-->
संपादकीय पान बुधवार दि. १ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
२१०४ मध्ये काय दडलय?
---------------------
आज उगवलेली पहाट ही आपल्याला २१०४ सालच्या आशेची नवी सूर्यकिरणे घेऊन आली आहे. नवीन वर्षात नव्या आशा, नवे संकल्प, नव्या उर्मी आणि नवी उमेद आपण उराशी बाळगली आहे. त्याची जुळवाजुळव काल वर्ष अखेरीस आपल्या मनात झालेली असेलच. काल संपलेल्या वर्षात आपण कटू आठवणींना तिलांजली देऊन एका नव्या उभारीने नवीन वर्षाचा प्रारंभ केलेला आहे. यंदाच्या या नव्या वर्षात जागतिक पातळीवर अनेक घडामोडी येऊ घातल्या आहेत. अनेक जुन्या घटनांना यानिमित्ताने एक उजाळा मिळणार आहे. यंदाच्या वर्षात येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा ऊरुस ही आपल्याकडील पंचवार्षीक घटना जगाचे लक्ष खेचणार आहे. यावेळच्या निवडणुकीत सत्ताधारी कॉँग्रेस आघाडी की भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्तांतर किंवा डावी आघाडीचे सत्ताग्रहण तसेच नव्याने दिल्लीत सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षाची ताकद किती हे आपण पाहाणार आहोत. पुढील पाच वर्षांसाठी सत्तेच्या चाव्या कोणत्या पक्षाचा हातात जनता देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर याच वर्षात जगाची झोप घालविणारा फुटबॉल वर्ल्ड कप येऊ घातला आहे. जानेवारी महिन्यात जगात रंगीत दूरचित्रवाणीचे प्रसारण सुरु होऊन ६० वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या ६० वर्षाच्या काळात दूरचित्रवाणीने बरीच कात टाकली आहे. आता झालेली दूरचित्रवाणीच्या चॅनेल्सची भाऊ गर्दी पाहता आपण कुठवर मजल मारली आहे हे स्पष्ट दिसते. जगातील नामवंत कंपनी एच.पी.जानेवारी महिन्यात ७५ व्या वर्षात प्रवेश करीत आहे. या कंपनीच्या आयुष्यातील हा एक महत्वाचा टप्पा ठरावा. भारतीय चित्रपट क्षेत्रातील मैलाचा दगड पार करणार्‍या शोले या चित्रपटाचा थ्री डी अवतार याच महिन्यात प्रदर्शित होत आहे. पूर्वी ज्याप्रकारे पूर्वीच्या ७० एम.एम. शोलेने आपले नवनवीन रेक्रॉर्ड स्थापन केले तसेच हा शोलेचा थ्रीडी अवतार करणार का हा एक सवाल आहे. जानेवारीत पाच तारखेला आपल्या शेजारच्या बांगला देशात सार्वत्रिक निवडणुका येऊ घातल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यास संसदेचे अधिवेशन चालू होईल. चालू लोकसभेचे हे शेवटचे अधिवेशन असेल आणि यात संपूर्ण अर्थसंकल्प न मांडता लेखानुदान मांडला जाणार आहे. त्यामुळे निवडणुकानंतर जे नवीन सरकार स्थापन होईल ते आपल्या धोरणानुसार संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प मांडेल. मार्चच्या महिन्यात ऍपल ही तंत्रज्ञानातील आघाडीची कंपनी आपले नवीन आय.पॅड बाजारात आणणार आहे. यात अनेक नवीन सोयीसुविधा असणार असल्याने जगाचे त्यांच्या नवीन तंत्रज्ञानाकडे लक्ष लागलेले असेल. मार्च महिन्याच्या १६ तारखेला बांगला देशात टी २० वर्ल्ड कप सामने होऊ घातले आहेत, क्रिकेटप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी असेल. नवीन आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यापासून देशाची आर्थिक प्रकृती कशी असेल? गेल्या वर्षी आपण देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर पाच टक्के गाठला होता. आता यंदाच्या नवीन आर्थिक वर्षात हा दर वाढलेला असेल का, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुकांची धामधुम जोरात सुरु झालेली असेल आणि प्रचारही अंतिम टप्प्यात आलेला असेल. पुढील महिन्यात २७ मे रोजी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची ५०वी पुण्यतिथी आहे. पंडितजींच्या या पुण्यतिथीच्या काळात कॉँग्रेस सत्तेत असेल का, असाही प्रश्‍न आहे. या महिन्यात आणखी एक महत्वाची घटना घडत आहे व ती म्हणजे नेदरलॅँड येथे पुरुषांची व महिलांची जागतिक हॉकी वर्ल्ड कप स्पर्धा भरत आहे. यात भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागेल. जून महिन्यात ब्राझील येथे भरणार्‍या १२व्या फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धा भरणार आहे. या काळात संपूर्ण युरोप व अमेरिका फुटबॉलमय झालेला असेल. याच महिन्यात चीनने उभारलेल्या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्घाटन होऊ घातले आहे. सध्या असलेल्या दुबईतील बुर्ज खलिफा या इमारतीपेक्षा चीनमधील ही इमारत १० मीटर उंच असणार आहे. चीनने ही इमारत उभारण्याचा कालबध्द कार्यक्रम हाती घेतला असून जून महिन्यात ही इमारत जनतेसाठी खुली होईल. याव्दारे चीनच्या शिरोपात आणखी एक तुरा खोवला जाणार आहे. जुलै महिन्यात भारतीय क्रिकेट टीम इंग्लंडच्या दोर्‍यावर जात आहे. यात पाच कसोटी सामने व पाच एक दिवसीय सामने खेळणार असल्याने भारतीय क्रिकेट रसिकांना एक मोठी मेजवानी मिळणार आहे. तसेच याच महिन्यात पहिल्या जागतिक युध्दाला बरोबर शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. या जागतिक युध्दानंतर अनेक युध्दे झाली. अगदी लोकांचे संसार उध्दस्त झाले तरीही मनुष्यजमात काही युध्दापासून दूर झालेला नाही. उलट गेल्या शतकात अधिक हिंस्त्र शस्त्रात्रे माणसाने विकसीत केली आहेत. दुसर्‍या महायुध्दाची अखेरच अणुबॉम्बने झाली आणि त्याचे वाईट परिणाम जगाने अनुभवले तरीही आपण अणवस्त्रमुक्त जग काही गेल्या शतकात निर्माण करु शकलेलो नाही. यंदाच्या वर्षात तरी माणसाला शांततेची सुबुध्दी सुचावी अशी अपेक्षा. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात विश्‍व हिंदु परिषदेच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. संघ परिवाराच्या या शाखेचा आता जगात व्याप पोहोचला आहे. विश्‍व हिंदु संघटनेने गेल्या ५० वर्षात आपण हिंदुच्या कल्याणासाठी नेमके काय केले हे शोधण्याची वेळ आता आली आहे. याच महिन्यात जर मंगळाची मोहीम सुरळीत सुरु राहिली तर आपले यान मंगळाच्या कक्षेत पोहोचेल. मंगळावर खरोखरीच पाणी आहे किंवा नाही हे शोधण्याच्या मनुष्याच्या शोध मोहिमेला आपला एक मोलाचा हात या निमित्ताने लागणार आहे. ऑक्टोबर महिन्यात शोकांतिकचा बादशहा गुरुदत्त यांची ५०वी पुण्यातिथी आहे. गुरुदत्तच्या दर्दभर्‍या गाण्यांचा व चित्रपटांचा मोहोत्सव आपल्याला चॅनेल्सवर पाहात येईल. नोव्होंबर महिन्यात बर्लिंनची भिंत पाडण्याच्या ऐतिहासिक घटनेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. ही भिंत पाडल्यावरच दुसर्‍या टप्प्यात जगातील शीत युध्दाचा कालंखंड संपण्यास सुरुवात झाली. बर्लिंनची     ही भिंत पडल्यावर जगातून कम्युनिझमची पडझड सुरु झाली. अशा प्रकारे जगाचा चेहरामोहरा बदलायला या घटनेनंतर सुरुवात झाली. त्यादृष्टीने या घटनेचे स्मरण महत्वाचे ठरणार आहे. अशा प्रकारे यंदाच्या वर्षात अनेक जागतिक व देशाला हादरवून सोडणार्‍या घटनांचे स्मरण आपण करणार आहोत. अर्थात दरवर्षीच अशा घटना या घडत असतात आणि यातूनच इतिहासाचे चक्र आपले वेग घेत असते. वर पाहिलेल्या या घटना नियोजित आहेत. मात्र जे अघटीत घडणारे आहे त्याचा ठाव आपणाला आत्ता येऊ शकत नाही. नियतीच वेळोवेळी आपल्याला या घटना उलगडून दाखविणार आहे. यातूनच २०१४ चा कालकुप्पीचा कप्पा अलगद उलगडला जाईल.
--------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel