-->
संपादकीय पान बुधवार दि. २१ जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
------------------------------------------
केजरी विरुध्द किरण
पाचच दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेल्या माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांना पक्षाने दिल्लीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित केले आहे. यापूर्वी महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणुका लढवल्या. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एखाद्या राज्यात भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बेदींच्या नावाची घोषणा केली. दिल्लीत भाजपकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नव्हता. नेमका हाच मुद्दा हेरून केजरीवाल व त्यांचा पक्ष प्रचार करत होते. यामुळे त्यांच्या तोडीचा उमेदवार म्हणून भाजपने किरण बेदींना निवडले.त्या पक्षाच्या परंपरागत कृष्णानगर मतदारसंघातून निवडणूक लढवतील. यासोबतच पक्षाने दिल्लीतील सर्व ७० पैकी ६२ जागांचे उमेदवार घोषित केले. भाजपने अरविंद केजरीवाल यांच्या विरूद्ध नवी दिल्लीतून नुपूर शर्मा यांना मैदानात उतरवले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर किरण बेदी यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे आधीच संकेत मिळाले होते. किरण बेदी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थित बेदी यांनी पक्षप्रवेश केला.
प्रवेश केल्यानंतर दुसर्‍या दिवशी किरण बेदी यांचे भाजप कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आले. दिल्लीत भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नव्हता. भाजपने २०१३ मध्ये हर्षवर्धन यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले होते. मात्र, त्यांची जादू चालली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपला एका नव्या आणि विश्वासू  चेहर्‍याची गरज होती. केजरीवाल यांच्या एवढाच जनतेच्या जवळचा असावा, म्हणून केजरीवालांच्या तोडीचा उमेदवार म्हणून भाजपने किरण बेदींना निवडले. किरण बेदींची झालेली ही निवड दिल्ली भाजपातील अनेकांना पटलेली नाही. त्यातून भाजपात मोठ्या प्रमणावर असंतोष व्यक्त झाला आहे. मात्र या असंतोषाचा स्फोट काही झालेला नाही. तसा होण्याची शक्यता नाही. कारण सध्या नरेंद्र मोदी यांचे वलय अद्याप कमी झालेले नाही. अशा स्थितीत कुणी भाजपामध्ये बंडखोरी करण्याचे धाडस करणार नाही. केजरिवाल व बेदी यांच्यात अनेक बाबतीत साध्यर्म्य आहे. यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या दोघांचाही भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात सहभाग मोठ्या प्रमाणात होता. आणि याच आंदोलनातून त्या दोघांचे नेतृत्व पुढे आले आहे.
इंडिया अगेंस्ट करप्शनमध्ये हे दोघेही सोबत होते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेसोबत त्यांनी एकत्र काम केले. अण्णांबरोबरच्या उपोेषणात त्यांचा सहभाग होता. मात्र अण्णांबरोबर त्या दोघांचे एकत्रच फिसकटले. अण्णांना राजकारणात सहभाग नको होता. तर किरण व केजरीवाल या दोघांच्या राजकीय महत्वाकांक्षा एवढ्या जबरदस्त होत्या की त्याला ते आवर घालू शकणार नव्हते. त्यातून पहिल्या टप्प्यात केजरीवाल यांनी उघडपणे भाजपाविरोधी भूमिका घेऊन आम आदमी हा पक्ष काढला. केजरीवाल यांचे भाजपाबरोबरचे मतभेद हे केवळ नरेंद्र मोदी विरोधापुरते मर्यादित आहेत. कारण मोदींप्रमाणे केजरीवाल हे देखील तेवढेच आत्मकेंद्री व राजकीय इच्छा बाळगून होते. आपले मोदींबरोबर काही जमणार नाही, आपण मोदींच्या तालावर काही नाचू शकत नाही हे केजरिवाल यांनी बरोबर ओळखले आणि आपला जन्माला घातले. या दोन्ही नेत्यातील एक समान दुवा म्हणजे दोघांची स्वच्छ प्रतिमा आहे व त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र दिल्ली राहिले आहे. मध्यम आण उच्च- मध्यम वर्गात भाजपच्या उमेदवार किरण बेदी या प्रचलित आहेत. दिल्लीत त्यांच्या चाहत्यांची वोटबँक आहे. मात्र, अवघ्या ४९ दिवसांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन सरकार सोडणारे अरविंद केजरीवाल यांचा ग्राफ खाली झुकला आहे की त्यांची लोकप्रियता कायम आहे हे निकालानंतर ठरेल. दिल्लीत भाजपकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नव्हता व नेमका हाच मुद्दा केजरीवाल यांनी भाजपचा अपप्रचार सुरु केला होता.
जगदीश मुखी सारख्या नेत्यांच्या तुलनेत केजरीवाल यांची प्रतिमा स्वच्छ आहे. निवडणूकपूर्व पहाणीमध्ये केजरीवाल यांचा बोलबाला आहे. त्यामुळे भाजपचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात नवी दिल्लीतून भाजपने नूपुर शर्मा यांना रिंगणात उतरवले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम पाहिल्यानंतर नूपुर दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष आहेत. भाजप विनोद कुमार बिन्नी यांना पटपडगंज मतदार संघात आपचे मनीष सिसोदिया टक्कर देणार आहेत. जंगपुरामधून एम.एस. धीर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. किरण बेदी यांना राजकारणात पदार्पण करून अवघे पाच दिवस झाले आहेत. भाजपने किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले आहे. यावर आपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने किरण बेदी यांना बळीचा बकरा केल्याचे आप नेते आणि दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी म्हटले आहे. भाजपला पराभवाची माळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात न टाकता किरण बेदींच्या गळ्यात टाकायची असल्याचे भारती यांचे मत आहे. सध्या तरी केजरीवाल यांचे पारडे जड होते आता मात्र बेदींची एन्ट्री झाल्याने दिल्लीतील निवडणूक अधिक चुरशीची होणार हे नक्की.
------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel