-->
सोमवार दि. १० मार्चच्या अंकासाठी अग्रलेख
---------------------------------
मोदी विरुद्ध केजरीवाल
-----------------------------------
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता नेमकी निवडणूक कोणा-कोणात लढली जाणार आहे, याचे एक ढोबळ चित्र दिसू लागले आहे. देशपातळीवर आता केवळ कॉंग्रेस विरुद्ध भाजप असे थेट चित्र असणार नाही. तर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे देशाच्या काही भागात जोरदार लढती देतील, असा अंदाज आहे. निदान तसे चित्र उभे करण्यात केजरीवाल यशस्वी झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवार-शनिवारी गुजरात दौरा केला आणि पंतप्रधानपदाचे भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या गुहेत शिरुन त्यांना आव्हान दिले. केजरीवाल यांचा हा दौरा कसा ‘फ्लॉप शो’ जाईल यासाठी गुजरातमधील भाजप कार्यकर्ते प्रयत्न करीत होते. मात्र केजरीवाल यांच्या ठिकठिकाणच्या सभांना व रोड शोला अनपेक्षित असा प्रतिसाद मिळाला. आपल्या प्रत्येक सभेत केजरीवाल हे मोदींचा विकास कसा बनावट आहे, हे उदाहरण देऊन सांगत होते. एके ठिकाणी तर, केजरीवाल यांनी मोदी हे अंबानी, टाटा व अदानींसाठी इस्टेट एजंट म्हणून काम करतात. ते राज्याचे मुख्यमंत्री नाहीच आहेत. केजरीवाल यांचा हा आरोप गंभीर असला, तरी त्याच्या समर्थनार्थ त्यांनी अनेक उदाहरणे दिली. त्यामुळे केजरीवाल यांचा हा निवडणूक स्टंट आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. केजरीवाल यांनी जे आरोप केले आहेत, त्यात बर्‍यापैकी वस्तुस्थिती आहे. कच्छला झालेल्या भूकंपानंतर वाजपेयी यांनी पंतप्रधानपदी असताना कच्छमध्ये अत्याधुनिक रुग्णालय बांधले होते. मोदींनी नंतर ते रुग्णालय अंबानींना देऊन टाकले आणि आता तेथे गरीबांना परवडणार नाही असे दर आहेत. मोदींनी अदानी, अंबांनी यांना गुजरातमध्ये ज्या प्रकारे मोक्याच्या जागी प्रकल्प उभारण्यासाठी कवडीमोलाने जमिनी दिल्या आहेत, ते पाहता मोदी हे त्यांचे इस्टेट एजंट म्हणून काम करीत आहेत, हा केलेला आरोपही बर्‍यापैकी खरा ठरावा. केजरीवाल यांनी गुजरातमधील शेतकर्‍यांनी केलेल्या आत्महत्येची आकडेवारी दिली आहे. एकूणच काय, केजरीवाल यांनी उपस्थित केलेले मुद्दे हे सर्व गुजरातमध्ये लोकांना माहीत आहेत. केजरीवाल यांनी काही नवीन सांगितलेले नाही. मात्र फक्त त्यांनी मोदींच्या गुहेत जाऊन त्यांना आव्हान देण्याचे धाडस दाखविले. राज्यातील कॉँग्रेस तेथे सत्ता गेली १५ वर्षे नसल्यामुळे दुबळी झाली आहे. कॉँग्रेसमधील सत्तेभोवती फिरणारे टोळभैरव आता मोदींच्या कळपात गेले आहेत. त्याबरोबर तेथील कॉंग्रेसकडे नेतृत्वच राहिलेले नाही. यामुळे मोदी यांचे बर्‍यापैकी फावले आहे. मात्र मोदींनाही त्यांच्या राज्यात येऊन कुणीतरी आव्हान देऊ शकतो, हे केजरीवाल यांनी दाखवून दिल्याने आता मोदींना खरी धास्ती वाटू लागली आहे. केजरीवाल यांनी त्यांच्याकडे असलेल्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी मोदींची भेट मागितली होती. परंतु, ती भेट त्यांनी नाकारली. खरे तर, मोदींकडे या प्रश्नांची उत्तरे असती, तर त्यांनी केजरीवाल यांना समोर बोलावून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली असती. एरव्ही विरोधकांना प्रामुख्याने कॉँग्रेस नेतृत्वाला जाहीर सभेत चर्चेला येण्याचे आव्हान देणारे मोदी, केजरीवाल यांना का भेटले नाहीत, हा एक प्रश्नच आहे. केजरीवाल यांच्या गुजरात दौर्‍याने मोदींविरोधात लाट येईल व गुजरातमध्ये आम आदमी पक्षाला जागा मिळतील, असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र मोदींविरोधात कुणी शब्दही काढत नसताना केजरीवाल यांनी त्यांच्याविरोधात आता गुजरातमध्ये बी रोवले आहे. त्याचा त्रास मोदींना भविष्यात होणार आहे हे नक्की. देशपातळीवरील विचार करता अलीकडच्या एका पाहणीनुसार, मोदी यांची लोकप्रियता घटत चालल्याचे दिसत आहे. याचे श्रेय केजरीवाल यांना दिले पाहिजे. आज ज्या ठिकाणी केजरीवाल जातात, तेथे त्यांटे प्रमुख लक्ष्य भाजप असते आणि त्यांनी आपल्या प्रचाराचा मुख्य रोख मोदींवर ठेवला आहे. कॉंग्रेस बहुधा यावेळी पराभव स्वीकारुनच चालत असल्याचे चित्र दिसत आहे. कॉँग्रेसमध्ये नैराश्यही एवढंच आहे. राहुल गांधी हे मते खेचणारे मशिन नाहीत, हे सर्व कॉंग्रेसजनांना आता बहुधा पटले असावे. निवडणुकीनंतर ते अधिक स्पष्ट होईल. परंतु, केजरीवाल यांनी जो आपला प्रचार आक्रमक सुरु केल्याने त्याचा फायदा-तोटा कोणत्या पक्षाला होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र आत्ता तरी असेच दिसते आहे की, केजरीवाल हे भाजपची मते खाणार आहेत आणि त्यातून भाजपच्या जागा कमी करण्यासाठी त्यांचाच हातभार लागेल. सध्याच्या एका अंदाजानुसार, ४० मतदारसंघांत केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे उमेदवार हे मोठ्या संख्येने मते खातील. हा अंदाज खरा ठरला तर, भाजपची सत्तेच्या दिशेने जाण्यासाठी जी पावले पडली होती, निदान तशी तरी त्यांनी हवा केली होती, त्यापासून केजरीवाल त्यांना दूर लोटतील. आम आदमी पक्षाच्या जागा किती निवडून येतात हे महत्त्वाचे नाही, तर किती ठिकाणी हा पक्ष मते खाऊन, कोणत्या उमेदवाराला पाडतो, हे महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे मोदी यांच्या पोटात केजरीवाल यांच्या संदर्भात गोळा आला आहे. दिल्ली काबीज करण्याचे आपले स्वप्न केजरीवाल भंग करतील हे मोदी यांना पटले आहे. त्यामुळेच भाजपने आता कॉंग्रेसला टार्गेट करण्यापेक्षा आम आदमी पक्षाला निशाणा केले आहे. निवडणूक जशी जवळ येणार आहे, तशी ही लढत तीव्र होत जाणार आहे हे नक्की. मोदींनी खरे तर गेले वर्षभर आपले प्रचार तंत्र राबविल्यामुळे आता त्यांच्या भाषणात नाविण्य राहिलेले नाही. त्यामुळे मोदींच्या पोतडीतील सर्व मुद्दे आता संपले आहेत. अशा वेळी केजरीवाल आपल्या पोतडीत नवीन माल भरुन मैदानात उतरले आहेत. त्यामुळे मोदींविरुद्ध केजरीवाल ही लढत तीव्र होणार असून, भाषणबाजीत तरी केजरीवाल प्रभावी ठरतील, असेच दिसते.

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel