
कोरोना गेलेला नाहीय...
कोरोना गेलेला नाहीय
गेल्या काही दिवसात मुंबईसह काही भागात कोरनाचे रुग्ण वाढल्याने पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारने बंधने पाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊन लादण्याची पाळी येईल असा सज्जड दम सर्वांना भरला आहे. लॉकडाऊन उठविण्यास हळूहळू सुरुवात केल्यावर लोक निर्धास्त होऊ लागले. त्यातून गेल्या महिन्याभरात लोकांमधील बेफिकिरी वाढली होती. मुंबईत लोकल गाड्या सुरु झाल्यावर हळूहळू सर्व जनतेसाठी त्या खुल्या करण्यास प्रारंभ झाला. अजूनही काही निर्बंधांसह या लोकल्स धावत आहेत. मुंबईत कोरोनापूर्व काळात दररोज ८० लाख लोक प्रवास करीत होते. त्यापैकी आता दररोज जेमतेम ३० लाख लोक प्रवास करीत आहेत, गेल्या महिन्याभरात यातील निर्बंध आणखी शिथील केल्यावर लोकलचे प्रवासी वाढले. याचा परिणाम म्हणूनच कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. सरकारला जी भीती वाटत होती ती अखेर खरी निघाली आहे. त्यामुळे सरकार लोकल सुरु करण्यासंबंधी पार सावधानपणे पावले टाकीत होते. परंतु विरोधकांचा म्हणजे भाजपाचा लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी जास्त रेटा होता. शेवटी त्याचे वाईट परिणाम दिसू लागल्यावर लोकल सर्वांसाठी सुरु करण्याची मागणी करणाऱ्या भाजपाचे नेते आता मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. कोरोना हा लोकांच्या गर्दीतून पसरण्याचा जास्त धोका आहे. त्यामुळेच गर्दी टाळण्याचे सरकार सतत आवाहन करीत आहे. मात्र जवळपास सहा महिने लॉकडाऊनमध्ये पकलेली जनता कोरोनाने मरु परंतु आता निर्बध नकोत, आम्हाला नियमीत कामावर जाऊद्यात अशा मनस्थितीत आली होती. कारण लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार गेले होते किंवा ज्यांचे टिकले होते त्यांचे पगार कापले जात होते. त्यामुळे रोजगार टिकविण्याची गरज प्रत्येकाला म्हणजे कोणत्याही आर्थिक उत्पन्न गटातील लोकांना होती. त्यातच जे स्थलांतरीत मजूर होते त्यांची तर खूपच स्थिती नाजूक झाली होती. त्यांनी लॉकडाऊनमध्ये उपाशीपोटी चालत आपले गाव गाठले होते. त्याची दखल सरकरानेही घेतली नाही. त्यात अनेकांचे जीवही गेले. आता त्यातील सर्व मजूर अजून शहरात परतलेले नाहीत. ज्यांना गावात शेती किंवा अन्य कसलाही रोजगार नाही तेच मजूर परतले आहेत. शहरातील मोठ्या संख्येने असलेल्या मध्यमवर्गीयालाही याची मोठी झळ लागली आहे. सरकारने या सर्वांनाच केवळ आश्वासन देण्याच्या पलिकडे काहीच दिलेले नाही. त्यामुळे एकीकडे रोजगार टिकविण्याची सर्कस तर दुसरीकडे सरकारकडून कसालेही पाठबळ नाही अशा दुहेरी स्थितीत आज हे सर्व जण सापडले आहेत. मुंबईसारख्या महानगरात लाखो लोक आज आपला रोजगार टिकविण्यासाठी दररोज चार-पाच तास प्रवास करीत आहेत, त्याचे कारण लोकल त्यांना अजूनही खुली झालेली नाही. कोरोनामुळे जनतेचा जीवनाचा गाडा हाकण्याचा संघर्ष अजून व्यापक झालेला आहे. शहरात आज प्रामुख्याने लोकांच्या वाढत्या संपर्कामुळे कोरोना पुन्हा फैलावू लागला आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. त्यातुलनेत ग्रामीण भागात कोरोना बहुतांशी नियंत्रणात आल्यासारखे चित्र आहे. परंतु तेथेही शहरातून जर लोक ग्रामीण भागात काही ना काही निमित्ताने आल्यास कोरोना पैलावू शकतो. याचा धोका सर्वाधिक कोकणाला आहे तसेच पर्यटन स्थळांना आहे. शहरात आज जनजीवन पूर्वपदावर आले आहे. अगदी पूर्वीप्रमाणे सण, समारंभ होऊ लागले आहेत. शंभर लोकांची मर्यादा असूनही लग्नाला त्याहून जास्त लोक जमा होताना दिसतात. एकूणच पाहता लोकांतील बेफिकीरीपणा वाढला आहे. कामाधंद्यासाठी बाहेर पडणे आपण समजू शकतो, परंतु अनावश्यक कामांसाठी बाहेर पडणे म्हणजे कोरोनाचा फैलाव करण्याला हातभार लावण्यासारखे आहे हे आता आपल्याला स्पष्ट दिसले आहे. सरकारने लॉकडाऊन हे निर्बंध लादूनच हटविले होते. परंतु जर जनता बेफिकरीपणा करणार असेल तर लॉकडाऊनचा फेरविचार करण्याचा सरकारने दिलेला इशारा योग्यच आहे. अजूनही शहरातील शाळा, महाविद्यालये पूर्णपणे सुरु झालेली नाहीत. सरकार ती सुरु करण्याचा विचार करीत असताना जर कोरोना रुग्णांची संख्या वाढली असेल तर याचाही फेरविचार करावा लागेल. कोरोनावरील लस आता देशात ९० लाख लोकांना दिली गेली आहे. ही लस पहिल्या टप्प्यात वैद्यकीय सेवा करणाऱ्यांसाठी दिली जात आहे. त्यानंतर म्हणजे बहुदा दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील जनतेला लस देण्याचे हाती घेण्यात येईल. लस देण्याची सध्याची गती पाहता तसेच लोकांचाही लस घेण्याचा कल पाहता २०१२ साल हे सर्वंना लस देण्यातच जाईल असे दिसते. लस आली म्हणजे आपण पूर्ण सुरक्षीत झालो असेही नव्हे. लस ज्यांनी घेतली आहे किंवा घेतलेली नाही त्या सर्वांनीच अजूनही खबरदारी घेऊन वागणे आवश्यक ठरणार आहे. परस्परांमधील सुरक्षीत अंतर ठेवणे, सातत्याने हात स्वच्छ धुणे व मास्कचा वापर करणे हे अजूनही आपल्याला आवश्यक आहे. लोक हे सर्व विसरले आहेत, असे दिसते. त्यामुळे लॉकडाऊन पुन्हा लादण्याची वेळ येऊ शकते. लॉकडाऊन आता पुन्हा कोणालाच नको आहे, कारण लॉकडाऊनचे दुष्परिणाम सर्वांनीच भोगले आहेत. त्यामुळे लॉकडाऊन नको असले तर सुरक्षीतता बाळगण्याची आवश्यकता आहे. युरोपातील अनेक देशात पुन्हा लॉकडाऊन लादले गेले आहे. त्यापासून आपल्याला धडा घेण्याची आवश्यकता आहे. कोरोना एवढ्या लवकर जाणार नाही. त्यामुळे सुरक्षीततेची त्रिसुत्री आपल्याला किमान पुढील दोन वर्षे पाळावी लागणार आहे याची खूणगाठ प्रत्येकाने बांधून आपली वाटचाल करावी.
0 Response to "कोरोना गेलेला नाहीय..."
टिप्पणी पोस्ट करा