-->
राज ठाकरेंची तोफ

राज ठाकरेंची तोफ

शुक्रवार दि. 19 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
राज ठाकरेंची तोफ
गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांचे अलिबागमध्ये घणाघाती भाषण झाल्यावर आज रायगडमध्ये मोदी-शहा या जोडीच्या विरोधात राज ठाकरेंची तोफ डागली जाणार आहे. प्रमुख विरोधी पक्ष असूनही काँग्रेसला जे जमले नाही ते राज ठाकरेंनी आजवरच्या सभांच्या माध्यमातून करून दाखविले. राज ठाकरे यंचे भाषण अतिशय मार्मिक व भाजपाच्या नेत्यांंची हवा गूल करणारे ठरत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, आघाडीचे नेते शरद पवार यांनी आपला प्रचाराचा रोख मोदींवर ठेवला असताना त्यात आता राज यांची त्यात भर पडली आहे. राज यांचा एकही उमेदवार उभा नसला तरीही मोदी व शहांच्या विरोधात मतदान करा ही जोडगोळी देशाला विघातक आहे हे सांगण्यासाठी राज मोदींच्या भाषणाचे पुरावे देतात त्यावेळी वास्तव जनतेला लगेच पटते. राज यांची ही शैली पारच आक्रमक व लोकांच्या मनाला भिडणारी आहे. सुरुवातीला कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रचारात मरगळ आल्यासारखी दिसत होती, परंतु आता त्यांचा आक्रमक प्रचार सुरु झाला आहे. राज ठाकरेंच्या सभांमुळे महाआघाडीला अप्रत्यक्षपणे बळ मिळत आहे. त्यामुळे यावेळी शिवसेना-भाजपा युतीला अतिशय वाईट दिवस पहावे लागणार आहेत हे नक्की. रायगडमधील लोकसभेचे युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या विरोधात आता जनमत तयार झाले आहे. असला निक्रिय खासदार आपल्याला नको असे रायगडकर जनता बोलू लागली आहे. राज ठाकरे हे थेट आघाडीला मतदान करा असे सांगत नसले तरी त्याचे थेट लाभ महाआघाडीलाच मिळणार आहेत. राज यांची भाषमाची शैलीच काही औरच आहे. ते ज्यावेळी लावारे तो व्हिडिओ असे बोलतात त्यावेळी भाजपाच्या छातीत धडकी भरते. राज ठाकरेंच्या मुंबई, नांदेडमधील सभांना मिळालेला तुफान प्रतिसाद पाहून महाआघाडीचा आत्मविश्‍वास दुणावला आहे. आता महाडच्या सभेतही राज यांची ही तोफ डागली जाणार आहे. त्यात अनंत गीतेंचा बळी पडणार हे नक्की. पाच वर्षे सत्तेत राहूनही अजून भाजपाला आपण केलेल्य कामांची जंञी सादर करता आलेली नाही. गेल्या साडेचार वर्षातील शिवसेनेसोबतचे वैर संपुष्टात आणून लोकसभेसाठी युती केली. उत्तर प्रदेशमध्ये बसपच्या सर्वेसर्वा मायावती व समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव एकत्र आल्यामुळे भाजपला तेथे 2014 च्या लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती करणे अवघड वाटते. त्यामुळे उत्तर प्रदेश खालोखाल लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणार्‍या महाराष्ट्रावर भाजपने लक्ष केंद्रीत केले, परंतु तेथे त्यांना फारसे काही यश लाभणार नाही. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या हिंदी पट्टयात विधानसभा निवडणुकीत दणका बसल्याने भाजपला महाराष्ट्र, बिहार आणि गुजरातमधून जास्त अपेक्षा आहेत. हिंदी पट्टयातील नुकसान या तीन राज्यांत भरून काढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाजपने फार खळखळ न करता शिवसेनेच्या राजकीय अटी मान्य करून युती घडवून आणली. निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केला जात आहे, सर्व प्रकारची माध्यमे ताब्यात घेऊन केवळ भाजपाच्याच विजयाचा डंका पिटविला जात आहे. मात्र जनता याला भूलणार नाही, कारण गेल्या वेळी केलेली चूक त्यांच्या आता लक्षात आली आहे. महाराष्ट्रात तर राज ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता ते भाजपा-शिवसेनेच्या स्वप्नांचा चुराडा करतील असेच दिसत आहे. राज यांनी पक्षाच्या स्थापनादिनी त्यांनी लोकसभा निवडणुकीविषयीची भूमिका स्पष्ट केली. 2014 च्या निवडणुकीत दारूण अपयश आल्यानंतर राज यांनी यापुढे लोकसभा निवडणूक लढणार नाही असे जाहीर केले होते. या भूमिकेने शिवसेना-भाजपच्या जीवात जीव आला होता. आता मात्र राज यांनी मोदी व अमित शहा यांना टीकेचे लक्ष्य करीत भाजपच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केल्याने भाजपच्या पायाखालची वाळू घसरू लागली. कॉँग्रेसने जो आक्रमकपणा दाखवायला पाहिजे होता तो आता राज दाखवित आहेत. पंतप्रधान मोदींच्या भाषणाचे जुने संदर्भ देऊन राज ठाकरे त्यांच्या कृती आणि उक्तीतील फरक स्पष्ट करत आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिलेली आश्‍वासने, नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी, पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईक, सैन्यदलाच्या कारवाईचे घेतले जाणारे श्रेय, राफेलचा घोटाळा, वाढती बरोजगारी, मुद्रा योजनेतील गौडबंगाल आदी मुद्यांवर राज आपली भूमिका रोखठोकपणे मांडत आहेत. भाजपच्या नेत्यांनी सुरुवातीला त्यांच्या भाषणाकडे दुर्लक्ष केले. राज यांच्या सभांची हेटाळणी स्टॅण्डअप कॉमेडी म्हणून केली. परंतु, राज यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने भाजपला त्यांची दखल घ्यावी लागली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रताळयाला म्हणतंय केळं आणि दुस़र्‍याच्या लग्नात नाचतंय खुळं ही खास ग्रामीण म्हण मतदारांना ऐकवली. अशा म्हणींचा फारसा काही उपयोग होणार नाही. कारण जनतेला आता तुम्ही केलेल्या कामांचा हिशोब पाहिजे आहे. भाजपाची बुलेट ट्रेन कधी सत्यात उतरणार नाही, मात्र मनसेच्या इंजिनला आवरा असे म्हणण्याची वेळ भाजपवर आली आहे.
---------------------------------------------------------

0 Response to "राज ठाकरेंची तोफ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel