-->
मराठीचे विद्यापीठ

मराठीचे विद्यापीठ

बुधवार दि. 28 फेब्रुवारी 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
मराठीचे विद्यापीठ
ग्रंथालीच्या प्रदीर्घ काळ सुरु असलेल्या प्रयत्नांना आता यश आले असून मराठी भाषेतील पहिले विद्यापीठ मुंबईतील वांद्रे येथे उभारण्यास सरकारने हिरवा कंदिल दाखविला आहे. मुंबई महापालिकेने वांद्रे बँडस्टँड येथील जागा मराठी विद्यापीठासाठी देण्याचे मान्य केले आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत विधानभवनात एका कार्यक्रमात त्या संदर्भातील अधिकृत पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ग्रंथालीच्या पदाधिकार्‍यांना देण्यात आले. मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र विद्यापीठ असण्याची गरज सातत्याने मराठी भाषा प्रेमी करीत होते. परंतु या प्रस्तावाला आजवर कोणत्याही सरकारने होकार दिला नव्हता. आता मात्र भाजपा-शिवसेनेच्या सरकारने हे विद्यापीठ साकारण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकले आहे, त्याबद्दल शासनाचे अभिनंदन करावयास हवे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने आजवर तमीळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिशा या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यापैकी तमीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या भाषांची आपापल्या राज्यांत स्वतंत्र विद्यापीठे आहेत. संस्कृत भाषेचीही केंद्रीय, अभिमत आणि खासगी अशी अनेक विद्यापीठे देशाच्या वेगवेगळ्या भागांत आहेत. उर्दू, हिंदी आणि इंग्रजीसह विविध परकी भाषांसाठी केंद्रीय विद्यापीठे आहेत. मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ हैदराबादला आहे. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय महाराष्ट्रात वर्धा येथे आहे; मात्र आजवर मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ नव्हते. अन्य भाषांची स्वतंत्र विद्यापीठे असणे ही घटना जशी सुखावह आहे तसेच मराठीचे विद्यापीठ खरे तर यापूर्वीच असावयास हवे होते. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने या विद्यापीठाची पायाभरण झाली असे म्हणता येईल. मराठी माणसासाठी व या भाषेच्या अभ्यासकांसाठी ही बाब महत्वाची ठरणार आहे. लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया (1903-1923) नुसार भारतात त्या काळात 179 भाषा आणि 544 बोली अस्तित्वात होत्या. 1961 च्या जनगणनेनुसार 1652 भाषा भारतात बोलल्या जात होत्या. जी भाषा दहा हजारांपेक्षा जास्त संख्येच्या जनसमूहांमध्ये बोलली जात असेल, त्याच भाषेचा जनगणनेमध्ये मातृभाषा म्हणून समावेश करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला होता. त्यामुळे भारतीय भाषांची नेमकी संख्या आजही उपलब्ध नाही. भाषा धोक्यात आलेल्या देशांमध्ये भारत प्रथम क्रमांकावर असून 198 भारतीय भाषा मृत्यूपंथावर आहेत. अर्थात ही प्रक्रिया केवळ आपल्याकडे नाही तर जगात आहे. 21 व्या शतकाच्या अखेरीपर्यंत संपूर्ण जगात 300 भाषा अस्तित्वात राहातील असा अंदाज आहे. जगात आज अस्तित्वात असणार्‍या सहा हजारांहून अधिक बोलीभाषांपैकी निम्म्या भाषा या कायमच्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, असा निष्कर्ष 2009 मध्ये नोंदविला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर जगातील भाषांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. मानवजातीच्या वाटचालीमधील संपन्न भाषिक वारसा नष्ट होण्यामुळे मानवी संस्कृती, बौद्धिक संपदा, कला, ज्ञान, शहाणपण वगैरेंचा ठेवा या जगाच्या पाठीवरून कायमचा नाहीसा होण्याच धोका आहे. बोली भाषांचे प्रदेशवार, जिल्हावार भेद आढळतात. जात तत्त्वावरही बोलीतील भेद अवलंबून असल्याने एकंदर मराठी बोलींची संख्या शंभराहून अधिक असण्याची शक्यता आहे. वर्‍हाडी, हळवी, पोवारी, नागपुरी, अहिराणी, कोकणी, वारली, ठाकरी, डांगी, सामवेदी, कोल्हापुरी, नगरी, सोलापुरी, पुणेरी, चित्पावनी असे बोलीचे अनेक प्रकार उपप्रकार आढळतात. आदिवासींच्याही भौगोलिक, सामाजिकस्तरानुसार पोटबोली आहेत. मराठी बोलींची निश्‍चित संख्या व स्वरूप आजही अधिकृतपणे उपलब्ध नाही. यासंबंधीचे काम खरे तर शासकीय पातळीवर व्हावयास हवे, परंतु सरकार याबाबत उदासिन आहे. आधुनिकीकरण, स्थलांतर, संपर्क व दळणवळणाची वेगवान साधने, वाढते आदानप्रदान, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा प्रभाव, इंग्रजीचे वाढते महत्त्व यांसारख्या घटकांचा परिणाम प्रादेशिक, स्थानिक बोली भाषांवर होत आहे. पारंपरिक बोलींमध्ये प्रमाण मराठी, इंग्रजी, हिंदी वगैरे भाषांचा प्रभाव वाढत आहे. भारताच्या राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट केल्या गेलेल्या बावीस भाषांपैकी मराठी ही महत्त्वाची भाषा आहे. 2011 च्या जनगणनेनुसार भारतात मराठी बोलणार्‍यांची संख्या दहा कोटींवर आहे. मराठी ही जगातली 19 व्या क्रमांकाची भाषा आहे. आज मराठी भाषेपुढे मोठी आव्हाने आहेत. याचे महत्वाचे आव्हान म्हणजे मराठीचा वापर दिवसेंदिवस कमी होत चालला आहे व मराठी ही काही काळाने केवळ बोलीभाषा म्हणूनच राहाणार आहे. हे वास्तव आता आपण मान्य केले पाहिजे. जर कुणाला आपल्या मुलांना मराठी माध्यमात शिक्षण द्यायचे नसेल तर त्यांना आग्रह करणे चुकीचे आहे. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर मराठी भाषेचा विकास होण्यासाठी जे प्रयत्न शासकीय पातळीवर, भाषा तज्ज्ञांकडून व विद्यापीठाकडून व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत. सर्वसामान्य लोकांना आपल्या मुलांना मराठी शाळेत घातले की त्यांची वाढ खुंटते अशी ठाम समजुत झाली, ही समजुत चुकीची असली तरीही मराठीचे योग्य प्रकारे संवर्धन न झाल्यामुळे हे झाले. आज मराठी भाषेत तुम्ही पदव्युत्तर शिक्षण अथवा कायदा, विज्ञान, अभियांत्रिकी यातील शिक्षण घेऊ शकत नाही. चीनी किंवा जर्मन भाषेत हे शिक्षण घेता येते. अशा वेळी मराठीत शालेय शिक्षण घेऊन पुढे इंग्रजीत महाविद्यालयीन शिक्षण घेेणार्‍या मुलांची पार अडचण होते. आता ही चूक सुधारण्याच्या पलिकडे गेलेली आहे. जन्मल्यानंतर कुटुंबात भाषा मराठी, स्थानिक बोली व औपचारिक शिक्षणाचे माध्यम प्रमाणमराठी, न्यायसंस्था, आर्थिक संस्था, उद्योगधंदे वगैरे उपजीविकेशी संलग्न व्यवहाराची भाषा इंग्रजी, महाराष्ट्राच्या शासन व्यवहाराची भाषा मराठी व इंग्रजी, मोठ्या शहरातील बाजाराची, विनिमयाची भाषा हिंदी, करमणूकीच्या क्षेत्रात मुख्यत्वे हिंदी, केंद्र सरकारच्या कार्यालयांची भाषा हिंदी व इंग्रजी असा भाषिक व्यवहाराची दिशा आहे. अशा भिन्न भाषिक व्यवहारामुळे नेहमीच्या जगण्यातून आपल्याला ज्ञानप्राप्ती होत नाही आणि आपल्या हातून ज्ञाननिर्मितीही होत नाही. यातून मराठी भाषा मागे पडली. भविष्यात मराठीचे काही सांगता येत नाही. सध्या तूर्त तरी उशीरीने का होईना सुरु होणार्‍या या मराठी विद्यापीठास शुभेच्छा.
------------------------------------------------------

0 Response to "मराठीचे विद्यापीठ"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel