-->
बहुराष्ट्रीय कंपन्यांना दणका

बहुराष्ट्रीय कंपन्यांना दणका

संपादकीय पान शुक्रवार दि. ०६ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
बहुराष्ट्रीय कंपन्यांना दणका
भारतीय दैनंदिन ग्राहकोपयोगी वस्तू उद्योगात रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेदच्या विस्ताराचा अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी धसका घेतला आहे. आंतरराष्ट्रीय कंपनी कोलगेट पामोलिव्हने देशात या उद्योगातील स्पर्धा स्वीकारुन त्यात टिकून राहण्यासाठी नवी उत्पादने सादर करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने विशेषतः आयुर्वेदीक क्षेत्रात नवीन उत्पादने सादर करणार असल्याचे जाहीर आहे. काही दिवसांपुर्वी याच उद्योगातील डाबर इंडियानेदेखील आपल्या व्यवसायाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची घोषणा केली होती.  देशात कार्यरत असणार्‍या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी रामदेव बाबांच्या उत्पादनांचा त्यांना फटका बसला असल्याचे मान्य केले आहे. स्थानिक प्रतिस्पर्ध्यांमुळे कंपनीच्या व्यवसायावर तात्पुरता परिणाम झाल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात कोलगेटच्या उत्पादनांना मागणी घटल्याने गेल्यावर्षी २०१५ मध्ये विक्रीत केवळ ०.८ टक्के वाढ झाली आहे. गेल्या आठ वर्षात कोलगेटचा या उद्योगातील वाटा ४८ टक्क्यांवरुन ५४ टक्क्यांवर पोचला आहे. कंपनीची मुख्य प्रतिस्पर्धी हिंदुस्थान युनिलिव्हरचा बाजारपेठेतील वाटा २९ टक्क्यांवरुन २१ टक्क्यांवर घसरला आहे. पतंजली वर्षभरात कोलगेट पामोलिव्हला मागे टाकेल असा दावा रामदेव बाबांनी केला आहे. तसेच येत्या तीन वर्षात कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरलादेखील मागे टाकेल असेही त्यांनी नमूद केले होते. आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये पतंजलीच्या दंतकांती टूथपेस्टने ४५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. हा आकडा कोलगेटच्या वार्षिक उत्पन्नाच्या १२ टक्के आहे.
एकूणच या उद्योगात आता आयुर्वेदिक उत्पादनांना मागणी वाढत आहे. जरी कोलगेटची या विभागात लक्षणीय उपस्थिती नसली तरीही कंपनीच्या कोलगेट ऍक्टिव्ह नीम सॉल्ट या उत्पादनाने सादर झाल्यानंतर पाच महिन्यातच बाजारपेठेत १ टक्का वाटा मिळविला आहे. शिवाय, दातांच्या संवेदनांकरिता कोलगेट लवंगाचा अर्क असलेली टूथपेस्ट आणि दोन ते पाच वर्ष वयोगटातील मुलांसाठी फळांच्या फ्लेवरमधील टूथपेस्ट सादर करणार आहे. सध्या देशात पतंजलीच्या टूथपेस्ट उत्पादनांचा मोठा गाजावाजा होत आहे आणि कोलगेटने ही बाब गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळाने पतंजली आणि इतर कंपन्यांशी सामना करण्यासाठी तयार केलेल्या धोरणांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. एकूणच पाहता बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ताकदीपुढे त्यांच्याशी लढा देणे ही काही सोपी बाब नाही. एकेकाळी निरमाने हिंदुस्थान लिव्हरशी अशीच जोरदार स्पर्धा केली होती व त्यात ते यशस्वी झाले होते. आता पतंजलीने असाच दणका बहुराष्ट्रीय कंपन्यांना दिला आहे.
---------------------------------------------------------------

0 Response to "बहुराष्ट्रीय कंपन्यांना दणका"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel