-->
राम नाईकांचा बिनवातीचा बॉम्ब

राम नाईकांचा बिनवातीचा बॉम्ब

रविवार दि. ०८ मे २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
राम नाईकांचा बिनवातीचा बॉम्ब
-------------------------------------------
एन्ट्रो- माजी केंद्रीय मंत्री व उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांचा पराभव करण्याचे एतिहासिक कार्य मात्र गोविंदाने केल्याबद्दल त्याची इतिहासात नोंद होणार आहे. अभिनेता गोविंदा हा मुळचा विरारचा रहिवासी असल्यामुळे त्याची भाई ठाकूर आणि कंपनीशी चांगले संबंध होते. परंतु दाऊदने व ठाकूर कंपनीने नाईकांचा पराभव करण्यासाठी गोविंदाला पैसे दिले असे म्हणणे म्हणजे जनतेचा कौल नाकारण्यासारखे आहे. आजवर कोणतीही निवडणूक निव्वळ पैशावर जिंकता येत नाही. कारण केवळ पैशावर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर कोणताच धनवान नेता पराभूत झाला नसता, तर अनेक उद्योगपती आपल्या पैशाच्या जोरावर लोकसभा व विधानसभेत दिसले असते. परंतु निव्वळ पैसा निवडणुकीचा निकाल लावत नाही, हे राम नाईक यांना ठाऊक नाही असे नाही. मात्र त्यांना आपला पराभव पचनी न पडल्याने त्यांनी असेे आरोप केले आहेत...
----------------------------------------
उत्तरप्रदेशचे राज्यपाल व माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी नुकत्याच प्रसिध्द केलेल्या आपल्या आत्मचरित्रात, २००४ साली आपला पराभव करण्यासाठी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम व भाई ठाकूर यांच्या मार्फत गोविंदाला पैसा पुरविण्यात आला होता असा गंभीर आरोप केला आहे. हे पुस्तक वाचण्याचा अजून आम्हाला काही योग आला नाही. परंतु यासंबंधी वृत्तपत्रातून ज्या बातम्या आल्या आहेत ते पाहता असा आरोप राम नाईक यांनी केला आहे व ते या आरोपाशी ठाम आहेत. हे पुस्तक आम्ही वाचलेले नसल्यामुळे फक्त या आरोपाविषयीच लिहणे योग्य ठरेल... राम नाईक यांनी यासंबंधी गेले तब्बल एक दशक तोंड उघडले नव्हते व आता अचानक त्यांनी आपल्या आत्मचरित्रात याचा उल्लेख केल्याने अनेकांना आश्‍चर्य वाटणे स्वाभाविक आहे. राम नाईक यांनी आपला लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव खुल्या दिलाने स्वीकारण्याऐवजी त्यांनी बिनवातीचा हा बॉम्ब फोडला आहे. अनेक राजकारणींनी पराभव आपल्या आयुष्यात चाखला आहे. राजकारणातील अशा प्रकारची जय-पराजयाची मालिका ही चालूच असते. परंतु रामभाऊ हे काही मानायला तयार नाहीत. राम नाईक हे पूर्वाश्रमीचे जनसंघाचे व भाजपाच्या स्थापनेपासून भाजपाचे नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत पराभव कधीच चाखला नाही. सुरुवातीला गोरेगावचे आमदार व त्यानंतर दक्षिण मुंबईचे खासदार म्हणून निवडणुका लढविल्या. यात ते नेहमीच विजयी झाले. फक्त याला अपवाद काय तो, २००४ सालच्या खासदारकीच्या निवडणुकीचा. या निवडणुकीत त्यांचा अभिनेता व नव्याने त्यावेळी राजकारणात पाऊल ठेवलेल्या गोविंदाने सणसणीत पराभव केला. आपला पराभव एका सिनेअभिनेत्याने व तो ही गोविंदासारख्याने करावा याची रुखरुख रामभाऊंना सतत लागून राहीली होती. खरे तर हा पराभव ते कधीच पचवूच शकले नव्हते, त्याची खंत त्यांनी या पुस्तकात व्यक्त केली आहे. राम नाईक यांचा पराभव झाला त्यामागची राजकीय, सामाजिक स्थिती आपण प्रथम पाहून घेऊ. २००४ साली निवडणुका लागल्या वेळी भाजपाच्या सरकारने आपला कालावधी पूर्ण केला होता. शायनिंग इंडियाचा नारा त्यावेळी जोरात होता. भाजपाच्या सर्व नेत्यांना विश्‍वास (किंवा अतिविश्‍वास) होता की, आपलेच सरकार पुन्हा सत्तेत येईल. राम नाईक हे मुंबईतून सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेले होते. त्या काळात ज्यावेळी वाजपेयींचे सरकार आले त्यात पेट्रोलियम मंत्री व रेल्वेमंत्री अशी दोन महत्वाची खाती सांभाळली. रेल्वेमंत्री असताना रामभाऊ मुंबईसाठी काही महत्वाच्या सुधारणा करतील अशी मुंबईकरांची अपेक्षा होती. परंतु त्या काळात त्यांनी मुंबईसाठी फारसे काहीच केले नाही. तसेच पेट्रोलियम मंत्री असताना पेड्रोल व डिझेलच्या किंमती वाढल्या होत्या. या किंमती जागतिक किंमतीनुसार बदलत असल्याने त्यात राम नाईक यांचा काही दोष नसला तरीही त्यांच्यावर जनता नाराज झाली होती. खरे तर त्यामुळे राम नाईक यांचा पराभव झाला होता. राम नाईक यांचा सलग तीन वेळा लोकसभेवर विजय झालेला असल्यामुळे त्यांच्या मागे जबरदस्त जनाधार आहे असे वातावरण माध्यमांनी त्यावेळी तयार केले होते. त्यामुळे कॉंग्रेसही त्यांच्या विरोधात कोणता उमेदवार द्यायचा या चिंतेत होती. राम नाईक यांच्याशी तुल्यबळ असा कॉँग्रेसकडे उमेदवारच नव्हताच. मात्र भाजपाच्या विरोधी असलेले वातावरण व राम नाईक यांच्याबद्दल निर्माण झालेली नाराजी याची शिडात हवा भरुन नेणारा योग्य नेता कॉँग्रेसकडे नसल्याने त्याने एकाद्या अभिनेत्याचा शोध घेण्याचे ठरविले. त्यातच गोविंदाचे चित्रपटसृष्टीतील करिअर जवळपास संपल्यात जमा होते. मात्र गोविंदाची लोकप्रियता व भाजपा-राम नाईक यांच्याबद्दलची नाराजी हे एकत्र आल्यास आपण राम नाईक यांचा पराभव करु शकतो याची खात्री कॉँग्रेसला आली होती. त्यातूनच त्यांनी गोविंदाचा पत्ता वापरण्याचे ठरविले. अर्थात हा पत्ता हुकमी ठरला आणि गोविंदाने राम नाईक यांना घरी बसवून लोकसभेत प्रवेश केला. पुढे गोविंदाने जनतेसाठी काहीच केले नाही हे देखील सत्य तेवढेच आहे. मात्र राम नाईक यांचा पराभव करण्याचे एतिहासिक कार्य मात्र गोविंदाने केल्याबद्दल त्याची इतिहासात नोंद होणार आहे. अभिनेता गोविंदा हा मुळचा विरारचा रहिवासी असल्यामुळे त्याची भाई ठाकूर आणि कंपनीशी चांगले संबंध होते. परंतु दाऊदने व ठाकूर कंपनीने नाईकांचा पराभव करण्यासाठी गोविंदाला पैसे दिले असे म्हणणे म्हणजे जनतेचा कौल नाकारणे असे म्हणता येईल. आजवर कोणतीही निवडणूक निव्वळ पैशावर जिंकता येत नाही. कारण केवळ पैशावर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर कोणताच धनवान नेता पराभूत झाला नसता, तर अनेक उद्योगपती आपल्या पैशाच्या जोरावर लोकसभा व विधानसभेत दिसले असते. परंतु निव्वळ पैसा निवडणुकीचा निकाल लावत नाही, हे राम नाईक यांना ठाऊक नाही असे नाही. मात्र त्यांना आपला पराभव पचनी न पडल्याने त्यांनी असेे आरोप केले आहेत.
---------------------------------------------------      

0 Response to "राम नाईकांचा बिनवातीचा बॉम्ब"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel