
दुसरी लाट?
24 फेब्रुवारीच्या अंकासाठी अग्रलेख
दुसरी लाट?
देशात दुसरी लाट डिसेंबरच्या दरम्यान येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु ती लाट थोपविण्यास सर्वांनाच यश आले खरे परंतु आता दुसरी लाट आपल्या दरवाज्यावर येऊन ठेपली आहे. अर्थात ही लाट थोपणे आपल्या सर्वांच्याच हाती आहे. राज्यासह देशातील कोरोना रुग्णांचे आकडे झपाट्याने गेल्या काही दिवसात वाढले आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर ज्या गतीने आकडे वाढत गेले होते तशीच कोरोनाग्रस्तांची आकडेवारी आता वाढू लागल्याचे दिसू लागले आहे. महाराष्ट्र या वाढीत सर्वात जास्त आघाडीवर असून ८१ टक्के रुग्णवाढ नोंदविली गेली आहे. त्याखालोखाल मध्यप्रदेशात ४३ टक्के, पंजाब ३१ टक्के, जम्मू काश्मीर २२ टक्के, छत्तीसगढ १३ टक्के व हरयाणा ११ टक्के अशा गतीने रुग्णवाढ होऊ लागली आहे. ही सर्व आकडेवारी चिंताजनक म्हटली पाहिजे. महाराष्ट्रातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यास गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यांनी सुरुवात केली आहे. अर्थात अशा प्रकारे तपासणी वाढविणे अत्यंत गरजेचे ठरले आहे. मुंबई, पुणे या महत्वांच्या शहरांसह राज्यातील अनेक भागात रुग्णवाढ झपाट्याने नोंदविली जात आहे. अमरावती, यवतमाळ येथील रुग्णसख्येची नोंदणी गेल्या वर्षाच्या सर्वेच्च संख्या असलेल्या सप्टेंबर महिन्यांपेक्षा जास्त आहे. विदर्भातील काही भागात गेले आठवडाभर सर्व बंद ठेवण्यात आले होते. नागपूर, अकोल्यात त्यानंतर आता रुग्णसंख्या वाढीला ब्रेक लागल्याचे चित्र दिसते आहे. अर्थात अन्य भागात रुग्णवाढीचा दररोज उच्चांक होत आहे. मुंबईत महानगरपालिकेने आता पुन्हा इमारती सील करण्यास सुरुवात केली असून आजपर्यंत एक हजारच्यावर बिल्डिंगी सील झाल्या आहेत. मुंबईच्या शेजारी असलेल्या रायगड जिल्ह्यातून कोरोना हद्दपार होण्याची चिन्हे दिसत असताना अचानक गेल्या दोन दिवसात रुग्णवाढ झालेली दिसत आहे. मुंबईत महानगरपालिकेने पुन्हा क्वारंटाईन सेंटर्स सुरु करण्यास प्रारंभ केला आहे. सध्या कोव्हिडची आय.सी.यू. सेंटर्स ३० टक्के भरलेली आहेत. कदाचित रुग्णवाढ झाल्यास तेथे जास्त रुग्ण भरती झाल्यास आपातकालीन स्थितीत ते सर्व कार्यान्वित केली जात आहेत. एकूणच पाहता दुसरी लाट आल्यास त्याचा यशस्वी मुकाबला कसा करता येईल त्याची सर्व तयारी पूर्ण केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेला शिस्त पाळण्याचे व कोरोनापासून दूर राहाण्यासाठीची जी नियमावली आहे ती कडकरित्या पाळण्याचे आवाहन केले होते. तसे न केल्यास लॉकडाऊनशिवास काही पर्याय नाही असेही बजावले होते. परंतु लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठरणार आहे. लॉकडाऊनचे घेतलेले गेल्या वर्षातले वाईट अनुभव पाहता कुणालाही लॉकडाऊन नको आहे. कोरोनाच्या टास्क फोर्सचे सदस्य असलेले डॉ. शशांक जोशी यांच्या सांगण्यानुसार, लोकांनी गेल्या काही महिन्यात कोरोना संपला असे गृहीत धरुन सर्वच निर्बंध झुगारुन दिले होते. त्यामुळे आता रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपले कार्यक्रम धुमधडाक्यात सुरु केले होते. लग्नसोहळे मोठ्या गर्दीने होऊ लागले होते. अर्थात हे सर्व टाळता येईल अशीच स्थिती होती. परंतु लॉकडाऊनमधून बाहेर पडलेल्यांनी अनिर्बंध स्वातंत्र्य अनुभवले आणि त्याचाच परिणाम म्हणून आता रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. केवळ आपणच नाही तर आज संपूर्ण युरोप पुन्हा कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. अमेरिकेत तर याहून काही वेगळी स्थिती नाही. अमेरिकेतील कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या पाच लाखांवर गेली आहे. गेल्या वर्षाचा अनुभव पाहता आपल्याकडे आता सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. आय.सी.यु. बेडस, साधे क्वॉरंटाईन सेंटर, कोरोनाची तपासणी अशी सर्व यंत्रणा आता सुसज्ज आहे. तशी स्थिती गेल्या वर्षी मार्च महिन्यात नव्हती. दुसरी लाट अजून आपल्याकडे आलेली नाही, मात्र ती थोपविणे आपल्या हाती आहे. त्यासाठी कोरोनाविरोधी लढ्यातील त्रिसुत्री प्रत्येकाने तंतोतंत पाळण्याची गरज आहे. दुसरी लाट आपण कोरोनावरील लसीकरण वाढवून रोखू शकतो. आपल्याकडे आजच्या घडीला देशभरात १.१४ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. अजूनही आपल्याकडे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचा टप्पा संपलेला नाही. खरे तर तो एवढ्यात संपायला पाहिजे होता. परंतु सुरुवातीपासून लसीकरणापासून अनेक जण लांब रहात असल्याचे आढळले आहे. आता मात्र लसीकरणने वेग घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा हे देखील पश्चिम बंगाल, केरळातील निवडणुकांचे राजकारण, पॉन्डेचेरीतील सरकार पाडणे यात गुंतले होते. आता त्यांनी लसीकरणाचा आढावा घेतला आहे. पुढील टप्प्यात पन्नाशी उलटलेल्या २७ कोटी लोकांना लसीकरण करण्याचा महत्वाकांक्षी टप्पा सुरु होईल. या वयोगटातील लोक फारसे अँप वापरत नसल्यामुळे त्यांची नोंदणी करताना रुग्णालयात केली जावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. अर्थात ही मागणी रास्तच आहे. या टप्प्यातील लसीकरण केवळ शासकीय रुग्णालयात नसेल तर पन्नास टक्के काम हे खासगी रुग्णालयातही करण्यात येणार आहे. लसीकरण झपाट्याने झाल्यास दुसरी लाट थोपाविण्यास मोठा हातभार लागेल.
0 Response to "दुसरी लाट?"
टिप्पणी पोस्ट करा