-->
मागील दरवाजाने खासगीकरण...

मागील दरवाजाने खासगीकरण...

रविवार दि. 04 मार्च 2018 च्या अंकासाठी चिंतन- 
------------------------------------------------
मागील दरवाजाने खासगीकरण...
---------------------------------------------
एन्ट्रो-एस.टी.ने सुरु केलेल्या शिवशाही या नवीन बसच्या तुलनेत एस.टी.च्या लाल डब्याच्या बस अगदीच सुमार दर्ज्याच्या व मागासलेल्या होत्या. त्यामुळे खासगी बसच्या तुलनेत एस.टी. काही टिकाव धरु  शकत नव्हती. अर्थात एस.टी.ला जर खासगी बसच्या स्पर्धेत टिकाव धरायचा असेल तर अशा प्रकारच्या नवीन बसचा ताफा खरेदी करणे ही काळाची गरजच होती. परंतु हे करीत असताना एस.टी.ने खासगीकरण मागच्या दरवाजाने सुरु केले आहे, व हे धोकादायक ठरावे...
----------------------------------------
सध्या राज्य परिवाहन महामंडळाच्या (एस.टी.)च्या दिमाखदार शिवशाही गाड्या फिरताना पाहिले की मनाला प्रसन्न वाटते. प्रसन्न यासाठी की, आजवर खासगी बसेसची अशा प्रकारच्या आलिशान बसची सेवा प्रवाशांना पुरवून आपला व्यवसाय वाढविला होता आता एस.टी.च्या आधुनिक, आरामदायी गाड्या अशा प्रकारची सेवा देतील. या नवीन बसच्या तुलनेत एस.टी.च्या लाल डब्याच्या बस अगदीच सुमार दर्ज्याच्या व मागासलेल्या होत्या. त्यामुळे खासगी बसच्या तुलनेत एस.टी. काही टिकाव धरु  शकत नव्हती. अर्थात एस.टी.ला जर खासगी बसच्या स्पर्धेत टिकाव धरायचा असेल तर अशा प्रकारच्या नवीन बसचा ताफा खरेदी करणे ही काळाची गरजच होती. परंतु हे करीत असताना एस.टी.ने खासगीकरण मागच्या दरवाजाने सुरु केले आहे, व हे धोकादायक ठरावे. एस.टी.ने आपल्याकडे प्रवासी खेचण्यासाठी असा प्रकारच्या नवीन बस खरेदी करुन एक चांगले केले. कारण एस.टी.ला एकीकडे आरामदायी बसचा ताफा व दुसरीकडे स्थानिक वाहतुकीसाठी लाल डबे अशी रचना ठेवणे ही बाब स्वगतार्ह आहे. अशा प्रकारच्या व्दिस्तरीय रचनेमुळे एस.टी. आपला डोलारा सांभाळू शकेल व यातून खासगी बसचा प्रवासी एस.टी.ला आपल्याकडे खेचणे शक्य होणार आहे. यातून एस.टी.चे उत्पन्न वाढेल, असे गृहीत धरण्यात आले आहे. सध्या तरी या नवीन बसने एस.टी.ला पाच कोटी रुपयांचा तोटा दाखविला आहे, परंतु कालांतराने हा व्यवहार फायद्यात येईल अशी अपेक्षा ठेवावयास हरकत नाही. असे झाल्यास या नवीन ताफ्यातून होणारा नफा हा सध्याच्या लाल डब्यांच्या बसला होणारा तोटा भरुन काढण्यासाठी वापरता येऊ शकेल. मात्र हे करण्यासाठी एस.टी.चे व्यवस्थापन हे व्यावसायिक झाले पाहिजे. तेवढा व्यवसायीकपणा एस.टी.च्या सध्याच्या व्यवस्थापनात आहे, का हा सवाल आहे.  एस.टी.ने राज्यभरात एकूण दोन हजार शिवशाही बस उपलब्ध करुन दिल्या आहेत. या दोन हजार बसेसपैकी केवळ पाचशे बसेस महामंडळाच्या मालकीच्या आहेत. उर्वरित एक हजार पाचशे बसेस या खाजगी कंपन्याकडून भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. राज्यपरिवहन महामंडळाच्या बसेसवर महामंडळाचे चालक वाहक असतात. पण खाजगी बसेसचे चालक हे त्या कंपनीचे असतात तर वाहक परिवहन महामंडळाच्या असतो. या खाजगी बसेसच्या देखभाल दुरुस्तीचे काम संबंधित कंपनी करते. मात्र बसेसना डिझेलचा पुरवठा राज्य परिवहन महामंडळाकडून केला जातो. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची देखभाल दुरुस्ती परिवहन महामंडळाच्या आगारामध्येच केली जाते. सध्या या बसेस नवीन असल्यामुळे देखभाल दुरुस्तीचा प्रश्‍न उदभवत नसला तरी या कार्यशाळेतील मॅकेनिकना टाटा तसेच अन्य कंपन्यांकडून आवश्यक ते प्रशिक्षण देण्याचे काम देखील सुरु करण्यात आले. सध्या मात्र या बसची रचना, एसी सारख्या सुविधांबाबत मॅकॅनिक अनभिज्ञच आहेत. एखादी बस नादुरुस्त झाली तर मॅकॅनिकची तारांबळ उडते. रायगड जिल्ह्यासाठी एकूण 11 शिवशाही बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यापैकी सहा एस.टी.च्या मालकीच्या असून पाच बसेस खाजगी मालकीच्या आहेत. या अकरा बसेसपैकी 7 बसेस महाड आगाराला देण्यात आल्या असून त्यातील पाच बसेस महामंडळाच्या तर दोन खाजगी मालकीच्या आहेत. श्रीवर्धन आगाराला दोन आणि मुरुड आगाराला एक बस उपलब्ध करुन देण्यात आली असून या तिन्ही बसेस खाजगी आहेत. अलिबाग आगाराला एक बस देण्यात आली असून ती परिवहन महामंडळाच्या मालकीची आहे. खाजगी कंपन्याकडून बसेस उपलब्ध करुन घेतल्यानंतर त्यांना चालक या कंपन्यांचे देण्याचे कारण काय? खाजगी मालकीच्या दीड हजार बसेसवर संबंधित कंपन्याचे चालक नेमल्यामुळे महामंडळाच्या 1 हजार 500चालकांचे करणार काय? त्यामुळे परिवहन महामंडळाने भाडेतत्वावर उपलब्ध करुन घेतलेल्या शिवशाही बसेस म्हणजे एस.टीच्या खाजगीकरणाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे, अशी चर्चा आहे. एस.टी.ने आजवर स्थापनेपासून या राज्यातील व परराज्यातील जनतेची मुबलक सेवा केली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एस.टी.चे आजवरचे स्थान हे महत्वाचे व अढळ असेच होते. परंतु गेल्या दहा-पंधरा वर्षात एस.टी.ला जाणूनबुजून भंगारमध्ये काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. एकेकाळी रस्ता तेथे एस.टी. असे सुत्र होते. सर्वसामान्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वच जण या सेवेचा लाभ घेत असत. परंतु गेल्या दशकात एस.टी.ने आपली काळ पाहून काट टाकलीच नाही व राजकारण्यांनीही हे खाण्याचे एक चांगले कुरण म्हणून या महामंडळाकडे पाहिले, ही दुर्दैवी बाब ठरावी. एकेकाळी एस.टी.ची मक्तेदारी असल्यासारखी स्थिती होती. त्याच एस.टी.ला खासगी बसने काळाच्या ओघात खाऊन टाकल्यासारखी स्थिती झाली. एस.टी.कडे एक मळलेला, अस्वच्छ लाल डबा, सरकारी फितीत अडकलेली सेवा म्हणून पाहिले गेले. त्याविरुध्द खासगी बसने खर्च करण्याची क्षमता असलेला प्रीमियम ग्राहक आपल्याकडे खेचला. आज राज्यात अशा प्रकारे चांगली सेवा मिळावी, त्यासाठी थोडे जास्त पैसे देणारा प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. हा वर्ग एस.टी.पासून दुरावला. आता हा वर्ग पुन्हा आणण्यासाठी केवळ आलिशान बस आणून चालणार नाही तर प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी कर्मचार्‍यांच्या मानसिकेतही बदल करावा लागेल, त्याचबरोबर महामंडळातील भ्रष्टाचार संपला पाहिजे. एकूणच एस.टी.ला व्यावसायिक व्हावे लागेल. केवळ खासगीकरण करुन हे शक्य होईलच असे नाही. कारण सध्या खासगीकरणाचा जो प्रयत्न सुरु आहे त्यातून एस.टी.च्या कर्मचार्‍यांमध्ये असंतोष माजणार आहे, त्यातून त्यांच्या कामावर परिणाम होईलच याचा फटका प्रवाशांना दिल्या जाणार्‍या सेवेत होईल. एस.टी.ने अशा प्रकारे मागील दरवाजाने खासगीकरण केल्यास त्यातून सध्या ज्या उद्देशाने ही नवीन सेवा सुरु केली आहे, त्यालाही खीळ बसू शकते. यातून एस.टी.ला फायदा होण्याएवजी विचकाच होईल व हे महामंडळ तोट्याच्या गर्त्यात गेल्यास त्यातून बाहेर पडणे कठीण होईल. 
-------------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "मागील दरवाजाने खासगीकरण..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel