-->
जन की बात...

जन की बात...

27 एप्रिलच्या अंकासाठी अग्रलेख जन की बात... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रविवारी झालेल्या मन की बातमध्ये देशातील कोरोना स्थितीचे वर्णन करुन, देशाला भविष्यात कसे यापासून दूर न्यायचे आहे त्याविषयी काहीच चर्चा झाली नाही. त्यामुळे मोदींची ही मन की बात जन की बात नव्हती. पंतप्रधानांचे हे भाषण म्हणजे एक फ्लॉप शो होता आणि आजवर झालेल्या आपल्या धोरणात्मक चुकांवर पाघरुण घालण्याचा प्रकार होता. कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. गेल्या वेळच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून हीच परिस्थीती होती. परंतु पहिली लाट असल्याने व देशातीलच नव्हे तर जगातील परिस्थिती बिघडलेली असल्याने लोकांनी मोदींना त्यांनी केलेल्या यासंबंधीच्या चुकांबद्दल माफ केले. गेल्या लाटेत अमेरिका, युरोपात देखील रुग्णालये कमी पडली होती, परंतु यावेळी त्यांनी दुसरी लाट येणार हे लक्षात घेऊन सर्व तयारी केली होती. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा यशस्वी सामना युरोप, अमेरिकेत करण्यात आला व तेथील जनतेला दिलासा मिळाला. अर्थातच ते श्रीमंत देश आहेत, परंतु आपण महासत्ता बनण्याचे स्वप्न बघतो त्यामुळे निदान जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे होते. परंतु नियोजनाच्या अभावामुळे तसे घडले नाही. परिणामी जनतेचे सध्या प्रचंड हाल सुरु आहेत. ऑक्सीजनची पुरेशी व्यवस्था नसल्याने अनेकांचे प्राण गेले आहेत. हे सर्व राज्यांनी करावयाचे आहे हे मान्य परंतु त्यासाठी केंद्राकडून योग्य मार्गदर्शनही करणे अपेक्षीत होते. नाही तरी सध्या केंद्र सरकार केवळ उपदेश देण्याच्या पलिकडे राज्यांना फारसे काही करीत नाही. रुग्णसंख्या वाढल्यास ऑक्सीजन कमी पडणार व तसे झाल्यास ऑक्सीजनचा पुरवठा कसा वाढविला जाऊ शकतो, याचे नियोजन करण्यात आले नाही. संभाव्य दुसरी लाट येणार हे गृहीत धरुन त्याचे नियोजन करणे गरजेचे होते, त्याएवजी सरकार कुंभमेळा आयोजित करण्यात व पाच राज्यातील निवडणुका घेण्यात गुंग होते. लोकांच्या आरोग्यापेक्षाही भाजपाला व केंद्र सरकारला राजकारण महत्वाचे वाटणे हे दुर्देव आहे. पाच राज्यातील या निवडणुका एक वर्ष पुढे ढकलल्या असत्या तर फार काही आभाळ कोसळले नसते. त्यामुळे केंद्र सरकार पूर्ण क्षमतेने कोरोनाच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करु शकले असते. एका ऑस्ट्रेलियन कार्टुनिस्टने मोदींचे एक समर्पक कार्टुन काढले आहे. यात एक हत्ती मरणप्राय अवस्थेत खाली बसला आहे व त्यावर मोदी माहूताच्या भूमिकेत स्वार झाले आहेत. देशातील सध्य: स्थितीचे वर्णन आणखी कोणत्या नेमक्या भाषेत करावयाचे? सध्या देशात किती भयावह अवस्था आहे हे मोदींनी मन की बात मध्ये सांगण्याची गरज नाही. जनता ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. कारण सध्या जनता विदारक वास्तव अनुभवते आहे. त्यातून त्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी कोणते उपाय सरकार करीत आहे त्याची माहिती मोदींनी दिली असती तर फार बरे झाले असते. कॉँग्रेस सत्तेत असताना डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर मोदी फार कडवी टिका करीत, प्रामुख्याने सरकार निक्कमे झाल्याची त्यांची टिका होती. परंतु आज मोदी त्याहून वेगळे काही करीत नाहीत. त्यांचा निक्कमेपणा आज जग पाहते आहे. खरे तर हाच काळ होता की, यात मोदींच्या नेतृत्वाची कसोटी लागणर होती. त्यात जर त्यांनी योग्य नियोजन करुन दुसरी लाट थोपविली असती, राजकारण काही काळ गुंडाळून ठेवले असते तर त्यांची जगात वहावा झाली असती. परंतु आज जगात त्यांची छी थू होत आहे. जगातील सर्व प्रमुख दैनिकांनी मोदींच्या अकार्यक्षमतेचा पाढा वाचणारे अग्रलेख, लेख लिहले आहेत. त्याची भारतीयांना शरम वाटते. कारण अशा प्रकारे कोणत्याच भारतीय पंतप्रधानाची अवहेलना करणारे लिखाण आजवर प्रसिद्द झाले नव्हते. एखाद्या सरकारच्या भूमिकेवर टीका करणारे आजवर लेख जरुर प्रसिध्द झाले आहेत, परंतु त्यातून आकार्यक्षमता दाखविली जात नव्हती, तर ती धोरणात्मक टीका होती. कोरोनातून मोदी प्रशासनाचे खरे रुप उघडे पडले आहे, हे मात्र नक्की. आज जगातील अनेक देशांनी कोरोनाशी लढताना लसीकरणाची ढाल पुढे करुन यशस्वी मात केली आहे. ग्रेट ब्रिटन हे त्यातील उत्तम उदाहरण आहे. ब्रिटनचे पंतप्रधान उठसूठ देशातील जनतेशी संवादही साधत नाहीत. या देशाने कोणताही गाजावाजा न करता सर्वात जास्त वेगाने लसीकरण करुन आता लॉकडाऊन उठविण्यास सुरुवात केली आहे. आपल्याकडे लसीकरणाचा घोळ सुरु आहे. सुरुवातील केंद्राने लसीकरणाचे सर्व अधिकार आपल्याकडे घेऊन केंद्राच्या मार्फत राज्यांना लस पुरविण्याचे धोरण ठरविले होते. त्यानंतर हे धोरण आपल्या आंगलटी येणार असे दिसताच आता राज्यांना लस खरेदीचे अधिकार दिले गेले. मग हे अधिकार राज्यांना जानेवारीत किंवा त्याअगोदर दिले असते तर राज्यांनी आपापल्या कुवतीनुसार लस खरेदी करुन लसीकरण सुरु केले असते. त्यामुळे गेले तीन महिने फुकट गेले. गेल्या तीन महिन्यात याहून जास्त लसीकरण योग्य नियोजन केले असते तर करता आले असते. एकीकडे गर्दी करु नकात असे सांगियचे आणि दुसरीकडे लाखोंच्या सभा घ्यावयाच्या हे पंतप्रधानांनी करणे पूर्णपणे चुकीचेच आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी आपल्या झालेल्या चुकांबद्दल जनतेची माफी मागून पुढील काळात अशा चुका न करता कोरोनाशी झुंज देण्याचा निर्धार व्यक्त केला असता तर ती जन की बात झाली असती. परंतु मोदी जन की नव्हे तर आपल्या मनातील बाब सर्वांवर थोपायला बघत आहेत.

Related Posts

0 Response to "जन की बात..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel