-->
संपादकीय पान बुधवार दि. १ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
यंदाच्या वर्षात गुंतवणूक कुठे कराल?
-----------------------------
प्रत्येकाला आपल्या भविष्यासाठी म्हणून गुंतवणूक ही करावीच लागते. गुंतवणूक कितीही मोठी असो किंवा लहान आपण गुंतविलेली रक्कम ही सुरक्षित राहिली पाहिजे आणि गरज लागेल तशी आपल्याला ती गुंतवणूक मोडून सहजरित्या हाती पैसे आले पाहिजेत. सर्वसामान्य माणूस बहुदा हेच निकष डोळ्यापुढे ठेवून आपली गुंतवणूक करीत असतो आणि त्यात काही चुकत नाही. मात्र जास्त लाभ मिळण्याच्या लोभाने आपण कधीतरी चुकीच्या सल्याने असुरक्षीत ठिकाणी गुंतवणूक करतो आणि आपली मूळ रक्कमही धोक्यात येते. असे पर्याय हे नेहमीच टाळले पाहिजे. अवास्तव जर कुणी लाभ मिळवून देत असेल तर त्यात नक्कीच गडबड आहे हे लक्षात घेऊन अशा ठिकाणी गुंतवणूक टाळली पाहिजे. जमीनजुमला, शेअर्स, रोखे, मुदत ठेवी, म्युच्युअल फंड, सोने अशा काही महत्वाच्या गुंतवणुकीच्या पर्यायाचा विचार करताना आपल्याला यंदाच्या वर्षात यातील कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागणार आहे याचा आपण प्रथम विचार करु. जमीन जमल्यातील गुंतवणुक ही सुरक्षित असली तरीही त्यात जमीनीचे कागदपत्र योग्य आहेत किंवा नाही ते तपासण्याची अत्यंत गरज असते. जमीन ही अशी मालमत्ता आहे की ती तुम्हाला आज ना उद्या चांगला परतावा हा देणारच. सध्या जर तुमची मालमत्ता असल्यास न विकणे हा एक शहाणपणा ठरेल. जमीन ही मर्यादीत आहे. त्यामुळे मर्यादीत असलेल्या जमीनीला हे नेहमीच सोन्याचे मोल येणार आहे. त्यामुळे आपल्याला परवडेल अशा ठिकाणी जमीन खरेदी करणे केव्हाही फायदेशीर ठरणार आहे. शेअर बाजारात ज्यांना गती आहे त्यांनी यात चांगल्या ब्ल्यु चिप्स कंपन्यांच्या समभागांची खरेदी करणे शहाणपणाचे ठरेल. मात्र याबाबत अफवांवर विश्‍वास ठेवून समभागांची खरेदी करणे टाळावे. शेअर बाजारात ज्यावेळी मंदीचे वारे वाहत असतात त्यावेळी खरेदी करावी व तेजीमध्ये समभाग विकून नफा कमवावा. तसेच कधीही एका टप्प्यात सर्व खरेदी करु नये. समभागांची खरेदी व विक्री ही टप्प्याटप्प्याने करावी. म्हणजे समभागांच्या घसरणीचा वा चढणीचा फायदा आपल्याला मिळू शकतो. सध्या शेअर बाजारात नरमाई असली तरीही चांगल्या कंपन्यांचे समभाग तेजीत आले आणि सेन्सेक्सने विक्रमी उंचाक केला होता. चालू वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अशा वेळी  निर्देशांक खाली गेल्यास चांगल्या कंपन्यांची खरेदी करणे शहाणपणाचे ठरेल. तसेच नवीन सरकार स्थापन झाल्याशिवाय बाजारात तेजीची दिशा नक्की होणार नाही हे लक्षात घ्यावे. शेअर प्रमाणे म्युच्युअल फंड उद्योगातही बाजारातील मंदीचे पडसाद उमटल्याने अनेक योजनांची कामगिरी निराशाजनक आहे. अर्थात शेअर बाजार जसा तेजीच्या मूडमध्ये जाईल तशा या योजनांतील लाभ वाढलेले असतील. त्यावेळी त्यांचे निव्वळ मालमत्ता मूल्य हे चढ्या किंमतीला पोहोचलेले असेल. त्यामुळे आत्तापासून म्युच्युअल फंडांच्या काही योजना हेरुन त्यात दरमहा थोडी-थोडी गुंतवणूक करण्यास प्रारंभ करावा. म्युच्युअल फंडातली गुंतवणऊक ही नेहमी दीर्घकालीन लाभदायक ठरते, मात्र त्यात धीर धरावयास हवा. सोन्यातली गुंतवणूक ही गेल्या दशकात चांगलीच फायदेशीर ठरली होती. परंतु सोन्याच्या किंमतीला गेल्या वर्षात मात्र ब्रेक लागला. अर्थात सोन्याच्या किमतीची ही वाढ भविष्यात चांगली होणार आहे. आपल्याकडे सोन्याचा भरपूर मागणी असली तरीही सोन्याचे दर हे जागतिक बाजारपेठेत ठरतात. त्यामुळे जागतिक पातळीर सोन्याची विक्री प्रामुख्याने युरोपातील देश करीत असल्याने सोन्यावर विक्रीचे दडपण आहे. परंतु दीर्घकालीन विचार करता सोन्याची लकाकी डिकणार हे नक्की.
---------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel