-->
औद्योगिक असुरक्षितता चव्हाट्यावर

औद्योगिक असुरक्षितता चव्हाट्यावर

संपादकीय पान शनिवार दि. २८ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
औद्योगिक असुरक्षितता चव्हाट्यावर
आपल्याकडे कोणताही अपघात झाल्यावर त्यासंबंधीच्या असुरक्षीतता कशी होती हे सर्व चित्र चव्हाट्यावर येते. परंतु कोणताही अपघात होऊ नये यासाठी आपल्याकडेच सुरक्षितता बाळगताना दिसत नाहीत. गुरुवारी डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला व यामध्ये पाच कर्मचारी ठार तर १०० हून अधिक जखमी झाले आहेत. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अभिनव शाळेसमोरील आचार्य केमिकल कंपनीतील बॉयलरमध्ये हा  स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की स्फोटाच्या आवाजाने दोन ते तीन किमी परिसर दणाणून गेला तर अनेक इमारती तसेच गाड्यांच्या काचा फुटल्या. काही क्षण या परिसरातील लोकांना नेमके काय झाले ते समजेना. कुठेतरी बॉम्बस्फोट झाला की काय अशी शंका व्यक्त केली गेली. मात्र यात काही तथ्य नव्हते. या स्फोटात पाच कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. तर कंपनीतील तसेच त्या परिसरातील रस्त्यावरच्या नागरिकांसह एकूण १०० जण जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झालेल्या स्फोटामुळे आचार्य कंपनी पुर्णपणे उद्धवस्त झाली आहे. स्फोट झालेल्या कंपनी शेजारी असलेल्या हार्बर ब्राऊन ट्रामा कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. या कंपनीत ५० कर्मचारी काम करत असून त्यापैकी काहीजण जखमी झाले आहेत. तर कंपनीचे संचालक आनंद आचार्य आणि श्रीकांत आचार्यही जखमी झाले आहेत. घटनास्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली व अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हा स्फोट नेमका कशामुळे झाला ते अद्याप समजू शकलेले नाही. परंतु एक बाब लक्षात घेतली पाहिजे रासायनिक कारखाने हे नागरीकांच्या वस्तीपासून दूर अंतरावरच असले पाहिजे, असा आपल्याकडे नियम आहे. मात्र हे नियम केवळ कागदावरच राहिले आहेत. डोंबिवलीच काय अनेक भागातील रासायनिक कारखाने व लोकांची वस्ती यातील अंतर कमी आहे व दिवसेंदिवस ते अंतर कमी होत चालले आहे. आपल्याकडे हरित पट्टा ही बाबच अस्तित्वात राहिलेली नाही. डोंबिवलीसारख्या भागात तर बांधकामाचे सर्वच नियम धाब्यावर बसविले जातात. अगदी अनधिकृत इमारती सर्रास उभारल्या जातात. तर हरीत पट्टा ठेवून कारखाने व वस्ती यातील ठराविक अंतर ठेवण्याची कोणालाच गरज वाटत नाही. आपल्याकडे नागरी भागात अनेक नियमांची पायमल्ली केली जाते. जर डोंबिवलीतील हा कारखाना व लोकवस्ती यातील अंतर ठेवले गेले असते तर या स्फोटात जे जखमी झाले आहेत त्यांची संख्या अल्प असती. त्याचबरोबर आपल्याकडे अनेक भागात रासायनिक कारखान्यांचे विभाग करण्यात आले आहेत. हे विभाग वगळता अन्य भागात अशा प्रकारचे धोकादायक कारखाने उभारण्यास परवानगी देता कामा नये. त्याचबरोबर येथे बॉयलरचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आपल्याकडे बॉयलरची योग्य निगा व त्यासंबंधीची खबरदारी कधीच घेतली जात नाही. बॉयलरच्या सुरक्षिततेविषयी आपल्याकडे गांभीर्य नाही. त्यामुळे बॉयलरचे स्फोट होतात. स्फोट झाल्यावर नंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघातच होऊ नयेत यासाठीच खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. सरकार व डोंबिवलीची महानगरपालिका यापासून बोध घेईल का हाच सवाल आहे.

0 Response to "औद्योगिक असुरक्षितता चव्हाट्यावर"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel