-->
संपादकीय पान मंगळवार दि. ३१ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी चिंतन --
--------------------------------
बावाजींच्या घरात आता सुधारणेचे वारे!
-------------------------------
बावाजी म्हणून प्रेमाने ओळखल्या गेलेल्या पारशी समाजावर उशीरा का होईना सुधारणेचे वारे सुरु झाले आहेत ही स्वागतार्ह बाब म्हटली पाहिजे. नुकत्याच मुंबईत झालेल्या जागतिक पारशी कॉँग्रेसमध्ये या सुधारणांचे पडसाद उमटले. जगातील सर्वात कमी संख्येने छोटा असलेला तसेच अतिशय श्रीमंत अशी ओळख असलेला हा पारशी समाज प्रामुख्याने इराणमधून भारतात आला. उद्योजकता हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. आर्थिकदृष्ट्या सबळ असूनही धर्मातील सुधारणांमध्ये हा समाज तसा मागास राहिला. पारशी समाजातच लग्न करणे व जो लग्न करणार नाही त्याला धर्मातून बाहेर टाकणे या पुर्वीपासून चालत आलेल्या अटी आजही हा समाज पाळीत असल्याने दिवसेंदिवस परशांची संख्या कमी होत गेली. त्यामुळे आता जगात जेमतेम एक लाख चाळीस हजार पारशी जगभरात शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे ही घटती लोकसंख्या या समाजासाठी मोठी चिंतेची बाब आहे. पारशी समाजाची ही घटती लोकसंख्या रोखायची असेल तर जुने विचार टाकून दिले पाहिजेत. त्यासाठी पारशी समाजातील कोणत्याही मुलाने वा मुलीने धर्माबाहेर लग्न केल्यास त्यांना धर्मबहिष्कृत करण्याचे धोरण थांबविले पाहिजे, असा विचार आता पारशी समाजातील तरुणांमध्ये रुजू लागला आहे. त्याचबरोबर अंत्यसंस्कार पारंपारिक पध्दतीने न करता ते कोणत्या पध्दतीने करावेत याचे स्वातंत्र्य वैयक्तीक पारशी समाजातील व्यक्तीला असले पाहिजेत असा विचार आता या समाजातील तरुणांना पटू लागला आहे. नुकत्याच झालेल्या या कॉँग्रेससाठी अध्यक्ष म्हणून आलेल्या राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी देखील पारशी समाजाच्या घटत्या लोकसंख्येवर उपाय योजण्याचे आवाहन केले हे योग्यच होते. कॅनडातील पारशी समाज हा सर्वात सुधारलेला समजला जातो आणि तेथूनच सुधारणेचे वारे वाहू लागणार आहेत. येथील पारशी समाजाच्या अध्यक्षाने या पारशी कॉँग्रेसला जमलेल्या १२०० जणांच्या समूहाला सांगितले की, आम्ही पारशी समाजातील मुलीने अथवा मुलाने अन्य धर्मातील कुणाशी लग्न केल्यास आम्ही त्याला धर्मातून बाहेर टाकीत नाही. त्यामुळे कोणत्याही पारशी समाजातील मुलाला किंवा मुलीला जर बाहेरच्या धक्मातील कुणाशी लग्न करावयाचे असल्यास तुम्ही बिनधास्त कॅनडात या व इकडे येऊन लग्न करा व स्थायिक व्हा असे आवाहन त्यांनी केले. पारशी समाज आज आर्थिकदृष्टा सबळ आहे परंतु तो जुन्या प्रथा टाकून द्यायला तयार होत नाही ही खेदाची बाब आहे. कालानुरुप प्रत्येक धर्मात सुधारणा या होत गेल्या. त्याची आवश्यकता असतेच. हिंदु धर्मातही गेल्या दशकात केशवपन, सती, बालविवाह या समाजाला अंधकारात टाकणार्‍या व स्त्रीयांना कमी लेखणार्‍या प्रथा होत्या. त्याविरोधात आपल्याकडे मोठी बंड झाली. अनेक सुधारकांनी त्यासाठी लढे दिले. त्यातूनच पुढे समाजात सुधारणा झाली. धर्मात ज्या कालबाह्य गोष्टी असतात त्याचा आपण कालानुरुप बदल करण्याची आवश्यकता असते. त्यातूनच समाज पुढे जातो, मोठा होतो. पारशी समाजात आज हे सांगणारा एखादा सुधारक जन्माला येण्याची गरज आहे. आपल्याकडे ज्याप्रमाणे फुले, रानडे, आगरकर, शाहू महाराज डॉ. आंबेडकर झाले आणि त्यांनी समाजात सुधारणा करुन एक नवी दिशा दिली आणि समाजसुधारणा केली तसे पारशी समाजात सुधारणचे नेतृत्व तयार व्हावे. यातून पारशी समाज अधिक प्रगल्भ होण्यास मदत होईल. यातूनच त्यांच्या घटत्या लोकसंख्येवर मार्ग निघू शकतो.
--------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel