-->
संपादकीय पान शुक्रवार दि. ४ जुलै २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
अखेर वरुणराजाचे आगमन
---------------------------------------
महिनाभर सर्वाचे प्राण कंठाशी आणणार्‍या वरूणराजाची बुधवारी अखेर दणक्यात सुरुवात झाली. महिन्याभरात पडलेल्या एकूण पावसाच्या दुप्पट कामगिरी करत पावसाने मुंबईत तब्बल १८१ मि.मी.ची नोंद केली. महिनाभरानंतर वरुणराजाचे आगमन झाल्याने आता संपूर्ण रायगड जिल्हा चिंब भिजला आहे. बळीराजा त्याची वाटच बघत होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने किरकोळ हजेरी लावल्यावर शेतकर्‍यांनी भाताचे राब लावले होते. आता पुढील पाऊल पडल्यावर त्याची पेरणी केली जाणार होती. मात्र अनपेक्षितरित्या जवळपास महिनाभर पावसाने दडी मारली त्यामुळे शेतकर्‍याच्या तोंडचे पाणी पळाले होते. आता पुन्हा एकदा राबाचे नुकसान झाले असले तरीही नव्या जोमाने शेतकरी उभा राहाणार आहे. पुढील २४ तासांतही पावसाचा जोर कायम राहणार असून त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होईल, मात्र आठवडाअखेरीस मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. टंचाईग्रस्त भागांत टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. टँकरची बिले वेळेवर देण्याचे आदेशही यंत्रणेला देण्यात आले आहेत. त्याशिवाय टंचाईवरील सर्व उपाययोजनांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. हे उपाय योजताना पैसेवारी विचारात घेतली जाणार नाही. राज्यात ३० जूनपर्यंत ५८.५० मि.मी. म्हणजेच सरासरीच्या २६.३० टक्के पाऊस झाला आहे. जूनअखेर सरासरीच्या तुलनेत ३५५ तालुक्यांपैकी १९४ तालुक्यांत ० ते २५ टक्के, १२३ तालुक्यांत २५ ते ५० टक्के, २८ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के, सात तालुक्यांत ७५ ते १०० टक्के आणि तीन तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. राज्यात आतापर्यंत केवळ २६ टक्केच पाऊस झाला असून धरणांमध्येही १९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यापुढे धरणांमधील पाणी केवळ पिण्यासाठीच राखून ठेवण्याचा आणि टंचाईग्रस्त क्षेत्रात टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बठकीत घेण्यात आला. राज्यात ३० जूनपर्यंत सरासरीच्या २६.३० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, रायगड, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, पुणे, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नांदेड, हिगोली, बुलडाणा, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात सरासरीच्या ० ते २५ टक्के तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, परभणी, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्हयांत २५ते ५०टक्के पाऊस झाला. केवळ सांगलीत ५० टक्क्‌यांपेक्षा अधिक पाऊस झाला. राज्यातील जलाशयांत १९ टक्के साठा असून १४६४ टँकर्सद्वारे १३५९ गावांना आणि ३३१७ वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. राज्यातील धरणांची ही स्थिती चिंताजनकच आहे. अजून पंधरा दिवस पावसाने हजेरी लावली नसती तर राज्यातील अनेक भागात पाण्याची भयानक टंचाई झाली असती. परंतु अशी स्थिती येण्यापूर्वीच वरुणराज परतल्याने सध्यातरी उसासा सोडण्यात आला आहे. मात्र हा पाऊस पुढील आठवडाभर तरी टिकणे गरजेचे आहे. यंदा अल् निओमुळे पाऊस कमी असल्याचे यापूर्वीच हवामान खात्याने जाहीर केले होते. मात्र दरवर्षीच्या सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज होता. मात्र पावसाळा उशीरा म्हणजे जवळपास २२ दिवसांनी सुरु झाला आहे. यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. अगदी मुरुड तालुक्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास ३९०० हेक्टर जमिंनीपैकी ३९० हेक्टर जमीनीवर पहिला पाऊस झाल्यावर पेरणी झाली होती. मात्र पाऊस गायब झाल्याने ही शेती करपली आणि शेतकर्‍यांचे माठे नुकसान झाले. पावसाचा हंगाम सुरु झाल्यापासून आता ४० दिवस लोटल्याने पुढील काळात कितपत पिक येईल याची आता खात्री देता येत नाही. त्यामुळे या शेेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी शेकापने घेतलेली भूमिका रास्तच आहे. अशी जवळपास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणची स्थिती आहे. राज्यातील खरिपाचे सरासरी क्षेत्र १३४.७० लाख हेक्टर असून, ३० जूनअखेर ८.४३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कापूस पिकाखाली १६ टक्के, तर सोयाबीन पिकाखाली चार टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भात पिकाखाली कोल्हापूर विभागात सर्वाधिक ०.५२ लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची धूळफेक पेरणी झाली आहे. राज्यातील सर्व विभागांत पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. सरासरी क्षेत्राशी तुलना करता सहा टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कोकण विभागात शून्य टक्के पेरणी झाल्याचे सरकारी अहवाल सांगतो. खरीप ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, कापूस आदी पिकांच्या पेरणीचे काम कमी पर्जन्यमानामुळे संथ गतीने सुरू आहे. जूनअखेर सरासरीच्या तुलनेत झालेला पाऊस २६.३० टक्के होता. अजूनही राज्यात १४६४ टँकर्सद्वारा ४६७६ गावे-वाड्यांना पाणीपुरवठा करण्याची पाळी आली आहे. आताकुठे पावसाळा सुरु झाल्याने दिलासा लाभत असला तरीही गेल्या महिन्यातला पाण्याचा बॅकलॉग या महिन्यात पाऊस भरुन काढेल का हा प्रश्‍न आहे. तसे न झाल्यास पुढील वर्षी पुन्हा एकदा भीषण पाणी टंचाईला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. कोकणात राज्यात सर्वाधिक पाऊस पडतो मात्र हे पावसाचे बहुतांशी पाणी समुद्रात वाहून जाते. या पाण्याचे जर योग्य नियोजन व त्याचे व्यवस्थापन केले तर वर्षभर वापरले जाऊ शकते. हे करणे सरकारला शक्य आहे परंतु नियोजनशुन्य असलेल्या सरकारकडून ही अपेक्षा ठेवणे चुकीचे ठरेल.
---------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel