-->
संपादकीय पान मंगळवार दि. ३१ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
दील है छोटासा, छोटीसी आशा... 
----------------------
आज संध्याकाळी सूर्य मावळेल त्यावेळी २०१३ सालातला तो शेवटचा सूर्यास्त असेल. अर्थात सुर्याला याची तसुभर कल्पनाही नसेल. कारण त्याला रोज उगवायचे आहे आणि अस्तालाही जायचे आहे. सूर्याच्या दृष्टीने हे नियमीत असल्याने त्याला याचे काही महत्व नाही. मनुष्याने तास, दिवस, महिना, वर्ष हे कालगणणेसाठी तयार केले. आजचे सूर्याचे मावळणे हे आपल्यासाठी एक वर्ष संपल्याचे प्रतिक ठरते आणि उद्या होणारा सुर्योदय हा नवीन आशा, नव्या उमेदी घेऊन येणार असतो. आज आपण सरत्या वर्षाकडे एक नजर टाकून वळून पाहिले असता गेल्या वर्षअखेरीस दिल्लीतील बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला. यातून शेवटी सरकारला बलात्काराच्या कायद्यात बदल करणे भाग पडले. मात्र कायद्यात बदल होऊनही महिलांच्या अत्याचाराच्या घटना काही कमी झालेल्या नाहीत, हे दुदैवी म्हटले पाहिजे. त्यामुळे महिलांच्या अत्याचार करणार्‍यांना लवकरात लवकर न्यायाच्या दरबारात उभे करुन त्यांना कडक शासन करणे हे सरकराचे कर्त्यव्य आहे. कारण त्यामुळे महिलांवरील अत्याचार कमी होण्यात मदत होईल हे नक्की. परंतु बलात्काराच्या या नवीन कायद्याच्या संरक्षणामुळे अनेक निर्भया आता स्व:ताहून पुढे येत आहेत असे आढळेले आहेत. त्यातूनच तरुण तेजपाल, आसारामबापू व नारायणसाई हे आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहू शकले. महिलांवरील अत्याचारात कपात होण्याची प्रक्रिया ही झपाट्याने होणारी नाही तर त्यासाठी प्रदीर्घ काळ जावा लागणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. आता वर्ष संपत असताना दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दिक्षित यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. एका वर्षात मिळालेला हा एक अजब न्याय म्हटला पाहिजे. आता सरत्या वर्षात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल विराजमान झाले आहेत. ही केवळ या वर्षातील नव्हे तर या दशकातील एक महत्वाची घटना ठरावी. अण्णा हजारेंच्या आंदोलनातून बाहेर पडून स्थापन केलेल्या व पारंपारिक पक्षांच्या विरोधात उभे राहाणार्‍या आम आदमी पक्षाने केवळ एका वर्षातच सत्ता काबीज केली. आता केजरीवाल यांच्यापुढे दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्याचे आव्हान उभे ठाकणार आहे. कारण त्यांनी दिलेली आश्‍वासने हे लोकांना आकर्षित करणारी असली तरीही त्यामुळे दिल्लीच्या तिजोरीवर वाढीव बोजा पडणार आहे. मात्र यातून सुवर्णमध्य काढण्यात केजरीवाल यांची कसोटी लागणार आहे. केजरीवाल यांच्या यशातून भविष्याची राजकीय बदलांंचे वारे वाहू लागेल. राजकीय घडामोडींचा अशा प्रकारे गेल्या वर्षीचा आढावा घेत असताना कॉँग्रेसने अलीकडेच चार राज्यातल्या निवडणुका हरल्यामुळे राहूल गांधी यांच्याकडे पंतप्रधानपद काही सहजरित्या चालत येणार नाही उलट कॉँग्रेसला सत्ता टिकविता येणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातची निवडणूक जिंकल्यावर त्यांचा वारु बेफाटपणे देशभर दौडू लागला. मात्र केजरीवाल यांच्या दिल्लीतील विजयानंतर मोदींच्या या वारुला खीळ बसली आहे. आगामी वर्षात पहिल्या चार महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्याकडे सर्वांचे लक्ष लागेल. गेल्या वर्षात विविध खेळांचा विचार करता क्रिकेट व बुध्दीबळात आपल्याला हादरा देणार्‍या घटना घडल्या. त्या म्हणजे क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडुलकरची निवृत्ती आणि बुध्दीबळाचा जागतिक चॅम्पीयन विश्‍वनाथन आनंद याची झालेली हार. या दोन्ही घटना आपल्याला चटका लावणार्‍या ठरल्या. पुढील वर्षात आपल्याला सचिनची बॅटिंग क्रिकेटच्या मैदानावर नव्हे तर राजकारणाच्या आखाड्यात म्हणजे राज्यसभेत पहावयास मिळेल. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रात मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सींग हे गेल्या वर्षापासून यंदाही सुरुच होते. यात अनेक मोहरे अडकत चालले आहेत. क्रिकेटच्या आय.पी.एल.च्या धर्तीवर इंडियन बॅडमिंटन लिगची झालेली सुरुवात ही एक स्वागतार्ह पाऊल ठरावे. यातून आपल्याकडे बॅटमिंटन खेळाविषयी तरुणांना गोडी लागेल व या खेळाकडे भविष्यात जास्तीत जास्त लोक आकर्षित होतील अशी अपेक्षा करावयास हरकत नाही. देशाच्या अर्थचक्राला गेल्या वर्षातही म्हणावी इतकी काही जोरदार गती मिळालेली नाही. आपली अर्थव्यवस्था जी एकेकाळी सात टक्क्यांनी धावत होती ती आता पाच टक्क्यांवर येऊन थांबली आहे. तिला गती मिळण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असल्या तरीही त्याला पूर्णपणे काही यश मिळालेले नाही. जागतिक पातळीवर आता मंदीचे वातावरण आता ढिले पडू लागल्याचे चित्र आहे. परंतु आपल्या अर्थव्यवस्थेला प्रत्यक्ष गती येण्यासाठी अजून एक किंवा दोन वर्षे जावी लागतील. शेअर बाजारात सेन्सेक्सने यंदा सर्वोच्च शिखर गाठले असले तरीही बाजाराची एकूण कामगिरी निराशाजनकच होती. त्यामुळे गुंतवणूकदार यंदा निराश असला तरी जागतिक पातळीवरील हा कल होता. गुंतवणुकीसाठी लहान गुंतवणुकदारांसाठी उत्तम पर्याय असलेल्या म्युच्युअल फंडांची यंदा कामगिरी यथातथाच होती. मागचे महत्वाचे कारण म्हणजे शेअर बाजारात असलेली मंदीची स्थिती. मात्र भविष्यात बाजार चढू लागल्यावर विविध फंडांनाही चांगले दिवस येणार आहेत. आजवर सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात मोठी लाभदायक असल्याच्या प्रतिमेला यंदा मात्र साफ तडा गेला. जागतिक पातळीवर सोने घसरत असल्याने आपल्याकडे सोन्याची मागणी भरपूर असूनही सोन्याच्या किंमती काही फराश्या वधारल्या नाहीत. मात्र असे असले तरीही सर्वसामान्यांसाठी सोने गुंतवणुकीचा पर्याय अजूनही आकर्षकच आहे.  यंदाच्या वर्षी न्यायालयाने अनेक महत्वाचे निकाल दिले. यातील त्यांचे अनेक निकाल हे वादग्रस्त ठरले. यापैकी डान्स बारवरील बंदी उठविण्याचा घेतलेला निर्णय तसेच समलिंगी संबंध बेकायदा ठरविणारा न्यायालयाचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे. याचे दीर्घकालीन पडसाद उमटत राहातील यात काहीच शंका नाही. न्यायालयाच्या अनेक निकालांमुळे ज्या दिग्गजांना जेलमध्ये जावे लागले त्यात लालूप्रसाद यादव, संजय दत्त व पप्पू कलानी यांचा समावेश होता. न्यायालयाच्या आणखी एका निर्णयाने संपूर्ण देश हादरला तो म्हणजे दिल्लीतील आरुषी खून प्रकरणी तिचे आई-वडिलच दोषी ठरले. या घटनेने संपूर्ण कौटुंबिक व्यवस्थेलाच हादरा बसला. सरत्या वर्षात आणखी एका हादरा देणार्‍या घटनेची आठवण होते आहे ती म्हणजे डॉ. दाभोलकर यांची झालेली निर्घृण हत्या. या घटनेनंतर सरकारला जाग येऊन निदान त्यांनी जादुटोणा विधेयक मंजुर केले. डॉ. दाभोलकरांचे मारेकरी अजून न सापडल्याचे दु:ख आहेच. यंदा हे जग सोडून जाऊन आपल्या जीवाला चटका लावलेल्यात अभिनेता प्राण, फारुख शेख, ऋतुपर्णो घोष, जयमाला शिलेदार, सुश्मिता बॅनर्जी, माजी मंत्री मोहन धारिया, पाकशास्त्रातील तरबेज तरला दलाल, साहित्यिक श.ना. नवरे, नाट्यकर्मी सुधीर भट, विनय आपटे यांचा समावेश होता. तर जागतिक नेत्यांमध्ये ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर व दक्षिण आफ्रिकेचे जागतिक नेते नडेल्सन मंडेला यांनी या जगाचा निरोप घेतला. अशा प्रकारे सुख-दु:खांनी गेले वर्ष ठासून भरलेले होते आणि उद्यापासून सुरु होणार्‍या नवीन वर्षात दील है छोटासा, छोटीसी आशा असे उराशी बाळगून नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करणार आहोत...
---------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel