-->
परिवर्तनाची नांदी

परिवर्तनाची नांदी

शनिवार दि. 20 एप्रिल 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
परिवर्तनाची नांदी
अलिबागमध्ये गुरुवारी झालेली कॉँग्रेस-राष्ट्रवादी-शेकापच्या महाआघाडीची सभा म्हणजे देशातील परिवर्तनाची नांदीच होती असे म्हणावे लागेल. हनुमान जयंतीच्या पूर्वसंधेवर ठिकठिकाणी गावातील आपल्या उत्सवाची तयारी करीत असताना हजारोंच्या संख्येने या महाआघाडीच्या सभेला लोक उपस्थित होते, ही एक लक्षणीय बाब म्हटली पाहिजे. याचाच अर्थ स्पष्ट आहे लोकांना यावेळी परिवर्तन पाहिजे आहे व अलिबागच्या सभेला उपस्थित राहून या परिवर्तनाचा आपण एक भाग झाले पाहिजे ही या सभेला आलेल्या प्रत्येकाची भावना होती. जिल्ह्यातील शेकाप-कॉँग्रेस-राष्ट्रवादीची नेते मंडळी एकाच व्यासपीठावर येतील असे रायगडच्या इतिहासात कधी घडले नव्हते, परंतु ते शक्य झाले. अर्थात रायगड मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या प्रयत्नाने ही एकजूट पहावयास मिळाली. शेकापचे नेते आमदार भाई जयंत पाटील व कॉँग्रेसचे नेते, माजी आमदार मधूशेठ ठाकूर यांना एकाच व्यासपीठावर खेळीमेळीच्या वातावरणात हस्तांदोलन करताना पाहिल्यावर संपूर्ण जिल्ह्याला या महाआघाडीच्या पर्यायी राजकारणाची महती पटली. अर्थात या नेत्यांमध्ये, त्यांच्या विचारांमध्ये सेक्युलर विचार सुरुवातीपासून ठासून भरलेला आहे. आता देशातील लोकशाही, देशाचा मुख्य पाया असलेला सेक्युलर विचार, देशाचे संविधान अडचणीत आल्यावर ते वाचविण्यासाठी हे नेते आपल्यातील मतभेद बाजूला सारुन एकत्र आले हे महत्वाचे आहे. आज देशातील आपली लढाई ही हिंदुत्ववाद विरुध्द सेक्युलर विचार यातील आहे. गेल्या पाच वर्षात भाजपाच्या मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देशाचा स्वातंत्र्यानंतर नेहरुंनी उभारलेला ढाचाच बदलण्याचा घाट घातला होता. यातून समविचारी पक्षांनी एकत्र येऊन हिंदुत्ववाद्यांचा हा डाव हाणून पाडण्याची आवश्यकता होती. तसे झाले तरच या देशातील लोकशाही वाचू शकते, हे ओळखून राज्यात समविचारी पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न शरद पवारांनी सुरु केले व त्याला चांगले यश आले. यातून महाआघाडी उभी राहीली. ही महाआघाडी वैचारीक बैठकीवर पक्की उभी असल्यामुळे तिला विणण्यासाठी समान विचारांचा धागा आहे. केवळ निवडणुकीच्या किंवा सत्ता संपादन करण्याचा विचार नाही तर देशाचे संविधान, लोकशाही वाचविण्याचा सुरु असलेला हा एक प्रयत्न आहे. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ, जुने, जाणत्या नेत्यांनी यासाठी कष्ट घेतल्यामुळे त्याला राजकीय वजन प्राप्त झाले आहे. अशा प्रकारचा प्रयोग देशातील विविध राज्यात कॉँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी केला आहे. काही ठिकाणी त्यांना यश लाभले तर काही ठिकाणी अपयश. मात्र देशात मोदी-शहा विरोधी जनमत तयार करण्यासाठी या आघाड्या महत्वाचे काम करीत आहेत. 23 मे ला निकाल लागल्यावर पुन्हा एकदा समविचारी पक्ष एकत्र येऊन देशात पर्यायी सरकार देण्याचा प्रयत्न करतील व त्यात ते यशस्वी होतील यात काही शंका नाही. गुरुवारी अलिबागला झालेल्या या सभेत सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात भाजपाच्या गेल्या पाच वर्षाच्या कामगिरीचा समाचार घेतला. देशातील परिवर्तनाची सुरुवात अलिबागपासून झाली असे म्हणता येईल. कारण यावेळी सुनिल तटकरे यांचा विजय नक्की आहे. गेल्या वेळी सुनिल तटकरे यांंचा पराभव जेमतेम दोन हजारांनी झाला होता. त्यावेळी शेकाप तटकरेंच्या सोबत नव्हता. आता मात्र कॉँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप हे तिघेही एकत्र आल्याने तटकरेंची ताकद वाढली आहे त्याचबरोबर विद्यमान खासदार अनंत गीते यांनी आपल्या गेल्या सहा वेळच्या खासदारकीच्या काळात फारसे काहीच काम केलेले नाही. रायगड मतदारसंघाचे विभाजन झाल्यावर गीते यांना दोन वेळा रायगडमधून लोकसभेवर पाठविले. गेली पाच वर्षे तर गीते केंद्रीय मंत्री होते. परंतु त्यांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले असा सवाल जनता विचारत आहे. त्यांच्या अवजड मंत्रालयातील एखादा जरी प्रकल्प त्यांनी आणला असता तरी मोठ्या नोकर्‍यांची संधी जिल्ह्यात उपलब्ध झाली असती. परंतु गीतेंनी काहीच काम केले नाही. गीतेंच्या निक्रियतेमुळेही तटकरेंचा विजय निश्‍चित झाला आहे. देशात परिवर्तन करताना आपल्याला जशी लोकशाही, घटना टिकविण्याची आपल्यावर जबाबदारी आहे तसेच जिल्ह्यात परिवर्तन करताना येथे कार्यक्षम खासदार बसवून जनतेला दाखवून द्यायचे आहे. त्याचबरोबर गीते ज्या भाजपा-शिवसेना आघाडीत आहेत त्यांनी काल परवा पर्यंत परस्परांशी वैर धरले होते. शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे हे सत्तेत मांडीला मांडू लावून बसूनही मोदींना शत्रू मानित होते त्यांनीच रातोरात पलटी मारुन भाजपासोबत पुन्हा युती केली. त्यामुळे यांच्यात वैचारिक गोंधळ आहे. त्यामुळे जिल्हयापासून ते देशात परिवर्तन होण्याची आवश्यकता आहे. याची चाहूल बहुदा देशातील आघाडीचे भांडवलदार मुकेश अंबानींना लागली असावी. कारण त्यांनी यावेळी उघडपणे दक्षिण मुंबईतील कॉँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला आहे. याचा अर्थ स्पष्टच आहे, यावेळी लोकांचे जनमत हे सत्ताधार्‍यांच्या विरोधात आहे याची चाहूल मुकेशभाईंना लागली असावी. त्यामुळे यावेळी परिवर्तन होणार आहे व त्याची नांदी अलिबागच्या सभेपासून सुरु झाली आहे.
-----------------------------------------------------

0 Response to "परिवर्तनाची नांदी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel