-->
मॅगी पाठोपाठ आता ब्रेड

मॅगी पाठोपाठ आता ब्रेड

संपादकीय पान शुक्रवार दि. २७ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
मॅगी पाठोपाठ आता ब्रेड
सहा महिन्यांपूर्वी मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण जास्त असल्याचा कुणा एका संस्थेचा अहवाल सादर करण्यात आला आणि देशात एकच मोहोळ उठले. मात्र नंतर काही काळाने हे वादळ शांत झाले. मात्र याच दरम्यान रामदेव बाबांनी भारतीय बनावटीची गव्हाची मॅगी भारतात आणली. त्याचबरोबर कोर्टानेही मॅगीवरील बंदी उठविली. मॅगीमध्ये कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह व खाण्यास अयोग्य पदार्थ आढळले नव्हते. मग काही काळाकरीता ही बंदी कशासाठी आली होती ? आता याच प्रकरणाची आठवण यावी असे ब्रेडच्या बाबतीत झाले आहे. देशातील नामवंत कंपन्यांच्या ब्रेडमध्ये कर्करोग होण्याचा धोका असलेले रासायनिक द्रव्य पोटॅशियम ब्रोमेट असल्यामुळे लवकरच बंदी येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. सेंटर फॉर सायन्स अँड इनॉव्हमेंट (सीएसई) या संस्थेला ३८ पाव व बन्समध्ये ८४ टक्के पोटॅशियम ब्रोमेट व पोटॅशियम आयोडाईट आढळले. सार्वजनिक आरोग्याला धोकादायक म्हणून जगातील अनेक देशांमध्ये या रसायनांवर बंदी आहे. मात्र, भारतात त्यावर बंदी नाही, असे संस्थेने सांगितले. नड्डा यांच्या सांगण्यानुसार, अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरण संस्थेला हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आदेश दिले आहेत. या संस्थेच्या अहवालानंतर आवश्यक ती कडक कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. अन्न व्यवसायात ११ हजार पुरक पदार्थ वापरले जातात. त्यात पोटॅशियम ब्रोमेटचा समावेश आहे. आता काळजीपूर्वक चाचणीनंतर अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरण संस्थेने पोटॅशियम ब्रोमेटचा समावेश रद्द केला आहे. केंद्रीय आरोग्य खात्याला यासंबंधीची शिफारस पाठविण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना काढण्यास आणखी काही कालावधी लागेल. सरकारने पोटॅशियम ब्रोमेटला पुरक पदार्थाच्या यादीतून काढल्यास ते वापरण्यास बंदी येईल. तसेच पोटॅशियम आयोडाईटच्या पुराव्यांची तपासणी सुरू असून त्याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार आहे. मात्र तोपर्यंत सरकारने यासंबंधी स्पष्टपणे जनतेला निवेदन करण्याची गरज आहे. ब्रेड हा देशातील करोडो लोकांचे रोजचे खाद्य आहे. अशा या ब्रेडबाबत जर काही आक्षेपार्ह वाटत असेल तर सरकारने त्यासंबंधी स्पष्टीकरण करुन नेमके धोरण जाहीर करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा लोकांमध्ये दिशाभूल होण्याचा धोका असतो. अन्यथा मॅगी पाठोपाठ आता ब्रेडची पाळी असे लोकांना वाटण्याची शक्यता आहे.
------------------------------------------------------

0 Response to "मॅगी पाठोपाठ आता ब्रेड"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel