
सर्व काही गोडीगुलाबीने
सर्व काही गोडीगुलाबीने
12 May 20
Edit
विधानपरिषदेसाठी आता मतदान होणार नाही व सर्वच्या सर्व नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या काळात निर्माण झालेला राजकीय तिढा आता संपुष्टात आला आहे. विधानसभेतील ताकदीनुसार भाजपाचे चार, दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी व एक कॉँग्रेस असे परिषद सदस्य निवडून येणार होते. परंतु शेवटच्या टप्प्यात कॉँग्रसने दोन उमेदवार जाहीर केल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असे चित्र निर्माण झाले होते. परंतु त्यासंबंधी महाआघाडीच्या नेत्यांनी सह्याद्रीवर बैठक घेऊन हा विषय अखेर गोडीगुलाबीने मिटविला. कॉँग्रेसने अखेर एकच उमेदवार लढविण्याचा आपला निर्णय जाहीर केल्याने आता नऊ जागांसाठी नऊच उमेदवारी अर्ज आले, परिणामी ही निवडणूक अखेर अपेक्षेनुसार बिनविरोधच झाली. खरे तर कॉँग्रेसला एक उमेदवार जादा देण्याची काहीच आवश्यकता नव्हती. कारण जर त्या उमेदवाराला निवडून आणावयाचे असेल तर 14 मते फोडण्याची आवश्यकता होती. तेवढी क्षमता सध्याच्या काळात कॉँग्रेसकडे नाही व त्याहून सर्वात महत्वाचे म्हणजे सध्याच्या कठीण काळात ते शक्य देखील झाले नसते. एकतर प्रत्येक आमदारांना भेटून बोलून त्यांची मते फोडणे हे कोरोनाच्या निर्बँधांच्या काळात काही शक्य होणार नाही. याचा अर्थ स्पष्ट होता की, कॉँग्रेस घोडेबाजार करायला तयार होती परंतु त्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लगाम लावला. मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अन्यथा आपण निवडणुकीतून माघार घेऊ असा सज्जड दम भरल्याने कॉँग्रेसने आपले सर्व मनसुबे रद्द केले. उध्दव ठाकरे यांची राजकारण करण्याची दिशा पाहता त्यांना फारसा अशा प्रकारच्या राजकारणात रस नाही. त्यामुळे घोडेबाजारालाही लगाम लागला व सर्व काही गोडीगुलाबीने पार पडले असेच म्हणावे लागेल. उध्दव ठाकरे यांनी आपले सर्व लक्ष सध्या कोरोनाच्या लढाईवर केंद्रीत केले आहे. अशा वेळी राजकारण करणे व घोडेबाजार करणे हे राजकीय सुसंस्कृपणात बसणारे नाही हे त्यांनी वेळीच ओळखले व कॉँग्रेसला आवर घातला. खरे तर सध्याची ही निवडणूक राज्यपालांच्या अट्टहासापोटी लादली गेली होती. त्यांनी जर मंत्रिमंडळाने सादर केलेला राज्यपाल नियुक्त आमदार उध्दव ठाकरे यांना करण्याचा ठराव मान्य केला असता तर ही निवडणूक देखील झाली नसती. परंतु महाराष्ट्राचे राज्यपाल हे केंद्रातील इशाऱ्यावर आपले हुकून काढत असतात त्यानुसार त्यांनी आपले काम केले. आता सर्व काही ठीक झाले असले तरीही राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा ठरावा स्विकारावा किंवा नाही ह्यावर अजूनही स्पष्टता झालेली नाही. राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा ठराव स्विकारलाच पाहिजे असे घटना सांगते. त्यानुसार राज्यपालांनी तो ठराव स्वीकारला पाहिजे होता. याचा अर्थ त्यांनी घटनाविरोधी कृती केली आहे. आता सर्व काही ठीकठाक झाल्याने हे सर्व मुद्दे गौण ठरविले जातील. परंतु अशा प्रकारे या सरकारला राज्यपाल कोश्यारी नेहमीच त्रास देणारे ठरणार आहेत हे यावरुन स्पष्ट झाले. उध्दव ठाकरे आमदार झाल्याने आता त्यांची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची कायम झाली आहे व त्या निमित्ताने जे घटनात्मक पेच निर्माण केले जात होते त्यालाही ब्रेक लागला आहे. परंतु त्यासाठी उध्दव ठाकरे यांना पंतप्रधान मोदींना फोन करावा लागला व सध्याच्या कोरानाच्या काळात घटनात्मक तिढा निर्माण करु नये असे सांगावे लागले. ठाकरेंनी अजूनही मोदींशी आपला रॅपो चांगला ठेवला असल्याने त्याचा उपयोग झाला असेच म्हणावे लागेल. एकूणच या राजकारणात केंद्राने आपण यात वरचढ आहोतच हे दाखवून दिले. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपामध्ये भविष्यात होणारी दुफळी पुन्हा उघड झाली आहे. भाजपाने ज्येष्ठ नेते व प्रस्थापित नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंढे, विनोद तावडे यांना वाटाण्याच्या अक्षता लावून आता तुमची पक्षाला गरज नाही असेच दाखवून दिले आहे. त्यामुळे भविष्यात खडसे बंडाळी करु शकतात. खडसे आपल्या बंडाळीविषयी उघडपणे बोलूनही दाखविले आहे. परंतु ते बंडासाठी योग्य वेळ व योग्य पक्ष शोधीत असावेत. परंतु आता विधानपरिषदेसाठी त्यांना पक्षाने अव्हेरल्याने त्यांच्यासाठी बंड करण्याची हीच योग्य वेळ आहे. मात्र कोरोनामुळे ते थांबले असावेत. खडसेसारख्या ज्येष्ठ नेत्याची भाजपाने एवढी अवहेलना करणे चुकीचेच आहे, त्यामुळे खडसेंनी आता जर आपला वेगळा मार्ग चोखाळला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे भाजपाने गोपीचंद पाडळकरांसारख्या नेत्याला उमेदवारी दिली आहे, ज्यांनी एकेकाळी भाजपाला मतदान करु नका असे आवाहन केले होते. त्यामुळे भाजपामधील ही धुसफूस आता भविष्यात कोणता मार्ग चोखाळते ते पहावे लागेल. भाजपाप्रमाणे कॉँग्रेसने देखील अनपेक्षीत असा चेहरा दिला आहे. अभ्यासू व आक्रमक म्हणून गेल्या पाच वर्षात पुढे आलेले सचिन सावंत, विदर्भातील अतुल लोंढे यांचे नाव चर्चेत होते. परंतु अपरिचित असलेले राजेश राठोड यांना उमेदवारी दिल्लीहून जाहीर करण्यात आली. कॉँग्रेसचे राजकारण आता पुन्हा एकदा पूर्वीच्याच मार्गाने म्हणजे दिल्लीपतींच्या आशिर्वादाने सुरु आहे असेच म्हणावे लागेल. महाआघाडीच्या सत्तेच्या काळातील ही पहिली विधानपरिषदेची पोटनिवडणूक गोडीगुलाबीने पार पडली असे म्हणावे लागेल. यातून मुख्यमंत्र्यांची खुर्ची अधिक बळकट झाली आहे आता जनतेच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
0 Response to "सर्व काही गोडीगुलाबीने"
टिप्पणी पोस्ट करा