-->
इंग्लंडमधील स्वयंपूर्ण खेडी

इंग्लंडमधील स्वयंपूर्ण खेडी

रविवार दि. २९ मे २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
इंग्लंडमधील स्वयंपूर्ण खेडी
------------------------------------------
एन्ट्रो- ब्रिटनमधील खेडे हे शहरासारखेच असते. एक नियोजनबध्द शहरच त्याला म्हटले पाहिजे. तेथे लोक शहरात राहाण्यापेक्षा शहराच्या जवळ म्हणजे १०० कि.मी. दूर अंतरावर असलेल्या एखाद्या खेड्यात राहाणे पसंत करतात. यामागचे एक कारण म्हणजे, शहरातील घरे छोटी असतात व महागही पडतात. त्यापेक्षा ग्रामीण भागात घरे स्वस्त पडतात व एैसपैस जागा मिळते. ब्रिटीश नागरिकांना आपल्या घराभोवती बाग करण्याची तसेच कुत्रा पाळण्याची फार हौस असते. तेथील ग्रामीण भागातील घरे ही एका साच्यातली असतात. परंतु देखणी असतात. एखादी एतिहासिक वास्तू वाटावी असे त्याचे स्वरुप असते. गावची पंचायत म्हणजे तिकडे त्याला कौन्सिल म्हणतात, ती कौन्सिल घरे कुठे बांधायची त्याची आखणी करते. गावाचे नियोजन करताना सर्वात प्रथम रस्ता आखला जातो. प्रत्येक घराला लाईट, पाणी, इंटरनेट या किमान गरजांची सोय झाल्यावरच घरांची परवानगी दिली जाते...
--------------------------------------------
महात्मा गांधींनी आपल्याला स्वातंत्र्यानंतर खेड्याकडे चला असा संदेश दिला होता. देशातील प्रत्येक खेडं हे स्वयंपूर्ण असले पाहिजे. स्वंयपूर्ण खेड असल्यास आपल्याला शहराकडे धाव घेण्याची कधीच गरज भासणार नाही, असे त्यावेळी गांधींजी म्हणत. गांधींजींचा हा संदेश आपण काही एैकला नाही, मात्र ब्रिटीशांनी जरुर एैकला, असे म्हणावे लागेल. यावेळी इंग्लंडच्या भेटीत तेथील खेडी पाहाण्याचा योग आला आणि गांधींजींच्या या संदेशाची आठवण झाली. आपल्याकडची खेडी म्हटली म्हणजे सर्वच गैरसोयींचे माहेरघर. परंतु ब्रिटनमधील खेडे हे शहरासारखेच असते. एक नियोजनबध्द शहरच त्याला म्हटले पाहिजे. तेथे लोक शहरात राहाण्यापेक्षा शहराच्या जवळ म्हणजे १०० कि.मी. दूर अंतरावर असलेल्या एखाद्या खेड्यात राहाणे पसंत करतात. यामागचे एक कारण म्हणजे, शहरातील घरे छोटी असतात व महागही पडतात. त्यापेक्षा ग्रामीण भागात घरे स्वस्त पडतात व एैसपैस जागा मिळते. ब्रिटीश नागरिकांना आपल्या घराभोवती बाग करण्याची तसेच कुत्रा पाळण्याची फार हौस असते. तेथील ग्रामीण भागातील घरे ही एका साच्यातली असतात. परंतु देखणी असतात. एखादी एतिहासिक वास्तू वाटावी असे त्याचे स्वरुप असते. गावची पंचायत म्हणजे तिकडे त्याला कौन्सिल म्हणतात, ती कौन्सिल घरे कुठे बांधायची त्याची आखणी करते. गावाचे नियोजन करताना सर्वात प्रथम रस्ता आखला जातो. प्रत्येक घराला लाईट, पाणी, इंटरनेट या किमान गरजांची सोय झाल्यावरच घरांची परवानगी दिली जाते. अर्थातच परवानगी ही ऑनलाईन मिळू शकते. त्यासाठी कौन्सिलमध्ये खेटे मारणे किंवा त्याच्या मंजुरीसाठी लाच देणे हा प्रकार नाही. प्रत्येक गावात एक सुसज्ज शाळा, रुग्णालय हे असतेच. संपूर्ण ब्रिटनमध्ये शिक्षण व आरोग्य या सेवा पूर्णपणे मोफत आहेत. गावापासून शहरात जाण्यासाठी दुहेरी चार मार्गांचा रस्ता म्हणजे आपल्या मुंबई-पुण्याच्या एक्स्प्रेस महामार्गासारखा असतो. गरज भासल्यास एखादा माणूूूस अर्ध्या तासाच्या आत शहरात पोहोचू शकतो. येथील लोक देखील ग्रामीण भागात राहून शहरात नोकरीला जाणे पसंत करतात. जवळजवळ प्रत्येकाकडे मोटार असल्यामुळे मोटारीने अर्ध्या-एका तासात शहरात नोकरीला पोहोचतात. प्रत्येकाचा शिक्षण व आरोग्याचा खर्च हा सरकार करते. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण हे पूर्णपणे मोफत असते. मात्र उच्च शिक्षण घेण्यासाठी सरकार दीर्घकालीन कर्ज देते. नोकरीला लागल्यावर ते पुढील पंचवीस वर्षात फेडायचे असते. एवढ्या दीर्घकालीन हे कर्ज असल्यामुळे कर्जाचा हाप्ता हा नगण्यच असतो. आरोग्य सेवा देखील पूर्णपणे मोफत आहे. घरी असताना तुम्हाला काही त्रास झाल्यास तुम्ही फक्त आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी फोन करायचा. दहा मिनिटांच्या आत तुमच्या दारासमोर ऍम्बुलन्स उभी राहाते व तुम्हाला रुग्णालयात घेऊन जाते. अगदी ग्रामीण रुग्णालयही सुसज्ज असते. आवश्यकता भासल्यासच रुग्णाला शहरातील मोठ्या रुग्णालयात पाठविले जाते. सरकार प्रत्येकाच्या पगारातून पंचवीस टक्के पैसे कापते. यातून या सर्व सोयी उपलब्ध करुन दिल्या जातात. त्याचबरोबर ६५ वर्षे वय झाल्यावर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक म्हणून सरकारकडून दरमहा ८०० पौंड म्हणजे आपल्याकडील ८० हजार रुपये पेन्शन मरेपर्यंत दिली जाते. जर तुम्ही वयापरत्वे परावलंबी झालात तर तुमच्या सेवेसाठी नर्स दिली जाते. अशा प्रकारच्या सुविधा या लोकसंख्या कमी असल्यामुळे दिल्या जातात, हे आपण एकवेळ मान्य केले तरी तेथील सरकारने आपल्या जनतेला सामाजिक सुरक्षा देण्याचे जे व्रत घेतले आहे त्याची पूर्तता केली जाते. त्याचबरोबर प्रत्येग गावात लहान-मोठे उद्योग थाटलेले आहेत. अर्थात हे उद्योग पर्यावरणाचे नियम पाळतात. अशा प्रकारचे नियम भंग करणे म्हणजे आपणच आपल्या जीवाशी खेळतो त्यामुळे आपल्या सुरक्षिततेसाठी हे नियम जनताच पाळते. विविध प्रकारचे उद्योग हे गावात असल्यामुळे तेथील लोकांना रोजगारासाठी बाहेर जावे लागत नाही. टाटा स्टीलचा (पूर्वीची कोरस ही कंपनी) अवाढव्य प्रकल्प आम्हाला तेथे दिसला. अशा प्रकारे गावाच्या जवळपास उद्योगधंदे असल्यामुळे रोजगाराच्या संधीही जवळच उपलब्ध होतात. कामगारांना तेथे दर तासाच्या हिशेबाने पगार दिला जातो. अकुशल कामगाराला दर ताशी सात पौंड असा दर आहे. आठवड्यातून त्याने चाळीस तास काम करण्याची सक्ती आहे. शनिवार-रविवार हे दोन दिवस सर्व व्यवहार बंद असतात. बंद म्हणजे पूर्णच बंद. या सुट्टीच्या दिवशी तुम्ही कितीही करोडचा व्यवहार करायची तयारी दाखवा कुणीही पुढे येणार नाही. खरे तर शनिवारी सुट्टी असली तरीही शुक्रवार दुपारपासूनच सुट्टीचे वेध लागतात व कंपन्या बंद होतात. रविवारी संध्याकाळी तर अनेक भागातले मॉलही बंद असतात. ब्रिटनचे नागरिक असलेले मालक व कामगार हे सुट्यांच्या बाबतीत अत्यंत काटेकोर असतात. त्याउलट आशियातून आलेले काही कामगार आपले उत्पन्न वाढविण्यासाठी कधीतरी शनिवारी देखील काम करतात. त्यांचे मालक जर बिगर ब्रिटीश असले तर ते एखाद शनिवारी आपली कंपनी काही वेळ सुरुही ठेवतात. मात्र तेथे गोरा कामगार कामाला येत नाही. इंग्लंडमधील गावांचा केलेला विकास हा आपल्यासाठी एक मोठा धडा आहे. यातून आपण खूप काही शिकू शकतो.
-------------------------------------------------------  

0 Response to "इंग्लंडमधील स्वयंपूर्ण खेडी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel