-->
सच्चा कॉम्रेड

सच्चा कॉम्रेड

मंगळवार दि. 14 ऑगस्ट 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
सच्चा कॉम्रेड
लोकसभेचे माजी अध्यक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते, महान संसदपटू सोमनाथ चटर्जी यांचे निधन झाल्याने देशाने एक सच्चा कॉम्रेड गमावला आहे. साधी रहाणी व सर्वसामान्यातील त्यांचा वावर यामुळे ते नेहमीच सर्वांना आपलेसे वाटले. दहा वेळा खासदारकी व एकदा लोकसभेचे अध्यक्षपद उपभोगून सुध्दा त्यांना कधी अहंकार शिवला नाही. त्यादृष्टीने पाहता ते खर्‍या अर्थाने सर्वांचे, तळागाळातील जनतेचे मित्र होते. त्यांनी सातत्याने शोषितांच्या बाजूने संसदेत आवाज उठविला. त्यामुळेच कामगार, कर्मचारी, तळागाळातील जनतेचे प्रतिनिधी नेहमी भेटत व आपली गार्‍हाणी त्यांच्यापुढे ामंडीत. त्यावर अभ्यासकरुन सोमनाथदादा त्यांचे प्रश्‍न संसदेत मांडीत. त्यांचे संसदेतील भाषणे हे नेहमीच अभ्यासपूर्ण राहिले होते, त्यामुळे त्यांची संसदपटू म्हणून एक वेगळी ओळख होती. यासाठी त्यांना संसदेचा उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या घरात काही कम्युनिझमचे वातावरण नव्हते. सोमनाथदांचा जन्म हा आसाम मधील तेझपूर येथील. नंतर हे कुटुंब कोलकात्यात येऊन स्थायिक झाले. त्यांचे वडिल निर्मलचंद्र चटर्जी हे एक नामवंत वकिल व कट्टर हिंदुत्ववादी होते. अखिल भारतीय हिंदू महासभेच्या संस्थापकांपैकी एक होते व काही काळ ते हिंदू महासभेचे अध्यक्ष होते. अशा या कट्टर हिंदुत्ववादी घराण्यात सोमनाथ चटर्जी हे कम्युनिस्ट होणे हे काहीसे आश्‍चर्यकारक वाटते. परंतु तरुणपणातच सोमनाथदादा तत्कालीन कम्युनिस्ट नेते ज्योति बसू यांच्या संपर्कात आले व ते काळाच्या ओघात कम्युनिस्ट विचाराकडे ओढले गेले. 1968 साली ते माकपचे प्रथम सदस्य झाले. त्यांना पक्षातून 2008 साली काढून टाकण्यात आले, तोपर्यंत ते पक्षाचे सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत होते. पक्षाने जरी त्यांना काढून टाकले असले तरीही त्यांनी स्वीकारलेला डावा विचार काही सोडला नाही. पक्षाने काढून टाकल्यावर त्यांची प्रतिक्रिया ही, माझ्या आयुष्यातील सर्वात दुर्दैवी घटना अशीच होती. आसाममध्ये त्यांचा जन्म झाला असला तरीही त्यांचे शिक्षण कोलकात्यात कोलकाता विद्यापीठात झाले. तेथून पदवी संपादन केल्यावर कायद्यातील शिक्षणासाठी ते क्रेंब्रिजला गेले. त्यांना लंडनच्या बार कौन्सिलने वकिली करण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र त्यांनी लंडनला रामराम केला व भारतात सक्रिय राजकारण करण्याचा निर्णय घेतला. 1971 साली ते सर्वात प्रथम खासदार झाले. त्यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली व त्यांना माकपने पाठिंबा दिला होता. येथून ते सलग नऊवेळा माकपच्या तिकिटावर विजयी ठरले. 1984 साली त्यांचा तृणमूल कॉग्रेसने याच मतदारसंघातून पराभव केला. 2004 साली ते पुन्हा लोसकभा जिंकले, त्यांची ही दहावी वेळ होती. जून 2004 साली त्यांची एकमताने निवड लोकसभा अध्यक्षपदी झाली. त्यावेळी कॉग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला माकपाने बाहेरुन पाठिंबा दिला होता. चटर्जींसारखा संयमी, निपक्ष नेता अध्यक्षांच्या खुर्चीत बसल्याने त्यावेळी अनेकांनी समाधान व्यक्त केले होते. त्यांच्या राजकीय विरोधकांनीही त्यांच्या निवडीला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता. याचे कारण म्हणजे, दहा वेळा निवडून आलेल्या या नेत्याने आपली संसदीय कारकिर्द गाजविली होती व त्यांच्यासारखा निष्कलंक नेता या पदावर बसल्याचा अनेकांना विशेष आनंद झाला होता. मात्र 2008 साली माकपने अणू उर्जेच्या प्रश्‍नावर या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. मात्र कॉग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार काही कोसळले नाही. त्यावेळी समाजवादी पक्षाने पाठिंबा देऊन कॉग्रेसचे हे सरकार तरले. त्यावेळी माकपने चटर्जींना राजीनामा देऊन सरकारच्या विरोधात मतदान करण्यास बजावले. परंतु असे करणे म्हणजे भाजपासारख्या जातियवादी पक्षाला यातून बळ मिळेल असे सांगत त्यांनी पक्षाचा आदेश झुगारला. चटर्जी सभापतीपदी राहिले मात्र पक्षाने त्यांनी हकालपट्टी केली ती शेवटपर्यंत. त्यानंतर त्यांना कधीच पक्षाचे दरवाजेे खुले झाले नाहीत. माकपने त्यावेळी त्यांची हकालपट्टी करताना म्हटले होते की, घटनेतील तरतुदींचा चटर्जींनी सन्मान केला असेलही, मात्र पक्षाची घटना ही त्याहून मोठी आहे व त्याचा तुम्ही अवमान केल्याने पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. परंतु चटर्जींचे म्हणणे आज सत्य होत आहे. कम्युनिस्टांनी केलेल्या अनेक चुकातून जातियवादी शक्तींना बळ मिळाले आहे. या शक्तींना रोखण्यासाठी सर्व निधर्मी शक्तींनी एकत्र येण्याची गरज त्यांनी त्यावेळी प्रतिपादन केली होती. आज त्यांचेच शब्द खरे ठरत आहेत. आज जातियवादी शक्तींनी जो धुमाकूळ चालविला आहे, त्याला अटकाव करण्यासाठी माकपसहीत विविध सेक्युलर पक्ष एकत्र येत आहेत. सोमनाथदांचे राजकारण किती दूरदृष्टीचे होते हे यावरुन आपल्याला दिसते. राजकारणी कसा असवा हे पहायचे जाल्यास त्यांच्याकडे पाहवे, असे त्यांचे वर्तन होते. लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांचे कुटुंबिय जर विदेश दौर्‍यावर गेले तर त्यांनी त्याचे पैसे सरकारी तिजोरीत भरणे पसंत केले आहे. साधी रहाणी, उच्च विचारसारणी हे त्यांनी आपल्या आचरणात आणले. मोठ्या घरातून येऊनसुध्दा ते पक्षाच्या आदेशानुसार, कम्युनसारखे जीवन जगले. असा सच्चा, राजकारणी होणे नाही. कॉम्रेड चटर्जींना अखेरचा लाल सलाम.
---------------------------------------------------------   

0 Response to "सच्चा कॉम्रेड"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel