-->
जेव्हा शिक्षकच परीक्षेत नापास होतात...
-------------------------------
सोमवार दि. १० मार्चच्या अंकासाठी चिंतन
-----------------------------------
आपल्याकडे शालेय शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे. पूर्वीच्या काळी शिक्षक हे केवळ नोकरीसाठी हा पेशा स्वीकारीत नसत, तर तरुण पिढीला घडविण्याचे एक व्रत म्हणून ते हा पेशा स्वीकारीत. आता मात्र बदलत्या काळात अनेक नवीन तंत्रज्ञान आले, मुलांना नवनवीन संधी आल्या व जग जवळ आल्याने एकूणच शैक्षणिक दर्जा सुधारेल, अशी अपेक्षा केल्यास काही वावगे नव्हते. परंतु, नेमके उलटे चित्र दिसत आहे. अलीकडेच शालेय शिक्षकांसाठी राज्य सरकारने परीक्षा घेतली होती. यात केवळ ४.६२ टक्केच शिक्षक पास झाले. या परीक्षेसाठी बसलेले सर्व शिक्षक हे बी.एड् व पदवीधारण केलेले होते. गेल्या १५ डिसेंबर रोजी ही परीक्षा राज्यातील सर्व शिक्षकांसाठी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल हा धक्कादायक लागला आहे. राज्यातील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना शिकविणारे सुमारे सहा लाख शिक्षक या परीक्षेला बसले होते. यातील केवळ ४.६२ टक्केच शिक्षक यात पास झाले. म्हणजे, जे शिक्षक परीक्षेत साधे पास होऊ शकत नाहीत, ते मुलांना शिकविणार तरी काय? असा सवाल उपस्थित होतो. ज्या शिक्षकांनी इंग्रजी व उर्दु भाषेतून पेपर लिहिले, त्यांची कामगिरी अतिशय निराशाजनक होती. त्याउलट, मराठीत पेपर ज्यांनी लिहिले, त्यांची कामगिरी तुलनात्मकदृष्ट्या समाधानकारक होती. इंग्रजीत पेपर लिहिलेले शिक्षक केवळ १.४४ टक्केच ही परीक्षा पास होऊ शकले. मात्र मराठीतून पेपर लिहिलेल्या शिक्षकांपैकी ४.७० टक्के पास झाले. सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी ३५ मार्कांची गरज असते. मात्र शिक्षकांना पास होण्यासाठी ६० मार्क ठेवण्यात आले होते. अर्थातच त्याची आवश्यकता होती. कारण, जे शिक्षक शाळेत विद्यार्थ्यांसाठी शिकवितात, त्यांना किमान ६० टक्के तरी मार्क मिळणे गरजेचे आहे. हा निकष काही चुकीचा नाही. मात्र अनेक शिक्षकांचे मत असे पडले की, पास होण्यासाठी जास्त मार्कांची मर्यादा ठेवल्यामुळे नापास होणार्‍या शिक्षकांची संख्या वाढली. ही परीक्षा झाल्यावर अनेक शिक्षकांचे मत झाले होते की, ही परीक्षा अवघड होती. बहुतांशी शिक्षकांना १५० मार्कांपैकी २० मार्कांचा पेपर सोडविताच आला नाही. शिक्षकांसाठी हा पेपर कठीण काढला होता, त्यामुळे आपण नापास झालो, असे शिक्षकांनी म्हणणे चुकीचे आहे. अर्थात, या परीक्षेमुळे आपल्याकडील शिक्षकांचा दर्जा व पर्यायाने शैक्षणिक दर्जा कसा आहे हे उघड झाले. सरकार आता केवळ परीक्षा घेऊन थांबणार आहे की, पुढील काही कारवाई करुन दर्जा कसा सुधारेल याकडे लक्ष देणार आहे, हादेखील एक प्रश्न आहेच. कारण अनेकदा सरकार काही चांगल्या बाबींना सुरुवात करते, मात्र अनेक हितसंबंधी त्याला खोडा घालतता व सुधारणांची सर्वच प्रक्रिया खोळंबते. या परीक्षेमुळे सरकारला आता आपल्या शिक्षकांची काय स्थिती आहे ते समजले आहे. मग ते सुधारण्यासाठी कोणते उपाय हाती घेणार आहे का, हा पुढील प्रश्न ठरावा. आपल्याकडे मुलांना आता आठवीपर्यंत परीक्षा नाहीत. त्यामुळे मुलांना आठवीपर्यंत आपण ढकलले जाणार याची खात्री झाली आहे. मग शिक्षकांनीही मन लावून का शिकवावे, असाही प्रश्न उपस्थित होतो. मध्यंतरी प्रथम या स्वयंसेवी संस्थेने मुलांच्या शैक्षणिक दर्जाची पाहणी केली होती. त्यात त्यांना पाचवीच्या विद्यार्थाला वाचताही येत नसल्याचे आढळले होते. या पाहणीनंतर आता शिक्षकांच्या परीक्षेचा अहवाल आला आहे. या सर्व बाबी पाहता आपण आपल्या शैक्षणिक दर्जाविषयी गांभीर्याने विचार करणार आहोत किंवा नाही, याचा विचार केला पाहिजे. शिक्षक परीक्षेत नापास झाले, ही वस्तुस्थिती मान्य करुन आता त्यात सुधारणा होण्यासाठी पावले पडली पाहिजेत. तरच आपल्या भावी पिढीचे भवितव्य उज्ज्वल ठरेल.

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel