-->
संपादकीय पान शनिवार दि. २८ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
आघाडीचे वस्त्रहरण
---------------------
तळकोकणात वस्त्रहरण हे गावोगावी सादर केले जाणारे लोकप्रिय नाटक. या नाटकात महाभारतापासून ते रामायणापर्यंत असलेली सर्वच पात्रे मोठ्या विनोदी शैलीत प्रचलित राजकाराणाची खिल्ली उडवित पारंपारिक प्रसंगांना त्याची जोड देत हे नाटक रंगवित असतात. हे नाटक रात्री उशीरा सुरु होते आणि पहाटेपर्यंत चालते. ठिकठिकाणी गावोगावी जत्रेत हे नाटक नेहमी लोकप्रियतेच्या शिखरावर असते. हे नाटक पाहताना लोक पोट धरुन हसत असतात. हेच नाटक मच्छिंद्र कांबळी यांनी मराठी रंगभूमीवर आणले आणि यातून मालवणी भाषा व वस्त्रहरण हे नाटक जगात पोहोचविले. वस्त्रहरण नाटकाची आज आठवण येण्याचे कारण म्हणजे सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात सत्ताधारी असलेल्या कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यात परस्परांचे वस्त्रहरण करण्याची अहंमिहीका लागली आहे ती पाहता आघाडीचे मंत्रालयातील हे वस्त्रहरण चांगलेच रंगणार आहे असे दिसते. आदर्श अहवाल संपूर्ण मंत्रिमंडळाने पेटाळला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि यात अडकलेल्या नोकरशाहा व राजकारण्यांच्या अपराधावर सरकारने पांघरुण घातले. हा अहवाल फेटाळून आठ दिवस लोटत नाहीत तोच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी, हा अहवाल मंत्रिमंडळाने फेटाळला म्हणजेच मुक्यमंत्र्यांनी फेटाळला असे म्हटले. तर त्याचवेळी दुसर्‍या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना या निर्णयावर फेरविचार करावयाचा असल्यास राष्ट्रवादी पूर्ण पाठिंबा देईल असे म्हटले. या दोन्ही नेत्यांची निवेदने ही अर्थातच ठरवून केलेली आहेत. राष्ट्रवादी पक्ष नेहमीच कॉँग्रेस पक्षाला व त्यांच्या मुख्यमंत्र्यांना सतत अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करीत असतो. आजवर मुख्यमंत्र्यांची प्रतिमा ही स्वच्छ आहे आणि आदर्शच्या निर्णयामुळे तिला तडा गेला आहे. राष्ट्रवादीला नेमके हेच पाहिजे आहे. खरे तर एकदा मंत्रिमंडळाने कोणताही निर्णय घेतला की त्याला सर्व मंत्री हे बांधिल असले पाहिजेत. मंत्र्यांनी परत एखाद्या निर्णयाबाबत दुसरे मत व्यक्त करणे म्हणजे मंत्रिमंडळात एकमत नाही हे स्पष्ट होते. राष्ट्रवादी व कॉँग्रेस हे दोन्ही पक्ष एकमेकांना पाण्यात पाहतात. मात्र त्यांना सत्तेच्या खुर्चीने फक्त बांधून ठेवले आहे. अशा प्रकारे एकत्र आलेले फार काळ टिकू शकत नाहीत. जोपर्यंत सत्ता आहे तो पर्यंत ते भांडतील, एकमेकांचे वस्त्रहरण करतील पण एकत्र राहातील. मात्र सत्ता जातेय असे दिसल्यास ते एकमेकांची उणी दुणी काढायला मागे पाहाणार नाहीत. राष्ट्रवादीचे पितामह शरद पवार यांचा डोळा पंतप्रधापदावर आहे. आगामी निवडणुकात जर पंतप्रधान व्हायचे झाले तर ते भाजपाचाही पाठिंबा घेण्यास तयार होतील. अशा स्थितीत ते महाराष्ट्रातीलही कॉँग्रेसची साथ सोडतील. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर हे एक वेगळेच नाट्य राष्ट्रवादी करणार आहे. त्याची रंगीत तालीम सध्या पृथ्वीराजबाबांना सतत अडचणीत आणून ते करुन दाखवीत आहेत. आदर्श घोटाळ्यात सुनिल तटकरे व राजेश टोपे या राष्ट्रवादीच्या दोघा मंत्र्याचा उल्लेख आहे. म्हणजे आदर्शच्या चौकशीला सामोरे जाईन राष्ट्रवादी या दोघा मंत्र्यांना वार्‍यावर सोडणार आहे असाच त्याचा अर्थ काढला पाहिजे. या अहवालात एम.आर.टी.पी. कायद्याचा भंग झाल्याची टिपणी करण्यात आली आहे. त्याबाबत मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची हिंमत शिवसेना-भाजपा दाखविणार आहे किंवा नाही असा देखील प्रश्‍न आहे. आदर्शबाबत शिवसेनेने मौन पाळलेले असल्याने सर्वत्र याबाबत चर्चा सुरु आहे. भाजपाचे खासदार अजय संचेती यांचे बेनामी नऊ फ्लॅट आदर्शमध्ये असल्याचे आयोगाने म्हटले आहे. अजय संचेती यांचेच हे फ्लॅट आहेत की अन्य भाजपा नेत्यांचा त्यात वाटा आहे? अशा प्रकारे आदर्शप्रकरणी एकीकडे राष्ट्रवादी व कॉँग्रेसमध्ये फ्रीस्टाईल सुरु असताना भाजपा व शिवसेना हे देखील आपल्या नेत्यांना वाटविण्यासाठी प्रयत्नशील असताना राष्ट्रवादीने पुन्हा हा प्रश्‍न उकरुन काढल्याने एक वेगळाच राजकीय रंग याला लाभला आहे. आघाडीतील हे वस्त्रहरण आता अधिकच रंगू लागले आहे. कारण या राज्यकर्त्यांना जनतेच्या, कष्टकर्‍यांच्या प्रश्‍नांचे काहीच देणेघेणे लागत नाही. राज्यातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी वेळ खर्च करण्याऐवजी ते परस्परात भांडणे करुन एकमेकांना तोंडघाशी पाडण्याचे काम फक्त करीत आहेत. अलिकडेच झालेल्या चार विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा पराभव अशाच प्रकारे राज्यकर्त्यांची नाळ जनतेपासून तुटल्यामुळेच झाला आहे. त्यापाठोपाठ रायगड जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शेकापच्या बाजूने जनतेने कौल दिला आहे. सत्ताधार्‍यांना जनतेने अशा प्रकारे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत दिलेली ही चपराकच आहे. अर्तात यातून हे राज्यकर्ते शहाणे होतील असे काही दिसत नाहीत. त्यामुळे आगामी निवडणुकात राज्यातील जनता राज्यकर्त्यांना धूळ चारल्याशिवाय राहाणार नाही. जनता योग्य पर्याय शोधत असते आणि वेळ आली की परिवर्तन घडवून आणते हे आम आदमी पक्षाने दिल्लीत दाखवून दिले आहे. त्यामुळे सध्या राज्यातील सत्ताधारी आघाडीत जे परस्परांचे वस्त्रहरण सुरु आहे ते पाहताना जनतेची जरुर करमणूक होत आहे. मात्र ही करमणूक जनता फार काळ सहन करणार नाही. निवडणुका आल्या की आपले विरोधात मत नोंदविणार आहे, याची जाणीव या आघाडीतील राजकीय वस्त्रहरणातील कलाकारांनी लक्षात घ्यावे.
----------------------------------------    

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel