-->
कुडाळमध्ये राणेंची सरशी

कुडाळमध्ये राणेंची सरशी

संपादकीय पान बुधवार दि. २० एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कुडाळमध्ये राणेंची सरशी
नव्याने स्थापन झालेल्या कु़डाळ नगरपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. खरे तर कॉँग्रेसने म्हणण्यापेक्षा कॉँग्रेसचे नेते नारायण राणे यांची सरशी झाली आहे असे म्हणणे योग्य ठरेल. कारण ही निवडणूक नुकत्याच विधानसभेच्या पराभवानंतरची नारायण राणेंसाठी प्रतिष्ठेची गणली गेली होती. या निवडणुकीच्या निमित्ताने राणेंनी आपले राजकीय अस्तित्व संपलेले नाही, हे सिध्द करुन दाखविले आहे. एकूण १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने सर्वाधिक नऊ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेने सहा, भाजपने एक आणि अपक्षाने एका जागेवर विजय मिळवला. कुडाळ नगरपंचायतीचे रुपांतर झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. नगरपंचयातीची निवडणूक असली तरी, इथे कॉंग्रेस नेते नारायण राणे आणि शिवसेना असा थेट सामना होता. नारायण राणे, शिवसेना आणि भाजपने इथे आपापली पूर्ण ताकत पणाला लावली होती. परंतु येथे सर्वच विरोधक पूर्णपणे गारद झाले आहेत आणि राणेंनी आता पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघावर पक्कड बसविण्यास सुरुवात केली आहे. नारायण राणेंचा पराभव करुन आलेले शिवसेनेचे स्थानिक आमदार वैभव नाईक इथे निवडणुकीची सर्व जबाबदारी संभाळत होते. तर भाजपचे डोंबिवलीतील आमदार रविंद्र चव्हाण इथे तळ ठोकून होते. मुळातच इथे भाजपाचे फारसे अस्तित्व नव्हते. परंतु भाजपाच्या आता केंद्रात व राज्यात सत्ता आल्याने अपेक्षा वाढल्या आहेत, त्यामुळे त्यांनी आपल्या बाजूने हवा निर्माण केली होती. मात्र निकालावरुन भाजपाचा काहीही परिणाम झाला नसल्याचे दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा नारायण राणेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. परंतु दोन वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून इथे समीकरण बदलली. नारायण राणे यांचे सुपूत्र आणि कॉंग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांचा लोकसभेला पराभव झाला. नरेंद्र मोदींची लाट असल्याने हा पराभव झाला असे अनेकांनी त्यावेळी म्हटले होते. मात्र त्यानंतर विधानसभेला स्वत: नारायण राणे यांचा शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी पराभव केला होता. राणेंचा हा पराभव सर्वांसाठीच धक्कादायक होता. त्यानंतर जिल्ह्यातील अन्य निवडणुकातील निकालही राणे यांच्यासाठी फारसे उत्साहवर्धक नव्हते. त्यामुळे जिल्हयातील पुढील राजकारणात राणे यांचे वजन घटणार की, वाढणार त्यादृष्टीने कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक महत्वाची होती. तूर्तास तरी कुडाळमध्ये नारायण राणे यांनी बाजी मारली आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीत जनता जरी स्थानिक प्रश्‍नांना प्राधान्य देत असली तरी केंद्रातील व राज्यातील भाजपा-शिवसेनेच्या राजवटीला जनता केवळ दोनच वर्षातच कंटाळली आहे. त्याचाही परिणाम या निवडणुकीत दिसून येत आहे. नारायण राणे हे पुन्हा एकदा या निमित्ताने सिध्ुदुर्ग जिल्ह्यात आपले वर्चस्व स्थापन करतील असे दिसते. कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल असेच सांगतो.
-----------------------------------------------------------

0 Response to "कुडाळमध्ये राणेंची सरशी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel