
पुरावर मात करण्यासाठी...
8 ऑगस्ट मोहोरसाठी चिंतन
पुरावर मात करण्यासाठी...
कोकणात आलेल्या पुरामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे. कारण कोकणात सहसा पूर किंवा वादळे येत नाहीत. परंतु गेल्या दोन वर्षात या सर्वांला धक्का बसला आहे. गेली सलग दोन वर्षे कोकणात वादळ आले व मोठे नुकसान करुन गेले. वादळ, पूर व भूकंप या नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी आता विज्ञानाचा वापर करता येतो. भूकंपाची आगावू सूचना देणारे तंत्र जपानने अवगत केले आहे व त्यातून अनेकांचे जीव वाचविण्यात त्यांना यश आले आहे. आपल्याकडे मात्र हे प्रगत तंत्रज्ञान अजूनही विकसीत करण्यात आलेले नाही. मात्र वादळाची आगावू सूचना देऊन आपण अनेकदा वादळांचा मुकाबला यशस्वीरित्या केला आहे व हजारो जणांचे प्राण वाचविले आहेत. चार वर्षापूर्वी ओरिसाने दहा लाख लोकांचे स्थलांतर चक्रिवादळाची आगावू सूचना मिळाल्याने केले होते. हे वादळ एवढे भयानक होते की, यात हजारो जणांचे प्राण गेले असते परंतु आपण आधुनिक विज्ञानाच्या आधारावर सर्वांचे प्राण वाचवू शकलो. गेल्या वर्षी कोकणात आलेल्या चक्रिवादळाचेही असेच भीषण स्वरुप होते, परंतु मोठ्या प्रमाणात जीवितहानी वाचविण्यात आपल्याला यश आले आहे. यंदाच्या देखील वादळात मालमत्तेची व झाडांची हानी झाली परंतु माणसांना वाचविण्यात यश आले. भूकंप व चक्रिवादळाच्या धर्तीवर आपण पूराचाही वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अवलंब केल्यास यशस्वी मुकाबला करु शकतो. कोकणात यंदा पूर आला त्यावेळी जेवढा पाऊस पडला तेवढाच पाऊस यापूर्वीही कमी अधिक प्रमाणात पडला होता. तरी देखील कोकणात पूर किंवा महापूर का आला, याचा विचार केला गेला पाहिजे. चार वर्षापूर्वी मुसळधार पावसात सावित्री नदीवरील पूरात पूलच वाहून गेला होता. परंतु आजवर कोकणात तुफान पाऊस पडूनही सध्यासारखा महापूर कुणीच अपवादात्मक परिस्थितीत पाहिलेला नव्हता. चिपळूणला दरवर्षी किंवा दर एक वर्षाआड पूर येतो. चिपळूणची भौगोलिक स्थिच त्याला कारणीभूत आहे. परंतु सध्याचे स्वरुप उग्रच होते. महाड व कोल्हापूर या शहरांची गेल्या काही वर्षात झालेली वाढ, येथील पाण्याचा निचरा होण्यासाठी न केलेल्या तरतुदी यामुळे येथून पूराचे स्वरुप उग्र झाले. चिपळूण शहर हे तसे पाहता सखल भागात आहे, तेथील नदी गेल्या काही वर्षात आक्रसत चालली आहे. जुने चिपळूण विकसीत होत असताना नवीन भागात कोणतेही योग्य नियोजन झालेले नाही. चिपळूणमधील संपूर्ण बाजारपेठ ही सखल भागात मोडते. त्या सर्वाचा हा परिणाम म्हणून पूराचे स्वरुप उग्र झाले आहे. महाडमध्ये अनधीकृत बांधकामाची रेलचेल आहे. अनेक डोंगरांच्या पायथ्याशी वसलेल्या या शहरात कोणतेही नियोजन नाही, पाण्याला बाहरे जाण्यासाठी वाव नाही. त्यात नदीचे पात्र देखील आक्रसत जात आहे. पाऊस कोसळत असताना जर समुद्राला भरती आल्यास नदीच्या पाण्याला वाव मिळत नाही. कोल्हापूर शहराची स्थीती काही वेगळी नाही. त्यामुळे पाऊस जास्त पडला हे वास्तव मान्य करीत असतानाही मानवाने नियोजनाच्या केलेल्या चुकाच जास्त घातक ठरत आहेत. प्रत्येक वेळी आपण हवामान बदलाचे कारण सांगून आपण केलेल्या चुका पोटात घालू शकत नाही. एकीकडे सरकार आपत्ती व्यवस्थापनाच्या गप्पा करते मात्र पूराच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देत नाही, अशी स्थिती आहे. पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी सरकारला वेळोवेळी अशा प्रकारच्या आपत्तीविषयी जागृत केले होते. परंतु त्याकडे कोणताच सत्ताधीश (सध्याचे सत्ताधारी असोत किंवा यापूर्वीत सत्तेत असलेले) या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन यावर तोडगा काढण्यासाठी तयार नाहीत. कोकणात आलेले पूर असो किंवा पश्चिम महाराष्ट्रात आलेला पूर असो त्याची विभागणी स्वतंत्रपणे करता येणार नाही. हे विभाग वेगवेगळे असले तरीही भूपृष्टाचा विचार करता एकमेकांशी संलग्न आहेत. त्यामुळे येथील नैसर्गिक आपत्तीचा विचार करताना समान विचार करावा लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे पूर आलेल्या भागातील नद्या व नाल्यांतील गाळ साफ करुन त्यांचे आकूंचित पावलेले प्रवाह साफ करुन त्यांना मोकळेपणाने प्रवाहासाठी वाट उपलब्ध करुन दिली पाहिजे. पश्चिम घाटातील किंवा कोकणातील अनेक डोंगर बोडके करण्याचा घाट गेले काही वर्षे सर्रास सुरु आहे. त्याचा परिणाम लोकांना भोगावा लागतो आहे. पाणलोटातील पाण्याचा प्रवाह निश्चित करुन नदीपात्राचे रुंदीकरण करण्याची आवश्यकता आहे. वृक्षांची नव्याने लागवड केली जात असताना जुने वृक्ष तोडले जाणार नाहीत याकडे पाहावे लागणार आहे. पूराचे पाणी शिरते तेथे भिंत बांधण्याचा प्रस्ताव सध्या सरकार दरबारी आहे. अशा प्रकारची भिंत वाधणे म्हणजे मूर्खपणाच आहे याने काही फायदा होणार नाही तर कंत्राटदारांचीच भर होईल. अशा प्रकारे भिंत बाधून पाणी अडवता येणार नाही. पाण्याचा प्रवाह हा कितीही पावसात कसा कायम टिकेल हे पाहिले गेले पाहिजे. सध्या पाणी अडविले गेल्याने ते पाणी घरात शिरते आहे हे मुळात लक्षात घेऊन त्यादृष्टीने भविष्यात नियोजन करण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे दीर्घकालीन उपाययोजना करण्याएवजी काही तरी हंगामी करुन तात्पुरते उपाय करण्याचे पाहिले जाते. मुंबईत २००५ साली आलेल्या महापुरानंतर ज्या उपाययोजना सुचविल्या होत्या त्याची अंमलबजावणी झालेलीच नाही. त्यामुळे मुंबईतील पुराचा धोका कायमच आहे. आता केवळ मुंबईच नव्हे तर कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राचा पूर निवारणासाठी शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करुन त्यावर उपाययोजना झाल्या पाहिजेत. अन्यथा असे पूर हे येतच राहाणार हे लक्षात ठेवले पाहिजे.
0 Response to "पुरावर मात करण्यासाठी..."
टिप्पणी पोस्ट करा