-->
पुन्हा मुलीच जोरात!

पुन्हा मुलीच जोरात!

संपादकीय पान शुक्रवार दि. २७ मे २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पुन्हा मुलीच जोरात! 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून राज्याचा एकूण निकाल ८६.६० टक्के लागला आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी परीक्षेत बाजी मारली असून एकूण ९०.५० टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ८३.४६ टक्के विद्यार्थ्यांना यश मिळाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९३.२९ टक्के तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी ८३. ९९ टक्के लागला.
राज्यातून १३ लाख १९ हजार ७५४ विद्यार्थ्यांपैकी ११ लाख ४२ हजार ८८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात उत्तीर्ण झालेल्या मुलींची संख्या ५ लाख ३२ हजार ४८२ असून मुलांची संख्या ६ लाख १० हजार ४०० एवढी आहे. आता अनुर्तीर्ण झालेल्या मुलांची जुलै महिन्यात फेरपरीक्षा घेण्यात येईल. त्यातून काही मुले पास झाल्यास त्यांचे वर्ष वाचणार आहे. विज्ञान विभागाचा निकाल ९३.१६ टक्के, वाणिज्य विभागाचा निकाल ८९.१० टक्के तर कला विभागाचा निकाल ७८.११ टक्के इतका लागला. एकूण १६२ विषयांची परीक्षा घेण्यात आली त्यामधे १० विषयांचा निकाल १०० टक्के लागला. कोकणाने सर्वाधिक विद्यार्थी पास होण्याचा आपला विक्रम यंदाही कायम राखला आहे. रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्याचा निकाल सर्वात जास्त ८९.६७ टक्के लागला असून सर्वात कमी खालापुर तालुक्याचा ६२.८९ टक्के निकाल लागला आहे. तसेच रोहा ७८.७३ टक्के, माणगांव ८५.१९ टक्के, तळा ८२.९५ टक्के,  श्रीवर्धन ७६.२५ टक्के,  महाड ८५.४१ टक्के,  पेण ८३.५२ टक्के,  सुधागड ७४.५० टक्के,  कर्जत ८५.८८ टक्के,  उरण ८४.२१ टक्के,  व पनवेल ८८.५५ टक्के निकाल लागला. जिल्ह्यातील एकूण ३० हजार ८८ विद्यार्थी बारावीच्या परिक्षेस बसले होते. त्यापैकी २५ हजार ३३० विद्यार्थी पास झाले. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागमधून ३ हजार ४७ नियमित विद्यार्थी तर १७१ रिपीटर विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. यामध्ये २ हजार ६३९ नियमित विद्यार्थी तर ४२ परत बसलेले विद्यार्थी पास झाले. मुलांच्या करिअरचा विचार करता बारावीचा निकाल हा अत्यंत महत्वाचा असतो. सायन्सची मुले डॉक्टर, इंजिनिअरिंग तसेच अन्य शाखांकडे जाण्यासाठी आता प्रयत्न करतात. तर कला व वाणिज्य शाखेतील मुलांच्या करिअरची नेमकी दिशा याच काळात ठरते. त्यामुळे मुलांच्या दृष्टीने बारावीच्या निकालाला विशेष महत्व असते. गेल्या काही वर्षात गुणांची स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यात अर्थातच मुली बाजी मारताना दिसतात. हे चित्र केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातीलही आहे. आपल्याकडे अनेक विद्यार्थ्यांना बारावीनंतर आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. यामागे अर्थातच कारण हे आर्थिक असते. बारावी नंतर खरे तर मुलांचे उच्च शिक्षण सुरु होते व त्याच काळात आपल्याकडे सुमारे ३० टक्क्याहून जास्त मुलांना शिक्षणावर पाणी सोडावे लागते. हे चित्र आता बदलण्याची वेळ आली आहे. सर्वांना किमान पदवीपर्यंतचे शिक्षण मिळण्याची आवश्यकता आहे.

0 Response to "पुन्हा मुलीच जोरात! "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel