-->
अखेर अणेंची माफी

अखेर अणेंची माफी

संपादकीय पान शुक्रवार दि. ०६ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अखेर अणेंची माफी
एक मे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी स्वतंत्र विदर्भाची मागणी करणार्‍या श्रीहरी अणे यांच्या जणू काही आंगातच आले होते. महाराष्ट्र राज्याचा नकाशा असलेला केक आपल्या वाढदिवशी कापून विदर्भ वेगळा केल्याबद्दल श्रीहरी अणे यांनी अखेर अखंड महाराष्ट्राची माफी मागितली आहे. एका वृत्तवाहिनेशी झालेल्या चर्चेच्या दरम्यान अणे यांची वैचारिक कोंडी करण्यात अखंड महाराष्ट्रवादी यशस्वी ठरले आणि अणे यांनी माफी मागितली. विदर्भवाद्यांनी जे कृत्य केले ते अयोग्यच होते, असे कबूल केले आणि जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागतो, असे त्यांना सांगितले. केंद्रात व राज्यात भाजपा सत्तेत आल्यावर स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीस वेग आला आहे. गेल्या महिन्यात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीवरून राजकारण तापले असताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी महाराष्ट्राचे चार तुकडे करा असे सुचवले होते. त्यावरुन मोठे वादळ उठले होते. तुकडे करायला महाराष्ट्र हा काय केक वाटला का? असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. १३ एप्रिल या आपल्या वाढदिवशी महाराष्ट्राची प्रतिकृती असलेला केक कापून अणे यांनी जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यांच्या अंगाशी आले. महाराष्ट्राच्या केकवरील विदर्भाचा नकाशा कापून अणे तो वेगळा करीत असल्याचा व्हीडियो व्हायरल झाला आणि राज्यात संतापाची एकच लाट उसळली. विदर्भातील अनेक लोकांना अणे यांचा हा बालिशपणा आवडला नाही. त्यांची लोकप्रियता एकदम कमी झाली. महाराष्ट्र दिनी त्यांनी नागपुरात विदर्भाचा झेंडा फडकवला त्या कार्यक्रमाला जेमतेम ४० जण होते.
राज्याचे माजी महाधिवक्ता असलेले ऍड. श्रीहरी अणे यांनी यासाठी आता निर्णायक लढा देण्याचा एल्गार केला असून, त्यानिमित्ताने संपूर्ण विदर्भ पिंजून काढला जात आह, असे चित्र निर्माण केले गेले. एक मे, या महाराष्ट्र दिनाच्या दिवशीही स्वतंत्र विदर्भवाद्यांनी एकत्र येऊन विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. नितिन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीने दिलेले वेगळ्या विदर्भाचे आश्वासन पाळले पाहिजे असे अणे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. तसेच, हिवाळी अधिवेशनापर्यंत भाजपाने आपला शब्द पाळला नाही तर १ जानेवारीपासून भाजपाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा अणेंनी दिला. स्वतंत्र विदर्भ ही संघाची व भाजपाची उघड भूमिका आहे. सध्या भाजपा सत्तेत असल्यामुळे याबाबदल डबल ढोलकी भूमिका घेत आहे. परंतु यापूर्वी अनेकदा भाजपाने स्वतंत्र विदर्भाची जाहीर भूमिका घेतली होती. आता आपण ही भूमिका घेऊ शकत नसल्याने त्यांनी श्रीहरी अणेंना पुढे करुन ही भूमिका पुढे रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा रितीने याबाबत सतत चर्चा सुरु ठेऊन लोकांना स्वतंत्र विदर्भ पाहिजे आहे असे ठासविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आता अणे आणि कंपनी विदर्भ स्वतंत्र झाल्याच्या आवेशातच वागत आहेत. मात्र त्यांना केक प्रकरण भोवले आहे.

Related Posts

0 Response to "अखेर अणेंची माफी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel