
स्थानिक पक्षांचे वर्चस्व
03 मेच्या अंकासाठी अग्रलेख
स्थानिक पक्षांचे वर्चस्व
कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले असतानाही सत्ताधारी पक्षाने त्याकडे लक्ष केंद्रीत करण्याऐवजी हट्टाने घेतलेल्या पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांतील निकाल पाहता स्थानिक पक्षांनी मोठ्या प्रमाणावर बाजी मारली आहे. केंद्रात सत्तास्थानी असलेल्या भाजपाने या पाचही राज्यात मोठी हवा निर्माण करुन आपण सत्तेवर येणार असे चित्र निर्माण केले होते. परंतु तसे काही न झाल्याने भाजपासाठी हा एक मोठा धक्का समजला पाहिजे. या निकालातून भाजपाच्या सर्वत्च राज्यात आपलीच सत्ता ठेवण्याच्या इर्षेलाही लगाम लागला आहे. तसे पाहता पश्चिम बंगाल, केरळ, तामीळनाडू या तीन राज्यात भाजपा अगदीच नगण्य आहे, मात्र साम, दाम, दंड याच्या जोरावर येथे सत्ता काबीज करण्याचा त्यांचा डाव जनतेनेच उधळून लावला आहे. आसाममध्ये फक्त त्यांना आपली सत्ता कायम राखता आली आहे, तर देशात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉँग्रेसची सर्वच राज्यात निराशाजनक कामगिरी झाली आहे. गेली सात वर्षे सतत होत असलेल्या पराभवाचे कॉँग्रेसने विश्लेषण करुन आपल्या चुका सुधारण्याची अजून वेळ गेलेली नाही. परंतु आजवरचा अनुभव पाहता कॉँग्रेस या पराभवातून बोध घेईल असे काही दिसत नाही. एकीकडे केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाचा पराभव होत असताना दुसरीकडे राष्ट्रीय असलेल्या विरोधी पक्षालाही अपयश येत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे देशात स्थानिक पक्ष पुन्हा नव्याने मजबूत होऊन सत्ताधारी भाजपाला एक समर्थ पर्याय देण्याच्या स्थितीत येत आहेत, असे एक चित्र या निकालांच्या निमित्ताने तयार होत आहे. या निकालांचा खरा अन्वयार्थ हाच आहे की, भाजपाच्या कामगिरीवर जनता नाराज आहे मात्र दुसरीकडे भाजपाला पर्याय म्हणून जनता कॉँग्रेसकडे पाहात नाही तर स्थानिक पक्षांकडे त्यांचा कल जातो आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बँनर्जी यांच्या तृणमूल कॉँग्रेसने पुन्हा म्हणजे तिसऱ्यांदा सत्ता राखण्य़ात यश कमविले. यावेळी भाजपाने त्यांना पुरते घेरले होते. अगदी राज्यात सहा टप्प्यात निवडणुका घेण्यापासून ते हिंदू मतांचे केंद्रीकरण करण्यापर्यंतचे सर्व उपाय करुन ममतादीदींना यावेळी सत्ताभ्रष्ट करण्याचा चंगच बांधला होता. परंतु दीदींनी झाशीच्या राणीप्रमाणे एकाकी लढत दिली व विजयश्री खेचून आणली. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने थैल्या सोडल्या होत्या. त्या जोरावर त्यांनी अनेकांना आपल्या पक्षात खेचले होते. त्यात सेलिब्रेटींसह अनेक मुरलेल्या राज
कारण्यांचाही समावेश होता. परंतु जनतेला हे मान्य नव्हते. ममतादीदींची जनसामान्यात असलेली स्वच्छ प्रतिमा देखील ही सत्ता त्यांना मिळविण्यास कामी आली. भाजपाने त्यांना सर्वच मार्गांचा अवलंब करुन सोळो की पळो करुन सोडले होते, परंतु दीदींनी आपला किल्ला एकहाती लढविला. खरे तर डावे व कॉँग्रेसने त्यांच्याबरोबर जाणे गरजेचे होते. परंतु त्यांनी तसे केले नाही आणि आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. हे दोन्ही पक्ष आता राज्यात संपल्यात जमा झाले आहेत. भाजपाच्या हुकूमशाहीला संपविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे हे ममतादीदींचे आवाहन त्यांना पटणारे नव्हते. आता शेवटी जनतेनेच या दोन्ही पक्षांना राज्यात चंगलाच धडा शिकविला आहे. केरळात डाव्यांनी आपला बालेकिल्ला राखला आहे. तेथे त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष कॉँग्रेस आहे, सर्वसाधारणपणे केरळातील जनता सलग दोन वेळा एकाच पक्षाला सत्ता देत नाही. परंतु यंदा त्यांनी सलग दुसऱ्यांदा डाव्यांच्याच आघाडीला पसंत केले आहे. तेथेही भाजपाने मेट्रोमॅन म्हणून प्रसिध्द असलेले ई श्रीधर यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करुन त्यांच्या प्रतिमेचा लाभ मिळतो का, त्याची चाचपणी केली होती. परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही. केरळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने गेली पाच वर्षे अनेकदा धार्मिक प्रश्नावर तेढ निर्माण करुन भाजपाच्या बाजूने जनमत संघटीत करण्याचे अनेकदा प्रयत्न केले होते. परंतु केरळातील जनता जशी शंभर टक्के साक्षर आहे तसेच ती राजकीयदृष्ट्याही जागृत देखील आहे हे त्यांनी या निकालातून दाखवून दिले. तेथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गेल्या काही वर्षात आपल्यात अनेक बदल केले, त्यचे त्यांना फायदे मिळाले आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी तरुणांच्या नव्या पिढीला चांगलाच वाव दिला आहे, कोरोनाच्या संकटकाळात प्रशासन व पक्ष यंत्रणेने अतिशय चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे जनतेने त्यांना पुन्हा एकदा निवडून दिले आहे. त्यामुळे केरळात माकप व त्यांची डावी आघाडी पुन्हा सत्ता राखू शकली. तामीळनाडू या दक्षीणेतील सर्वात मोठ्या राज्यात सुरुवातीपासूनच कोणताच राष्ट्रीय पक्ष रुजू शकलेला नाही. त्यामुळे द्रमुक व अण्णाद्रमुक या दोन्ही पक्षांच्या सोबतीला कॉँग्रेस किंवा भाजपाला जाण्याशिवाय पर्याय नाही. येथे देखील द्रमुकने आपली गेलेली सत्ता पुन्हा मिळविण्यात यश मिळविले आहे. भाजपाने इकडे देखील सिनेअभिनेता रजनीकांत याला आपल्यासोबत घेऊन सत्ता काबीज करण्याचा डाव आखला होता, परंतु रजनीकांत भाजपा आपला वापर करुन घेत आहे, असे दिसल्यावर निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे भाजपाची इकडे काही डाळ शिजू शकली नाही. आसाममध्ये फक्त भाजपाला सत्ता राखण्यात य़श आले आहे. मात्र गेल्या काही दिवसात त्यांनी प्रसार माध्यमे व सोशल मिडीयाला हाताशी घेऊन असे काही चित्र उभे केले होते की, आता भाजपाचीच सर्वत्र सत्ता येणार. परंतु त्यांचा पुरता फज्जा उडाल्याने आसाममधील त्यांचे यश झाकोळले गेले आहे. या निवडणुकीतून जनतेच्या मनातील अनेक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे केंद्रातील सत्तेच्या जोरावर तसेच थैल्या रित्या करुन राज्यातील सत्ता सहजरित्या काबीज करता येत नाही हे सिध्द झाले आहे. त्याचबरोबर सोशल मिडिया व अन्य मिडिया हातशी घेऊन जनतेच्या मनात दुही निर्माण करुन सत्ता मिळविता येत नाही, हे जनतेने दाखवून दिले आहे. जनतेला आता भाजपाला पर्याय हवा आहे, परंतु देशव्यापी समर्थ पर्याय दिसत नसल्याने स्थानिक पक्षाकडे जनता वळते आहे. २०२४च्या लोकसभेला यातूनच भाजपाला पर्याय निर्माण होणार आहे. या निकालामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर होण्यास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हातभार लागला आहे. त्यामुळे यातील घटक पक्षांनी आपल्यातील भांडणे सोडून जनतेसाठी काम करुन दाखविणे गरजेचे आहे. त्यातूनच त्यांचे अस्तित्व मजबूत होणार आहे. ही निवडणूक भाजपाप्रमाणे कॉँग्रेसलाही धडा शिकविणारी ठरली आहे.
0 Response to "स्थानिक पक्षांचे वर्चस्व"
टिप्पणी पोस्ट करा