
05 मार्चसाठी अग्रलेख
राजकीय उखाळ्यापाखाळ्या
एकेकाळी एकत्र सत्ता उपभोगलेले तसेच तीन दशकांची मैत्री असलेले शिवसेना व भाजपा सध्या एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. शिवसेनेची फसवणूक भाजपाने केली, केंद्रात सत्ता आहे या मस्तीत शिवसेनला दिलेले आश्वासन पाळले नाही. शेवटी कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्रीपद पाहिजेच हा हट्ट शिवसेनेने आपले नवीन राजकीय साथीदार शोधून पूर्ण केला. यातून त्यांनी चांगलाच धडा भाजपाला शिकविला. राज्यातील भाजपाची सध्या तर सत्ता गेली व जुना साथीदारही गेला असे म्हणत हात चोळीत बसली आहे. परंतु गिरा तो भी टांग उपर, या म्हणींप्रमाणे फडणवीस आणि त्यांची भाजपा आपण त्या गावचेच नाही, असे भासवित सध्याच्या राज्य सरकारला केंद्राच्या व राजभवनातील त्यांच्या प्रतिनिधींच्या मदतीने खिळखिळे कसे करता येईल ते पहात असते. गेल्या तेरा महिन्यात ते महाविकास आघाडीच्या सरकारचे काही तेरावे घालू शकलेले नाहीत. गेल्या तेरा महिन्यात सरकार पाडण्याच्या अनेक तारखा झाल्या, परंतु त्यात ते काही यशस्वी होत नाहीत. विधानसभेत बुधवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याच जी जुगलबंदी झाली ती पाहता सत्ता गेल्याचे दु:ख भाजपाला झालेच आहे, परंतु ते त्यांना दाखवायचेही नाही. शिवसेनेचा जन्म हा स्वातंत्र्योत्तर काळातला आहे, हे वास्तव राज्याला ठाऊक आहे, परंतु फडणवीसांना उत्तर देताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना काही खडे बोल सुनवावे लागले. मात्र हे सुनावताना भाजपाची पितृसंघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्यलढ्यात कुठे होता, असाही जळजळीत सवाल त्यांनी केला. संघाबाबत काही बोलले की भाजपावाल्यांना खूप वेदना होतात. त्याबाबतीत जरी एखादे वास्तव असले तरी ते स्वीकारावयास तयार नसतात. स्वातंत्र्यलढ्यात संघ नव्हता याचे अनेकांनी पुरावे दिले आहेत. जर नव्हताच तर ओढून ताणून संघाला या लढ्यात ओढण्याचे कारणही नाही. परंतु वास्तव मान्य न करता संघाचा स्वातंत्र्य लढ्यात कसा सहभाग होता हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. शहिद भगतसिंग हे खरे डावे क्रांतिकारी नेते आहेत, परंतु त्यांना आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच सरदार वल्लभभाई पटेल हे कट्टर स्वातंत्र्यसेनानी तसेच नेहरुप्रेमी होते. त्यांनीच संघावर गृहमंत्री असताना बंदी घातली होती. असे असले तरी सरदार पटेल हे कसे संघाचे मित्र होते हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. आता राम मंदिराच्या प्रश्नावर पुन्हा राजकारण केले जात आहे. आता राम मंदिर उभारण्यासाठी ठिकठिकाणी लोकांकडून पैसा उकळला जात आहे, त्याला शिनसेनेच्या नेत्यांनी काही ठिकाणी आक्षेप घेतले. लोकांकडून पैसे घेऊन त्यांच्या घरावर स्टिकर चिकटवून समाजात दुफळी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अर्थत हे काही कॉँग्रेसचे नेते मांडत नाहीत तर शिवसेना मांडत आहे. याच शिवसेनेने, होय आम्ही मशिद पाडली असे ठामपणे तीन दशकांपूर्वी सर्वांसमोर सांगितले होते. मात्र संघाशी संलग्न अनेक संघटनांनी पळकुटेपणा केला होता. हे सर्व वास्तव आहे. अनेकांच्या डोळ्यासमोर घडलेला हा इतिहास आहे. खरे तर संघाशी संलग्न या संघटनांना बाबरी मशिद पाडल्यावर होय आम्ही पळकुटेपणा केला, हे मान्य करावयास काही हरकत नाही. परंतु हे वास्तव स्वीकारल्यास याच भाजपाला राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे विविध प्रश्नावर शिवसेनेशी उकाळ्यापाखाळ्या काढल्या जात आहेत. शेवटी उध्दव ठाकरे यांनी सभागृहात भाजपाला तडाखेबाज उत्तर देत काही वास्तव गोष्टी सांगितल्या. अर्थात हे जळजळीत वास्तव भाजपाला पटणारे नाही. राजकारण करताना एखादी गोष्ट चुकली तर सत्ताधाऱ्यांनी माफी मागण्यात काहीच गैर नाही, उलट तो त्यांचा मोठेपणा समजला पाहिजे. परंतु भाजपाला अशी माफी मागणेही चुकीचे वाटते किंवा आपण सत्ताधारी चूक करणारच कशी, आम्ही जे करु ते चुकीचे असूच शकत नाही, अशी त्यांची ठाम समजूत आहे. कॉँग्रेसचे नेते राहूल गांधींनी आणीबाणी देशावर लादण्यात कॉँग्रेसची चूक होती, असे म्हटले आहे. तसे विधान इंदिरा गांधी यांनी जिवंत असतानाही केले होते. आपल्या हातून झालेली चूक मान्य करण्याचा मोठेपणा इंदिरा गांधींनी दाखविला होता. मात्र याच इंदिरा गांधींना तत्कालीन विरोधी पक्षाचे नेते हुकूमशहा म्हणत असत. राहूल गांधीनी आणीबाणी संदर्भात बोलनाता सध्या आणीबाणीहून वाईट परिस्थिती असल्याचे म्हटल्याने भाजपाच्या शेपटीवर पाय पडला. कॉँग्रेसने आपल्या झालेल्या चुकांबद्दल माफी मागितल्याचा मोठेपणा दाखविला आहे. दिल्लीतील शिखांच्या दगंलीबाबतही कॉँग्रेस पक्षाने माफी मागितली होती. मात्र सर्व शीख समुदायाने कॉँग्रेसला अद्याप माफ केलेले नाही, असे असले तरी पंजाबमध्ये मात्र कॉँग्रेसची सत्ता आहे. सर्वाधिक काळ सत्तेत राहून कॉंग्रेसने आपल्या चुकांची माफी मागणे ही बाब सकारात्मक म्हटली पाहिजे. परंतु गुजरात दंगलीबाबत भाजपाला अजूनही पश्चाताप होत नाही. निदान त्यावेळी झालेल्या हिंसाचाराचे तरी समर्थन केले जाऊ शकत नाही. त्याबाबतीत भाजपा कधी माफी मागणार असा राष्ट्रवादीने केलेला सवाल योग्यच आहे. अशा प्रकारे राजकीय उखाळ्यापाख्याळ्या काढण्याचा आता हंगाम सुरु आहे.
0 Response to "राजकीय उखाळ्यापाखाळ्या"
टिप्पणी पोस्ट करा