
13 मार्चसाठी अग्रलेख
सरकारचे हसे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्याची सरकारने घोषणा केली आणि लगेचच विद्यार्थांचा त्याविरोधात उद्रेक झाला. त्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करीत पुढील आठ दिवसात परीक्षा घेण्याची घोषणा केली. या घोषणेचे स्वागत आहे, परंतु हा सर्व जो प्रकार घडला त्यात सरकारने आपले हसे करुन घेतले आहे. एम.पी.एस.सी.च्या परीक्षा तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यापूर्वी कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने सरकारने परीक्षा घेतल्या नव्हत्या त्यामुळे त्यावेळी परीक्षा पुढे ढकलण्यामागे सरकारकडे सबळ असे कारण होते. परिणामी विद्यार्थ्यांनीही समजुतीने घेतले. आता मात्र सगळीकडे सर्व काही सुरु आहे, अगदी कोरोना पुन्हा वाढत असतानाही सर्व व्यवहार सुरुळीत सुरु आहेत. लग्न समारंभ असोत किंवा कोणत्याही राजकीय पक्षांचे मेळावे असोत, सध्या कोणतेही निर्बंध पाळले जात नाहीत. लोक आता आपले सर्व जीवन सुरळीत होण्यासाठी धडपडत आहेत. कोरोना असला तरी त्याची पर्वा करीत नाहीत. मग सरकार परीक्षाच का टाळली जात आहे, असा सवाल विद्यार्थांमध्ये उपस्थित होणे स्वाभाविक आहे. खरे तर सर्व खबरदारी घेत या मुलांच्या परीक्षा घेतल्या गेल्याच पाहिजेत. या परीक्षा देणारी मुले काही लहान नाहीत. त्यांचे किमान वय हे २५ च्या पुढे आहे. या वयोगटातील विद्यार्त्यांच्या परीक्षा पुढे ढकलणे हे चुकीचेच होते. एम.पी.स.सी.च्या परीक्षा देताना या मुलांना मोठा संघर्ष करावा लागतो. बरे त्यात यशाची फारशी खात्री नसते आणि त्यासाठी मुले दोन-तीन वर्षे खर्ची घालतात. यासाठी ठरावीक वयाची मर्यादा ओलांडली व त्यात त्यांना यश मिळाले नाही तर त्यांना मध्येच करिअरचा दुसरा मार्ग शोधावा लागतो. त्यामुळे या मुलांची ही अभ्यासाची वर्षे फार महत्वाची ठरतात. अशा स्थितीत सर्व व्यवहार सुरळीत सुरु असताना फक्त परीक्षाच न घेतली गेल्याने या मुलांना आपल्या करिअरची महत्वाचे वर्षे फुकट जाणार याची मोठी चिंता लागणे स्वाभाविक आहे. परिणामी अनेक शहरात विद्यार्थांचा उद्रेक झाला. एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी अनेक लहान व मध्यम आकारातील शहरातील तसेच ग्रामीण भागातील मुले मोठ्या संख्येने इच्छुक असतात. त्यांच्याकडे मुंबई, पुण्यातील मुलांकडे असतात तसे करिअरचे अनेक पर्याय व रोजगाराच्या संधी उपलब्ध नसतात. त्यामुळे त्यांना या सरकारी नोकरीचाच एक महत्वाचा पर्याय खुला असतो. यासाठी ही मुले जीवाची बाजी लावतात. अनेकदा शहरात येऊन राहातात व तेथे क्लास लावतात आणि आपल्याला यात शंभर टक्के यश कसे मिळेल हे पाहतात. हे सर्व कष्टप्रय आव्हान स्वीकारत असताना कोरोनामुळे त्यांच्यापुढे अनेक नवीन आव्हाने उभी राहिली. त्यात सरकारने परीक्षाच गरज नसताना पुढे ढकलल्याने त्यांचा संताप व्यक्त होणे स्वाभाविक होते. अर्थात त्याचा फायदा विरोधकांनी घेतलाच. त्यातच सत्ताधारी आघाडीतल्या बहुतांश जणांनी या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केल्याने या विद्यार्थ्यांच्या उद्रेकाला पाठबळ लाभले. त्यामुळए यापुढे कोरोना वाढत असला तरीही सरकारने कोणताही निर्णय घेताना पूर्ण विचारांअंतीच निर्णय घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्याचा झालेला उद्रेक पाहून वेळीच हस्तक्षेप केला व परीक्षा लगेचच आठवड्यात घेण्याची घोषणा केल्याने मुलांना हायसे वाटले. त्याचबरोबर या मुलांचे वयामुळे नुकसान होणार नाही याचीही खात्री दिली हे विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहे. लहान मुलांच्या शाळा वगळता आता बहुतांशी महाविद्यालये व उच्च शिक्षणाची महाविद्यालये आता सरकारने सुरु केली पाहिजेत. त्यासाठी सरकारने या महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थांचे व शिक्षक, प्राध्यापक तसेच तेथील कर्मचाऱ्यांचे अगोदर लसीकरण करावे. एकदा का या सर्वांचे लसीकरण झाले तर सर्व खबरदारी घेत ही महाविद्यालये सुरु करता येतील. कोरोनाची ही साथ आता काही लवकर आटोपण्याची चिन्हे दिसत नाहीत. कदाचित यात अशीच दोन वर्षे गेल्यास पुढील दोन वर्षे महाविद्यालये बंद ठेवणार का? असा सवाल आहे. आता कोरोना आपल्याकडे अजून काही काळ राहाणार हे लक्षात ठेऊनच वावरावे लागणार आहे. जेवढ्या आवश्यक बाबी आहेत ते सुरु करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी लसीकरणाची ढाल आता आपल्या हातात आहे, तिचा योग्य वापर करण्याची गरज आहे. ज्या अनावश्यक बाबी म्हणजे लग्न समारंभ, विविध कार्यक्रम सुरु आहेत, त्यावर जरुर निर्बंध घालावेत. पंरतु आता परीक्षा घेण्याचे थांबवू नये. कोरोनाच्या काळात जवळपास वर्षभर मुलांनी सुट्टी उपभोगल्याने अनेकांचा अभ्याचा व लिहण्याचा सरावही गेला आहे. त्यातून अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. विद्यार्थ्यांची ही रुळावरुन घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची हीच योग्य वेळ आहे. दहावी, बारावीची परीक्षा घेणार असल्याचे सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे, परंतु अजूनही त्याविषयी तळ्यात मळ्यात सुरु आहे. सरकारने या प्रकरणापासून बोध घेऊन परीक्षा घेण्याचा ठाम निर्णय घेऊन त्यासाठी आत्तापासूनच तयारी करावी.
0 Response to "सरकारचे हसे"
टिप्पणी पोस्ट करा