-->
भाजपाची झुंडशाही

भाजपाची झुंडशाही

गुरुवार दि. 18 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
भाजपाची झुंडशाही
मुंबईत यावेळी सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे ते उत्तर मुंबईतील लढतीकडे. येथे भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी व कॉँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यात लढत आहे. यापूर्वी येथे अशीच एक लढत रंगली होती ती, तत्कालीन खासदार राम नाईक व अभिनेता गोविंदा यांच्यात. आज त्याची आठवण येण्याचे कारण म्हणजे गोपाळ शेट्टींना आपला राम नाईक तर होणार नाहीना अशी भीती वाटू लागली आहे. राजकारणात नवख्या असलेल्या अभिनेत्या गोविंदाने कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून भाजपाच्या राम नाईकांसारख्या दिग्गजाला धूळ चारली होती. इतिहासाची पुनरावृत्ती आता येथे होते की काय अशी भीती भाजपाला वाटू लागली आहे. कारण गेल्या काही दिवसात उर्मिलाच्या सभांना व रोड शो ला जनतेतून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच भाजपाचे कार्यकर्ते आता बेभान झाले आहेत. बोरीवली स्टेशनच्या बाहेर उर्मिला मातोंडकर यांची सभा सुरु असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोदी, मोदी अशा घोषणा दिल्या आणि अखेर यातून मोठा तणाव निर्माण झाला. खरे तर कोणत्याही पक्षाची सभा सुरु असताना अगोदर त्यांचे विचार एैकून घ्यावे लागतात व त्यानंतर ते विचार पटले नाहीत तर त्यावर विरोधात मतप्रदर्शन करावयाचे असते. मात्र इकडे अगोदरच हुल्लडबाजी भाजपा कार्यकर्त्यांनी केली. त्यावरुन उर्मिला व शेट्टी यांच्यात तुल्यबळ लढत होणार हेच यावरुन दिसते. उत्तर मुंबईतील रणांगणात उर्मिला मातोंडकर उतरायच्या अगोदर गोपाळ शेट्टी यांना सर्वच मैदान मोकळे होते अशी त्यांची धारणा होती. उर्मिला एक नामवंत कलाकार असल्यामुळे तिच्याभोवती असलेल्या ग्लॅमरचा तिला गोविंदाप्रमाणेच फायदा निश्‍चितच होणार आहे. त्याचीच भीती आता गोपाळ शेट्टींना वाटू लागली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सभा उधळवून लावण्याची झुंडशाही भाजपाच्या वतीने केली जात आहे. यावरुनच भाजपामध्ये भीतीचे वातावरण तयार झाल्याचे दिसते. गेल्या वेळी मुंबईत सर्वच्या सर्व म्हणजे सहाही जागा भाजपाने आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. मुंबईतला मतदार हा बहुभाषिक असून तो कोणा एका खासदाराची मक्तेदारी शक्यतो ठेवत नाही. त्यात काही अपवाद असतात. परंतु सलग एकाच खासदाराला सलग तीन वेळा निवडून देण्याच्या घटना फारच कमी आहेत. परंतु यावेळी भाजपासाठी मुंबईत फारसे अनुकूल वातावरण नाही. त्यामुळे शंभर टक्के यश भाजपाला मिळणार नाही हे नक्की. यावेळी गेल्या वेळसारखी मोदी लाट ही अस्तित्वात नाही. त्यामुळे भाजपाला फायदा होणार नाही. त्यात कॉँग्रेस कितपत बाजी मारते हे पहाणे गंमतीच ठरेल. मुंबईत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अस्तित्व फारसे नाही. मात्र यावेळी मनसेने भाजपाच्या विरोधात मतदान देण्याचा आदेश काढल्याने त्याचा फायदा हा कॉँग्रेस-राष्ट्रवादीलाच होणार आहे. त्यामुळे मनसेची मते ही त्यांनाच पडतील. काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा अधिक आक्रमकपणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी-शहा जोडी हटाव देश बचाव हा निर्धार करत भाजपच्या विरोधात जोरदार रणशिंग गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कमधून फुंकले. राज यांचा शहरी भागातील प्रभाव पाहता आघाडीची ताकद वाढणार आहे. मुंबईतील 6 आणि ठाण्यातील 4 जागांचा विचार करता मनसेचा या सर्व मतदारसंघात ब़र्‍यापैकी प्रभाव असल्याने मुंबईतील काही जागांवर यावेळी चमत्कार झाल्याचे बघायला मिळतील याबाबत शंका नाही. उत्तर मुंबई मतदारसंघात उर्मिला मातोंडकरसाठी एक प्रचारसभा राज ठाकरे घेणार आहेत. त्याचा त्यांना फायदा होईल. वायव्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या गजानन कीर्तीकर यांच्याविरोधात काँग्रेसचे संजय निरूपम हे उमेदवार आहेत. उत्तर भारतीयांचे मोठे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात निरूपम यांनी स्वत: उमेदवारी मागून घेतली आहे. दुसरीकडे गजानन कीर्तीकर यांच्याऐवजी त्यांचा मुलगा अमोल यांच्या नावाची चर्चा असताना पुन्हा एकदा गजानन कीर्तीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर भारतीय मतांचे धुव्रीकरण या मतदारसंघात महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबई ईशान्य मतदारसंघातून भाजपने उमेदवार बदलताना किरीट सोमय्यांना डावलत मनोज कोटक यांना संधी दिली आहे. येथून मनोज कोटक विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील असा सामना रंगणार आहे. दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांच्यात लढत होईल. दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्यात जरी लढत असून ही जागा कॉँग्रेसला मिळू शकते,असा अंदाज आहे. उत्तर मध्य मुंबई हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला समजला जातो, मात्र 2014 मध्ये मोदी लाटेत येथील बहुसंख्य मुस्लीम समाजाने प्रिया दत्तऐवजी पूनम महाजन यांना कौल दिला. आता येथेे चमत्कार होऊ शकतो. मुंबईचा कौल कोणत्या पक्षाच्या दिशेने लागतो तो सहसा केंद्रात सत्तास्थानी विराजमान होतो असा अंदाज असतो. यावळी मुंबईकर कोणाला कौल देणार हे पहाणे गंमतीचे ठरेल.
---------------------------------------------

0 Response to "भाजपाची झुंडशाही"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel