होणारे अंतुले हे अजून तरी एकमेव ठरले आहेत. गेल्या वेळी २००९ साली त्यांचा पराभव कॉँग्रेसमधील बंडाळी व त्यांचा सहकारी पक्ष राष्ट्रवादीने सहकार्य न केल्यामुळे झाला. अंतुलेसाहेबांना हा पराजय जिव्हारी लागणे स्वाभाविक होते. १९५२ सालापासून म्हणजे अगदी पहिल्या लोकसभेपासूनचा इतिहास पाहता सहा वेळी शेकापने या मतदारसंघातून आपला प्रतिनिधी लोकसभेवर पाठविला आहे. यात राजाराम राऊत (१९५७ साली), दत्तात्रय कुंटे (१९६७), दी.बा. पाटील (१९७७), दी.बा. पाटील (१९८४), राम ठाकूर (१९९८), राम ठाकूर (१९९९) यांचा समावेश होता. २००९ सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गिते यांना ४ लाख ३१ हजार ५४६ मते मिळून विजयी झाले होते. त्यांना एकूण ५३ टक्के मते मिळाली होती. तर अंतुले यांना २ लाख ६७ हजार मते पडली होती. या निवडणुकीत गिते यांना शेकापने पाठिंबा दिला होता. या मागचे मुख्य कारण होते ते म्हणजे विशेष आर्थिक विभागाच्या (सेझ)च्या प्रश्‍नांवर सर्वपक्षीय लोक एकत्र आले होते व त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यावेळी सेझचा प्रश्‍न रायगडवासियांसाठी जीवनमरणाचा होता आणि लोकसभेत जर या प्रश्‍नावर आवाज उठवायचा असेल तर विरोधकांची मते फुटून उपयोग होणार नव्हता. त्यामुळे शेकापने गिते यांना पाठिंबा दिल्याने अंनंत गिते खासदार झाले. शेकापची जिल्ह्यातील जी बांधलेली मते मते आहेत ती जर शिवसेनेला मिळाली नसती तर गिते यांचा पराभव नक्की होता. आता २०१३ साली रायगड मधून कोण विजयी होणार असा प्रश्‍न मतदारांच्या मनात उपस्थित होतो. अर्थात अजून घोडामैदान बरेच लांब आहे. आताकुठे फक्त तटकरे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. लवकरच त्यांच्या उमेदवारीचे पडसाद जोरदार उमटण्याची शक्यता आहे. कारण तटकरे यांनी उमेदवारी जाहीर होताच मधू ठाकूर यांचा पहिल्यांचा आशिर्वाद घेतला व अंतुलेची अजून साधी भेटही घेतलेली नाही. कदाचित ते पुढे एक सोपस्कर म्हणून भेट घेतीलही. कारण राष्ट्रवादी स्वबळावर इकडे फारशा उड्या मारु शकत नाही. मधू ठाकूर हे अलिबाग तालुक्यातील काही भागातील कॉँग्रेसचे प्रतिनिधीत्व करणारे आहेत. त्यांच्या भेटीने तटकरेंना मते किती मिळणार, याचे गणित आता मांडल्यास हसे होईल. परंतु कॉँग्रेसमधील एक मोठा गट अंतुले किंवा त्यांच्या घरातील कुणाला तरी तिकीट मिळेल अशी अपेक्षा ठेवून होते. त्यानिमित्ताने अल्पसंख्यांना या मतदारसंघाच्या माध्यमातून प्रतिनिधीत्व मिळत होते. ते प्रतिनिधीत्व आता मिळणार नाही ही खंत लागूनच राहाणी आहे. त्यामुळे कॉँग्रेसची सर्व मते आघाडीतील घटक पक्ष म्हणून तटकरेंना मिळतील या भ्रमात त्यांनी राहू नये. एकीकडे कॉँग्रेसमधील ही नाराजी तटकरेंना जशी भोवू शकते तसेच दुसरीकडे शिवसेनाही स्वबळावर अनंत गितेंना निवडून आणू शकत नाही. या सर्व पार्श्‍वभूमीवर या मातीतला पक्ष म्हणून ज्याची गेली ६६ वर्षे जनतेला ओळख आहे त्या शेकापच्या भूमीकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेकापची या जिल्ह्यातली हक्काची एकगठ्ठा असलेली मते लक्षात घेता विजयाची चावी शेकापच्याच हाती राहाणार आहे. कॉँग्रेसने या मतदारसंघावर पाणी सोडल्याने कॉँग्रेसचा येथून सफाया होण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे शेकापच्या भूमिकेला महत्व प्राप्त झाले आहे.

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel