-->
मोठी भारतीय ग्राहकपेठ

मोठी भारतीय ग्राहकपेठ

सोमवार दि. 13 ऑगस्ट 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
मोठी भारतीय ग्राहकपेठ
आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटींच्या वर गेली असताना त्यातील चांगली क्रयशक्ती असणार्‍या ग्राहकांची संख्या सध्या 35 कोटी एवढी आहे व ती संख्या सातत्याने वाढत चालली आहे. आपल्याकडील वाढता मध्यमवर्ग ही आपली जगातील पत वाढविणारी एक महत्वाची बाब ठरली आहे. कारण सध्याचे 35 कोटी ग्राहक हे अमेरिकेतील क्रयशक्ती चांगली असलेल्या लोकसंख्याएवढे आहेत. म्हणजे आपल्याकडील मध्यमवर्ग हा अमेरिकेप्रमाणे खर्च करणार ठरला आहे. चीनने किती मोठ्या गप्पा केल्या तरी त्यांच्याकडेही एवढ्या मोठ्या संख्येने क्रयशक्ती असलेला मद्यमवर्ग नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपम आपल्या मोठ्या लोकसंख्येकडे नेहमीच नाके मुरडत असतो, परंतु ही आपली एक मोठी जमेची बाजू ठरली आहे व भविष्यातही ही बाजारपेठ वाढत जाईल तसे आपले पाऊल उन्नतीच्या दिशेने जाईल. विकसित जगाच्या तुलनेत भारतीय ग्राहकांची क्रयशक्ती तुलनेने कमीच आहे, पण जी आहे तीत सातत्याने वाढ होते आहे हे महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसात आपल्या अर्थव्यवस्थेच लक्षणीय सुधारणा झाल्याचे संकेत मिळत आहेत. भारताच्या जीडीपीमध्ये 80 टक्के वाटा ज्यांचा आहे ते उत्पादन आणि सेवा क्षेत्राची वाढ जूनमध्ये चांगली झाली आहे. बँकेचे कर्ज घेणारे वाढत चालले आहेत. दुचाकी आणि मोटारींच्या खपात तर 10 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली आहे. या वर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांत गेल्या वर्षीच्या याच तीन महिन्यांपेक्षा 17 टक्के वाहनांचे अधिक उत्पादन झाले आहे. प्रवासी गाड्यांची विक्री या काळात 20 टक्के वाढली आहे. व्यावसायिक वाहने तर 50 टक्के आणि दुचाकींची विक्री 15 टक्क्यांनी वाढली आहे. शेतीसह बँकेचे कर्ज घेण्याचे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत 12.3 टक्क्यांनी वाढले आहे. कोळसा उत्पादन 10 टक्क्यांनी, तर विजेचे उत्पादन 3.5 टक्क्यांनी वाढले आहे. नोटाबंदीनंतर तसेच त्यानंतर लागोलग आलेल्या जी.एस.टी.मुळे व्यापारी, उद्योजकांचे कंबरडे पूर्णपणे मोडले होते. आता मात्र यात सुधारमा होत असल्याचे दिसत आहे. निदान मोठे उद्योग तरी यातून सावरत आहेत, असे दिसते. भारतात ग्राहक वाढत आहेत याचा सर्वाधिक फायदा विदेशी गुंतवणूकदार घेतात. मार्चमध्ये विदेशी गुंतवणूक कमी झाली होती, पण ही वाढ पाहताच एप्रिल आणि मेमध्ये त्यातही चांगली वाढ झाली आहे. भारतातील ग्राहक वाढतो आहे याचा आणखी एक पॅरॅमिटर म्हणजे परदेशी कंपन्यांची भारतात वाढत चाललेली गुंतवणूक. या वर्षी अशी गुंतवणूक आता 98 अब्ज डॉलर (सुमारे सहा लाख कोटी रुपये) झाली आहे. वॉलमार्ट आणि फ्लिफकार्टमध्ये झालेल्या 16 अब्ज डॉलर व्यवहाराचा यात समावेश आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाने सर्व जग भयभीत झाले असले तरी असे काही झालेच तर भारतासारख्या देशाला त्याचा फायदाच होईल, असे मानले जाते आहे. त्यामुळेच चीनसह इतर शेअर बाजार घसरत असताना भारतीय शेअर बाजार नवे उच्चांक प्रस्थापित करतो आहे. जी.एस.टी.चे फायदे आता एक वर्षानंतर दिसू लागले आहेत. दरमहा सुमारे एक लाख कोटी रुपये या कराव्दारे सरकारी तिजोरीत जमा होऊ लागल्याने सरकारला एक चांगले उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. मात्र यातही अजून वाढ होण्यासाठी सरकारने यात सुलभता आणण्याची आवश्यकता आहे. तसे झाल्यास जी.एस.टी.चे फायदे अजून पहावयास मिळतील. अजूनही आपली अर्थव्यवस्था झपाट्याने विस्तार पावली पाहिजे. अजूनही अनेक वस्तूंची बाजारपेठ विस्तारल्यास त्याचे सकारात्मक परिणाम देशात दिसतील, यात काही शंका नाही. चीन आणि अमेरिकेशी बाजारपेठेशी तुलना करता, आपण त्यात बरेच मागे आहोत. उदा. अमेरिकेत विजेचा वापर 46 हजार 370 केजी डब्ल्यूएच आहे, जो भारतात फक्त एक हजार 90 आहे. अमेरिकेत स्मार्ट फोनधारक लाखात 329 आहेत, तर भारतात 234 आहेत. अमेरिकेत घरगुती एअर कंडिशन 88 टक्के आहे, तर भारतात ते फक्त 13 टक्के आहे. घरगुती ब्रॉडबँड कनेक्शनचा विचार करता अमेरिकेत लाखात 100, तर भारतात तेच प्रमाण 16 इतकेच आहे. रोज लागणार्‍या वस्तूंवरील प्रतिमाणशी खर्च (अमेरिकी डॉलरमध्ये) अमेरिकेत 1694, तर भारतात फक्त 42 इतका आहे. अमेरिकेत अनेक गोष्टींचा वापर भारताच्या तुलनेत खूप आहे. त्यामुळे ते करतात तसाच खर्च आपण केला पाहिजे असे नव्हे. पण भौतिक संपन्नता वाढली की हा खर्च आपोआप वाढतो, असा जगाचा अनुभव आहे. त्यामुळे भारतात शहरीकरण वाढत जाणार, नागरिकांची क्रयशक्ती वाढणार आणि ग्राहक होण्याची ही प्रक्रिया आणखी वेगवान होणार आहे. देशात 65 टक्क्यांपेक्षा जास्त तरुण आहेत आणि त्यांचा मोठ्या प्रमाणात विविध गरजांवर पैसा खर्च होताना दिसतो आहे. आतापर्यंत क्रयशक्तीत ग्रामीण भागातील 68 टक्के नागरिक मागे होते, पण मान्सूनचा दिलासा आणि सरकारचा विविध योजनांवर वाढलेला खर्च यामुळे तेथेही क्रयशक्ती वाढली आहे. आपल्याकडील मोठी बाजारपेठ ही जगातील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना सातत्याने खुणवत असते. त्यामुळे चीनच्या विरोधात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्ब बोलत असले तरी ते भारताला फारसे दुखावत नाहीत. याचे महत्वाचे कारण म्हणजे आपली मोठी बाजारपेठ व त्यात वाढत असलेली लोकांची क्रयशक्ती. जी.एस.टी.मुळे अनेक देशांना भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्‍वास वाढला आहे. कारण ही जगाने स्वीकारलेली करपद्दती आहे.
-----------------------------------------------------------------

0 Response to "मोठी भारतीय ग्राहकपेठ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel