-->
पुन्हा एकदा बोफोर्सची आठवण

पुन्हा एकदा बोफोर्सची आठवण

संपादकीय पान शनिवार दि. ०७ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पुन्हा एकदा बोफोर्सची आठवण 
या देशाला पुन्हा एकदा बोफोर्सची आठवण यावी असे प्रकरण ऑगस्टा वेस्टलँडच्या रुपाने बाहेर आले आहे. व्ही.आय.पी. व व्ही.व्ही.आय.पी.साठी केल्या जाणार्‍या वाहतुकीसाठी खरेदी केलेल्या इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँडच्या हेलिकॉप्टर खरेदीत भ्रष्टाचार झाला तसेच लाच दिली गेली असा आरोप करण्यात आला आहे. हा व्यवहार एकूण ३,६०० कोटी रुपयांचा आहे. विशेष म्हणजे यासंबंधीची चौकशी ही मागच्याच सरकारच्या काळात करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता मोदी सरकारने दोन वर्षानंतर हे भूत उकरुन काढले आहे. हे सर्व प्रकरण पाहता यामागे संशयाचे भूत आहे व त्यामागे लाच ही सोनिया व राहूल गांधींनी लाच खाल्ली अशी आवई उठविण्यात आली आहे. बोफोर्सचे नेमके असेच झाले होते. गेले तीन दशकाहून जास्त काळ या प्रकरणाची चर्चा होते आहे. यात जी लाच खाल्ली गेली असेल त्यापेक्षा जास्त रक्कम चौकशीवर खर्च झाले आहेत. परंतु ठोस आरोपी कधीच सापडला नाही. वाजपेयी सरकार व आत्ताचे मोदी सरकार यांनी यासंबंधी कधीच सबळ पुरावे दिले नाहीत. केवळ आरोपाच्या फैरीच झाडत बसले. आता ऑगस्टाचेही असेच चालले आहे. या प्रकरणातही माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांच्या संपत्तीचा छडा लावण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यांच्या पुतण्यांच्या नावावर असलेल्या पाच आलिशान सदनिकांवर ऑक्टोबर २०१५ मध्ये टाच आणली गेली. सक्तवसुली संचालनालयाने संजीव, संदीप आणि राजीव या त्यागी बंधूंच्या मुसक्या आवळल्या. ऑगस्टा-वेस्टलँड या कंपनीला सदर कंत्राट मिळावे यासाठी एका मध्यस्थामार्फत त्यागी बंधूंना ७.६८ कोटी रुपयांची लाच देण्यात आली, असा आरोप संचालनालयाने केला आणि तो सिद्ध होण्याची शक्यता आहे. अशा व्यवहारात जी दलाली दिली जाते, ती देशाला लुटून दिल्लीत राजकीय लागेबांधे असलेल्या मोजक्या धनदांडग्यांचे खिसे भरणारी आहे. यात राजकीय व्यंक्तींपासून ते सनदी अधिकारी यांनाच दिली जाते हे एक अलिखीत सत्या आहे. अशा महत्त्वाच्या पदांवर बसणार्‍या व्यक्ती जर या पद्धतीने देशाला लुटत असतील तर जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा, असा प्रश्न पडतो. एक अधिकारी अशी लाचखोरी करतो तेव्हा त्याला राजकीय आशीर्वाद असतोच, असे मानले जाते. पण लाचखोरी करणार्‍यांना पाठीस घालण्याचा पायंडा पाडल्याने कॉंग्रेसला आपली बाजू ठामपणे मांडणे जड चालले आहे. कॉंग्रेसने केलेली पापे हे नव्या सरकारचे भांडवल होऊ शकत नाही, हे देखील तेवढेच खरेच आहे. कॉँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत त्यांच्या मानेवर सतत तलवार ठेवायची आणि दुसरीकडे जनतेच्या प्रश्‍नांना बगल देण्यासाठी असे प्रश्‍न सतत चर्चेत ठेवायचे हे मोदी सरकारचे धोरण दिसते. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील शह-काटशहाच्या या राजकारणात देशाचे आज मोठे नुकसान होते आहे, याचा विचार कोणीच करताना दिसत नाही.
-----------------------------------------------------

Related Posts

0 Response to "पुन्हा एकदा बोफोर्सची आठवण "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel