
रामदेवबाबांची जडीबुटी
25 फेब्रुवारीच्या अंकासाठी अग्रलेख
रामदेवबाबांची जडीबुटी
गेले काही वर्षे आयुर्वेदाची विविध औषधे बाजारात आणून त्याचा धंदा यशस्वीपणे करणाऱ्या रामदेवबाबा यांनी कोरोनवरील औषध बाजारात आणल्याचा दावा केला आहे. खरे तर सहा महिन्यापूर्वी त्यांनी पत्रकारपरिषदेत याची घोषणा केली होती. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला ते काही समाधानकारक उत्तरे देऊ शकले नव्हते किंवा या औषधामुळे बरे झालेल्यांची संशोधनात्मक आकडेवारी काही ते सादर करु शकले नव्हते. त्यामुळे हे औषध सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. आता खरे तर त्यांनी गेल्या सहा महिन्यात या औषधाचा वापर रुग्णांवर करुन त्याचे निकाल जनतेपुढे सादर केले पाहिजे होते. मात्र त्यांनी असे न करता केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सोबत घेऊन या औषधाचे वितरण सुरु केले. त्यावेळी या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याचा दावा देखील केला. मात्र या दाव्यात काही तथ्य नसल्याचे म्हणजे रामदेवबाबांनी चक्क खोटे सांगितल्याचे आता सिद्द झाले आहे. असे असले तरी भारत सरकारने याला मान्यता दिली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून या औषधाला राजमान्यता असल्याचे सर्वांना दाखवून दिले आहे. परंतु सर्वात महत्वाचे म्हणजे भारतीय वैद्यकीय संघटनेने या औषधाला आक्षेप घेतला आहे. कोणत्याही प्रकारचे संशोधन न करता किंवा त्या औषधाचे परिणाम न तपासता बाजारात आणणे हा गुन्हा आहे. परंतु ज्यावेळी अशा अवैध कामांनाच राजसत्तेचा आशिर्वाद मिळतो त्यावेळी काय बोलावे? त्यादृष्टीने पाहता भारतीय वैद्यक संघटनेने जे आक्षेप या औषधाच्या संदर्भात नोंदविले आहेत ते योग्यच आहेत. परंतु सध्या असा संघटनांचे ऐकतो कोण? हम करेसो कायदा असे सरकार अस्तित्वात असल्यावर त्यांना दुसऱ्याचे कोणाचे ऐकायचेही नाही. रामदेवबाबांनी तयार केलेले औषध हे आयुर्वेदिक आहे म्हणून त्याला विरोध नाही तर त्या औषधासंबंधी योग्य चाचण्या न होताच जे दावे करण्यात आले आहेत त्याला आक्षेप आहे. रामदेवबाबांनी गेल्या काही वर्षात आयुर्वेदाच्या नावाखाली आपला धंदा जोरात सुरु केला आहे. त्यांच्या अनेक उत्पादनांसंदर्भात अनेकदा आक्षेप घेण्यात आले आहेत. अनेकवेळा ती उत्पादने हलक्या प्रतिची असल्याचा आरोप झाला आहे. एवढेच कशाला नेपाळसारख्या देशाने देखील त्यांच्या कंपनीच्या उत्पादनांना बंदी घातली आहे. मात्र केवळ देशी निर्माण झालेली उत्कृष्ट उत्पादने असे सांगत आपण त्याचे वायफळ कौतुक करीत आहोत. रामदेवबाबांनी आपल्या आक्रमक मार्केटिंगच्या जोरावर अनेक उत्पादने बाजारात आणून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नाकात दम आणले आहेत. मॅगीच्या नुडल्सच्या बाबतीतही असेच झाले होते. मॅगीच्या नूडल्सवर बंदी घालून बाबांच्या कंपनीने नुडल्स आणली व नंतर मॅगीचे विकरण पुन्हा सुरु झाले. स्पर्धा असावी आणि स्पर्धच्या रोजावरच ग्राहकांचा फायदा होतो हे देखील सत्य आहे. मात्र ज्या उत्पादनांचा पायाच मुळी फसवा आहे अशा उत्पादनांसंदर्भात काय बोलावे, असा प्रश्न आहे. रामदेवबाबांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा जरुर करावी, परंतु आपली उत्पादने राजसत्तेच्या आशिर्वादाने न खपविता उत्पादनाच्या दर्ज्यावर खपवावीत. त्यातून निश्चितच ग्राहकांचा फायदा होईल. ज्या आयुर्वेदाचा आधार घेऊन रामदेवबाबा आज औषधे बाजारात आणीत आहेत त्याचा त्यांचा नेमका काय संबंध आहे, असा मुख्य प्रश्न आहे. कारण खुद्द रामदेवबाबा हे काही आयुर्वेदाचार्य नाहीत. त्यांच्याकडे सुसज्ज अशी प्रयोगशाळा व संशोधन विभागही नाही. ज्या कोरोनावर लस शोधण्यासाठी जगातील नामवंत कंपन्या, प्रयोगशाळा व अनेक देश झटत होते ती लस बाजारात बारा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर आली. ही लस तयार करण्यात जगात जेमतेम पाच देश यात यशस्वी झाले. आता आयुर्वेदातील संशोधनाचा आधार घेत रामदेवबाबा जे औषध आणीत आहेत त्याच्या उपयुक्ततेबाबत नेमके संशोधन कोणते आहे? यातून भारतीय संशोधकांना कमी लेखण्याचा प्रयत्न नाही. भारतीय संशोधकांनी लस निर्मितीत जागतिक पातळीवर मोठे योगदान दिलेही आहे. भारत बायोटेकची लस ही देखील पूर्णत भारतीय बनावटीची आहे. त्याच्याही चाचण्या पूर्ण होण्याअगोदरच तिला मान्यता दिली गेली. त्याला जसा अनेक थरातून आक्षेप घेतला गेला तसाच रामदेवबाबांच्या या औषधासंबंधी आहे. रामदेवबाबांनी चांगले संशोधन करावे त्या औषधाच्या चाचण्या यशस्वी करुन जगाला दाखवाव्यात आणि नंतर औषध बाजारात आणावे. तसे करण्याएवजी रामदेवबाबा मंत्र्यांच्या राजकीय शिडिने बाजारपेठेत प्रवेश करुन कोरोनावरील औषध बाजारात आणून सर्वांचीच फसवणूक करीत आहेत. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना खरोखरीच या औषधावर विश्वास वाटत असेल तर त्यांनी लसीकरणाच्या सोबतीने कोरोनाग्रस्तांना या गोळ्या वाटाव्यात. अनेक डॉक्टर्स भारत बायोटेकची लस घेण्यास तयार झालेले नाहीत, कारण तिच्या अजून तिसऱ्या चाचण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रश्न वैज्ञानिक विश्वासार्हतेचा आहे. तसेच रामदेवबाबांच्या या औषधाचा प्रश्न आहे. कोणाच्याही सहाय्याने आज जर कोरोना बरा होणार असेल तर कोणाला नको आहे? इकडे आयुर्वेदीक व अलोपॅथीक औषध हा वाद नाही तर त्या औषधाची विश्वासार्हता पटणे गरजेचे आहे. अनेक भोळेभाबडे लोक रामदेवबाबांवर व मंत्र्यांवर विश्वास ठेऊन हे औषध खरेदी करतीलही परंतु त्यांचा त्यांना खरोखरीच उपयोग होणार आहे का, या प्रश्नाचे उत्तर नाही असेच असणार आहे. राज्यकर्त्यांकडून ज्यावेळी अवैज्ञानिक गोष्टांना खतपाणी घातले जाते ते सर्वात निषेधार्थ आहे. रामदेवबाबांची ही जडीबुटी काही कामाची ठरणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
0 Response to "रामदेवबाबांची जडीबुटी"
टिप्पणी पोस्ट करा