-->
अमेरिकेला धक्का

अमेरिकेला धक्का

संपादकीय पान बुधवार दि. १५ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अमेरिकेला धक्का
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ऑरलॅन्डो येथील समलिंगींच्या नाईट क्लबवर झालेल्या गोळीबारात ५०च्या वर मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत ९/११च्या हल्यानंतर आजवर अतिरेकी हल्ला झाला नव्हता. अर्थात या दोन्ही अतिरेकी हल्यात फरक आहे. ९/११च्या हल्यातील अतिरेकी हे देशाच्या बाहेरुन आलेले होते व सध्याच अतिरेकी हा अमेरिकेच वाढलेला तरुण होता. आजवरची अमेरिकेची अभेद्य संसरक्षण यंत्रणा फोडून अतिरेकी आत घुसले नसले तरीही देशात जन्मलेला व वाढलेला तरुण तेथे अतिरेकी होतो हा बाब सर्वात धक्कादायक व चिंतेची आहे. या हल्यामागे आपणच आहोत असे इसिसने जाहीर केले आहे. ओमर मीर सादिक मतीन नावाच्या त्या २९ वर्षाच्या मुस्लीम तरूणाने इसिस वा इतर कोठल्याही जिहादी संघटनेकडून प्रशिक्षिण घेतले नव्हते. इसिसच्या प्रचाराच्या प्रभावाखाली येऊन हे हत्त्याकांड करण्यास तो प्रवृत्त झाला असावा, असा अंदाज आहे. मात्र तसे असले तर ती सर्वात जास्त धक्कादायक बाब म्हटली पाहिजे. अमेरिकेत सज्ञान व्यक्तीला शस्त्रे विकत घेण्याची मुभा असते. त्यानुसार या हल्लेखोराने शस्त्रे विकत घेतले आणि बेघूट गोळीबार केला. अमेरिकेत वाढलेला तरुण जर इसिसच्या विचाराकडे ओढला जात असेल तर त्याची कारणे आता शोधावी लागणार आहेत. सध्या अमेरिकेत निवडणूक ज्वर तापू लागला आहे. अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे बहुतेक उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिमांना अमेरिकेत येण्यावर बंदी घालण्याची सूचना केली आहे. आपण अध्यक्ष झाल्यास बंदी घालेन अशी त्यांनी घोषणाच केली आहे. सध्याची घटना पाहता ट्रम्पसारख्यांना आणखी बळ मिळते. हल्लेखोर मतीन हा अमेरिकी नागरिक होता, तेव्हा मुस्लीमांना देशात येण्यास बंदी घातली, तरी जे अमेरिकी नागरिक मुस्लीम आहेत, त्यांचे काय, हे लक्षात घेतले, तर ट्रम्प यांच्या मागणी पाठीमागचा राजकीय उद्देश स्पष्ट होतो. नेमका येथेच अमेरिकेतील राजकीय व समाजव्यवस्था, त्या देशाचे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि त्याचे होणारे अपरिहार्य परिणाम यांचा संबंध येतो. अमेरिकी राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे कोणत्याही धर्माचा, पंथाचा, वंशाचा अथवा विचारसरणीचा पुरस्कार, प्रसार वा प्रचार करणे हा गुन्हा नाही.
जॉर्ज बुश यांच्या कारकिर्दीत पश्चिम आशियात अमेरिकेने जे काही केले, त्याची परिणती इसिसमध्ये झाली, याची कबुली खुद्द ओबामा यांनीच दिली आहे. इसिस ही तेढीतूनच उभी राहात गेली आहे. व्यक्तिगत आयुष्यात समस्या असलेल्यांना हेरून, अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून, तुमची समस्या ही ख्रिश्चन अमेरिकेमुळे उद्भवली आहे, हे त्यांच्या मनावर इसिस बिंबवत आली आहे. एका आकडेवारीनुसार इसिस दररोज ५० हजार ट्विट्स पाठवत असते. त्यात खर्‍या-खोट्याची बेमालूम सरमिसळ असलेले व्हिडिओ व जहाल प्रचार असतो. मतीन इसिसच्या अशा कार्यपद्धतीचा बळी आहे.

0 Response to "अमेरिकेला धक्का"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel